ज्याविद्यार्थ्यांना संशोधनाची आवड आहे आणि त्यात करिअर करावे, असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी औषधनिर्माणशास्त्र हा यशस्वी पर्याय ठरू शकतो.
  औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) हा अभियांत्रिकी व वैद्यकशास्त्र यांच्यासारखाच एक उत्कृष्ट व्यावसायिक अभ्यासक्रम आहे.  रुग्णांना जीवनदान मिळण्यात मोठा वाटा हा औषधांचा असतो. वैद्यकशास्त्र हे रोगाचे निदान करायला शिकवते तर औषधनिर्माणशास्त्र त्या रोगावर कोणते औषध वापराव, ते कसे तयार करावे हे शिकवते. प्रत्येकाला जीवनात कुठल्या ना कुठल्या आजाराकरता किंवा रोगाकरिता औषध  घ्यावे लागते, म्हणूनच औषधनिर्माणशास्त्र हे वैद्यकशास्त्र व रुग्ण यामधील महत्त्वाचा दुवा आहे.
विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डी.फार्म. (कालावधी- दोन वष्रे), बी.फार्म. (कालावधी- चार वष्रे) किंवा फार्म.डी. (कालावधी- सहा वर्षे) या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. उत्तीर्ण झालेले डी.फार्म.चे विद्यार्थी बी.फार्म.च्या द्वितीय वर्षांला प्रवेश घेऊ शकतात. बी.फार्म. झाल्यानंतर एम.फार्म. (कालावधी- दोन वष्रे) किंवा फार्म.डी. (पोस्ट बॅक्यालुरेट) च्या चौथ्या वर्षांला प्रवेश मिळतो. पदव्युत्तर पदवी म्हणजेच एम.फार्म. झाल्यानंतर पीएच.डी. (कालावधी तीन ते चार वष्रे) करता येते.
बी.फार्म., एमबीए, एलएलबी यांसारख्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेता येतो. पदवी अभ्यासक्रमानंतर परदेशात जाऊन एम.एस., पीएच.डी.देखील करता येते. करिअर घडविण्यासाठी फार्मसी हे क्षेत्र फारच योग्य आहे.
फार्मसी केल्यानंतर फक्त औषधांचे दुकान टाकणार हेच काही काळापूर्वी लोकांना वाटत होते; परंतु सध्या फार्मासिस्ट हा फक्त रिटेल किंवा होलसेल फार्मासिस्ट न बनता, कम्युनिटी फार्मासिस्ट, हॉस्पिटल फार्मासिस्ट, इंडस्ट्रियल फार्मासिस्ट होऊ शकतो.
ज्यांना अध्यापनाची आवड आहे, ते साहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू होऊ शकतात आणि अनुभवानंतर सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक तसेच प्राचार्य किंवा संचालक या पदावर बढती मिळवू शकतात.
उत्तम संवादकौशल्य व व्यक्तिमत्त्व असणारे पदविका किंवा पदवीधर मार्केटिंग, प्रॉडक्ट मॅनेजमेंट या क्षेत्रात उत्तम करिअर घडवू शकतात. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून रुजू झाल्यावर विभागीय तसेच राष्ट्रीय पातळीवर व्यवस्थापक या पदापर्यंत पोहोचण्याची उत्तम संधी आहे. गुणवत्ता, चिकित्सक बुद्धी, आव्हानांना सामोरे जाण्याची जिद्द हे गुण ज्याच्या अंगी आहेत ते संशोधन क्षेत्रात काम करून आपला ठसा उमटवू शकतात.
पदवी तसेच पदव्युत्तर पदवीधारकांना औषधी तसेच सौंदर्य प्रसाधन कंपनीमध्ये उत्पादन व निर्मिती विभाग, गुणवत्ता विश्लेषक विभाग, बौद्धिक संपदा विभाग, औषधी नियामकविषयक विभाग, औषधांची क्लिनिकल चाचणी, संशोधन, न्यूट्रास्युटिकल्स इत्यादी क्षेत्रांत भरपूर मागणी आहे.
फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना केपीवो, बायोइन्फॉम्रेटिक्स, केमेइन्फॉम्रेटिक्स, फार्माकोव्हिजिलन्स, मार्केट अ‍ॅनालिस्ट, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, फार्माजर्नालिझम, फार्मा अ‍ॅडव्हर्टायिझग, फार्मा डोमेन एक्स्पर्ट अशा अनेक आव्हानात्मक, नावीन्यपूर्ण व भरपूर पसा देणाऱ्या क्षेत्रांतही संधी उपलब्ध आहेत.
