अर्जेन्टिनाचा स्टार खेळाडू लियोनेल मेस्सी यांनी आतंरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आणि चाहत्यांमध्ये दु:खाचे वातावरण पसरले आहे. मेसी यांनी अनेक नव्या चेहऱ्यांमध्ये  फुटबॉलमध्ये रुची निर्माण केली आहे. त्यामुळे मेसी यांचा निवृत्तीचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आहे. काही विद्यार्थ्यांनी मेस्सी यांच्या निवृत्तीला बाहेरून दबाव होत असण्याची शक्यता वर्तवली आहे. जगभरातील चाहत्यांनी त्याला परतण्याची आर्त  हा दिली आहे.

अर्जेन्टिनाचा स्टार फुलबॉलपटू लियोनल मेसी यांनी इतक्यात निवृत्ती न घेता देशाचे प्रतिनिधित्व करावे अशी इच्छा आहे. कोपा अमेरिकन स्पर्धेत अपयश आल्याने खचून न जाता त्याने फुटबॉल सोडून जाऊ नये. याचा मोठा फटका संपूर्ण संघाला आणि त्याच्या चाहत्यांना सहन करावा लागणार आहे. मेसी यांना बघून क्रीडाप्रेमींना प्रोत्साहन मिळत असते. त्यामुळे मेसीने इतक्या कमी वयामध्ये माघारी न फिरता अर्जेन्टिनाला जागतिक स्पर्धामध्ये अशक्य असे यश मिळवून द्यावे.

-तेजस शिंदे, साठे महाविद्यालय

वयाच्या २१व्या वर्षी बलॉन डी ऑर जिंकणारा आणि अर्जेन्टिनाच्या विशेष फुटबॉल खेळाडूंच्या संघातील मेसी एक पेनल्टी हुकल्याने आंतरराष्ट्रीय खेळातून आपली निवृत्ती जाहीर करतो ही धक्कादायक गोष्ट आहे. मी मेसी यांचा खेळ बघूनच फुटबॉलच्या प्रेमात पडलो आहे. त्यामुळे मेसी यांनी फुटबॉल विश्वात खूप मोठं व्हावं आणि खेळाडूंना प्रेरणा द्यावी अशी माझी इच्छा आहे. मेसी यांनी अर्जेन्टिनाला अनेकदा अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले आहे. मात्र स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मेसी यांच्या एका चुकीसाठी संघाने अपयशासाठी मेसी यांना जबाबदार ठरवले असेल तर हे अयोग्य आहे. चाहत्यांमध्ये खिलाडूवृत्तीची कमतरता असल्याचे अनेकदा म्हटले जाते, मात्र या वेळी संघाकडून मेसी यांना एका चुकीसाठी जबाबदार ठरवले जात असेल तर संघातील खिलाडूवृत्ती कुठे, हा प्रश्न आहे.

-पुष्कर डाके, व्हिवा तंत्रज्ञान महाविद्यालय

मेसी यांच्यामुळे अर्जेन्टिना संघ आज जगामध्ये प्रसिद्धी मिळवीत आहे. अर्जेन्टिनाचे राष्ट्राध्यक्ष मॉरिसियो मॅक्री यांनी मेसी यांच्या आंतरराष्ट्रीय खेळातील निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली आहे. अर्जेन्टिनाच्या संघाला मॅसी यांची गरज आहे. त्यांच्याकडे संघ सांभाळण्याचे कौशल्य आणि ताण सहन करण्याची ताकद आहे. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी फुटबॉल खेळाला सुरुवात केली. कदाचित संघ प्रशिक्षक किंवा बाहेरील व्यवस्थेतून मेसी यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असेल तर मेसीप्रेमींकडून त्याचा निषेध आहे.

-अक्षय इंगळे, मुंबई विद्यापीठ