खासगी व सरकारी क्षेत्रांत जसे रेल्वे, संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, राष्ट्रीय संशोधन, प्रयोगशाळा, शासकीय दवाखाने, सार्वजनिक आरोग्य विभाग इत्यादीमध्ये फार्मसी विद्यार्थ्यांना भरपूर वाव आहे. केंद्र सरकारच्या औषध नियंत्रण, संशोधन व राष्ट्रीय प्रयोगशाळा इत्यादी विभागांत उत्तम संधी उपलब्ध आहेत. तसेच एमपीएससी, यूपीएससी इत्यादी नागरी सेवा प्रवेश परीक्षेच्या माध्यमांतून उच्च पदावर औषध व आरोग्याशी निगडित असलेल्या विभागांत अनेक संधी उपलब्ध आहेत.
फार्मसी हे व्यावसायिक शिक्षण असल्यामुळे शिक्षणार्थी स्वत:चा व्यवसाय चालू करू शकतात. कमीत कमी पदविका शिक्षण व स्टेट फार्मसीमध्ये नोंदणी झाली, तर औषध विक्रेता (रिटेल व होलसेल) म्हणून व्यवसाय चालू करता येतो. परवानाधारक फार्मासिस्ट औषधविषयक चाचणी, प्रयोगशाळा, रिपॅकिंग युनिट, औषधनिर्माण/ सौंदर्यप्रसाधन/ आयुर्वेदिक कंपनी, संशोधन केंद्र आदी सुरू करू शकतो. तसेच स्वत:चा औषध उत्पादन व निर्मितीचा उद्योग उभारून उद्योजक होण्याचीही संधी आहे.
परदेशातील करिअर संधी
देशांतर्गत संधीशिवाय परदेशातही जसे अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, सिंगापूर, कॅनडा, जपान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, मलेशिया व इतर अनेक देशांच्या फार्मसी क्षेत्रात यशाच्या शिखरांवर पोहोचण्यासाठी मुबलक संधी उपलब्ध आहे.
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रानंतर फार्मसी हे एकमेव क्षेत्र आहे की, ज्यात झपाटय़ाने वाढ झालेली दिसून येते. औषध क्षेत्रातील उलाढाल पाहता आपला देश विकसित देशांसमवेत गणला जातो. फार्मसी उद्योगांच्या वाढीचा दर १५ ते २० टक्के असा आहे. ही आकडेवारीच फार्मसी क्षेत्रांतील संधीचे महत्त्व पटवून देते. २०१५ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात NIPER (National Institute of Pharmaceutical Education and Research) ही राष्ट्रीय संस्था औषधनिर्माण शिक्षणाला चालना देण्यासाठी उभारण्याच्या विचाराधीन आहे. NIPER ही राष्ट्रीय संस्था मोहाली, हैदराबाद, हाजीपूर, कलकत्ता, रायबरेली व गुवाहटी इत्यादी शहरांमध्ये आहे. केंद्र सरकारचा औषधनिर्मिती शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक असून त्या प्रमाणात रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होतील. यातील आणखी एक जमेची बाजू म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने एक स्वतंत्र औषध मंत्रालय उभारण्याच्या विचाराधीन आहे. या सर्व नवीन संकल्पना, योजना औषधनिर्माणशास्त्रातील उज्ज्वल भविष्याची चाहूल आहे.

फार्मसी पदवी,पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरीक्षा
फार्मसीविषयक पदवी, पदव्युत्तर  अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रीभूत पद्धतीने राबविण्यात येतात. फार्मसी अभ्यासक्रम हा विद्यापीठ, तंत्रशिक्षण संचालनालय, फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडिया, ऑल इंडिया कॉन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन इ. सरकारी संस्था नियंत्रणांतर्गत आहेत. २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षांसाठी बी.फार्मसी. पदवी अभ्यासक्रमासाठी २५ एप्रिल व २६ एप्रिल २०१५ रोजी MT-CET २०१५  ही प्रवेशपरीक्षा महाराष्ट्रात घेण्यात येणार आहे. तसेच एम.फार्म. प्रथम वर्ष प्रवेशासाठी M AH-MPH-CET २०१५ ही प्रवेशपरीक्षा १७ मे २०१५ रोजी घेण्यात येणार आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांची व प्रवेशपरीक्षांच्या विस्तृत माहितीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या  http://www.dtemaharashtra.gov.in   या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
Google New App Photomath let you take a picture of a math equation and help you solve it step by step
गूगलकडे आहे ‘असा’ एक ॲप; विद्यार्थ्यांची गणितं सोडवली जातील मिनिटांत, जाणून घ्या
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
IAS officer Sonal Goel post on Her cracking UPSC exam Marksheet Must Read her journey and shared valuable advice
“तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा…” विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी IAS अधिकाऱ्याने शेअर केली UPSC परीक्षेची गुणपत्रिका

औषधनिर्माण क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम
cv-02
प्रा. चंद्रशेखर बोबडे,
साहाय्यक प्राध्यापक
डॉ. भानुदास कुचेकर, प्राचार्य
महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी कोथरुड, पुणे.
chandrashekhar.bobade@mippune.edu.in