जर तुम्ही नेहमी पर्यटन करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर विश्वास ठेवा, पर्यटन हा तुमच्यासाठी एक उत्तम करिअरचा पर्याय असू शकतो. पर्यटन हे सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक क्षेत्र असून यात करिअरच्या भविष्यकालीन मोठय़ा संधी दडलेल्या आहेत. नफ्यात चाललेल्या या क्षेत्रात देशभरात २० लाख नोक ऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. पर्यटन व्यवस्थापनात पर्यटनाच्या नियोजनाचा आणि व्यवस्थापनाचा समावेश होतो.
कामाच्या संधी
क्षेत्राचा विस्तार अधिक असल्याने करिअरच्या विविध संधी उपलब्ध असणारे एक क्षेत्र म्हणजे पर्यटन. या क्षेत्राचा विस्तार मोठय़ा प्रमाणात होत असला तरी त्यात अनेक सुप्त संधी आजही दडलेल्या आहेत. या क्षेत्रात सार्वजनिक तसेच खुल्या क्षेत्रातही करिअर संधी उपलब्ध आहेत. सार्वजनिक क्षेत्रात केंद्रीय पातळीवर पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालय आणि राज्य स्तरावर अधिकारी, माहिती साहाय्यक, टुरिस्ट गाइड आदी ठिकाणी नोकरीच्या संधी मिळू शकतात. खासगी क्षेत्रात ट्रॅव्हल एजन्सीजमध्ये टुर ऑपरेटर तसेच विमान कंपन्या, हॉटेल्स, वाहतूक कंपन्या, मालवाहतूक कंपन्या आदी ठिकाणी नोकरी मिळू शकते. विमान वाहतुकीच्या क्षेत्राची वाढ वेगाने होत असल्यामुळे  या क्षेत्रातही अर्हताप्राप्त उमेदवारांची आवश्यकता भासत आहे.

कामाचे विभाग
पर्यटन क्षेत्रात निवास, वाहतूक, अन्न, इव्हेन्ट, परिषदा, साहसी पर्यटन, व्यापारी पर्यटन, पर्यटन सेवा अशा वेगवेगळ्या विभागांचा समावेश होतो. आपली आवड आणि उपलब्ध कौशल्यानुसार आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपल्याला प्रवास करता येईल.
आवश्यक कौशल्ये
पर्यटन क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी परिणामकारक संवादकौशल्ये, भाषिक कौशल्ये, लोकांमध्ये मिसळण्याचा उत्साह, सोशल एटिकेट, व्यापारी कौशल्य, जागांची उत्तम माहिती आणि स्थानिक परंपरांची माहिती असणे आवश्यक आहे. पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉटेल्स, रेस्तराँज, विमान कंपन्या, रिटेलिंग, वाहतूक आणि प्रवास कंपन्यांमध्ये कामाची संधी उपलब्ध होऊ शकते.
करिअरचे विविध पर्याय
पर्यटन विभाग- यात आरक्षण आणि तत्सम विषयाचे काम करणारे कर्मचारी, विक्री आणि विपणनविषयक कर्मचारी तसेच गाइड म्हणून संधी मिळू शकते. यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धापरीक्षांद्वारे पर्यटन संचालनालय आणि पर्यटन विभागात अधिकारी म्हणून रुजू होता येते. पर्यटनविषयक योजना आखण्याची आणि त्या राबविण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांची असते.
सरकारी संस्था- यामध्ये पर्यटनविषयक कार्यकारी पातळीवरची नोकरी मिळवण्याकरता ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझममधील पदवी प्राप्त करणे आवश्यक असते. पर्यटन विभागात माहिती अधिकारीच्या हुद्दय़ावर काम करणाऱ्या व्यक्ती स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या स्पर्धापरीक्षेद्वारे निवडल्या जातात. ही परीक्षा देण्यासाठी पुढील विषयांच्या ज्ञानासोबत पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे- भारतीय इतिहास, कला आणि वास्तुशास्त्र, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व. यांसंबंधीच्या प्रवेशजागांची जाहिरात एम्प्लॉयमेन्ट न्यूजमध्ये प्रकाशित केली जाते.
माहिती साहाय्यक- पर्यटन जागा आणि तिथे उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती देत प्रवाशांना त्यांचा प्रवास आखायला मदत करतात.
पर्यटन मंत्रालयातर्फे प्रादेशिक, राज्यस्तरीय आणि स्थानिक अशा तीन पातळ्यांवर गाइडना मान्यता देते. प्रादेशिक गाइडला पर्यटन मंत्रालयाकडून दोन वर्षांचा (पुन्हा काढता येईल असा) परवाना मिळतो. या परवान्याला आर्किओलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाची मान्यता प्राप्त असते. गाइड संबंधित स्थळाची सविस्तर माहिती देतात, त्याचबरोबर त्यांना त्या देशातील परंपरा आणि वारशाची इत्थंभूत ओळख असते.
विमान कंपन्या- विमान कंपनीमध्ये ग्राऊंड स्टाफ अथवा विमानात काम करण्याचा आगळावेगळा पर्याय आज अनेकांना उपलब्ध होऊ लागला आहे. विमान कंपनीमध्ये ट्रॅफिक असिस्टंट, आरक्षण कर्मचारी, एअर होस्टेस आणि फ्लाइट पर्सर, विक्री आणि विपणन कर्मचारी तसेच ग्राहक सेवा कर्मचारी अशा कामाच्या विविध संधी असतात. या संधी उपलब्ध होण्यासाठी ट्रॅव्हल अँड टुरिझमचा अभ्यासक्रम तसेच हॉटेल मॅनेजमेन्टचा अभ्यासक्रम पूर्ण करणे योग्य ठरेल. विमान कंपन्यांसाठी काम करणे हे आव्हानात्मक असले तरी ग्लॅमरसही आहे. तसेच जगभरातील फिरण्याची संधी यानिमित्ताने प्राप्त होण्याची शक्यता असते. विमान कंपन्यांमध्ये आकर्षक वेतनासह इतरही लाभ मिळू शकतात.
टुर ऑपरेटर- वेगवेगळ्या पर्यटनस्थळी सहली आयोजित करणे हे टुर ऑपरेटरच्या कामाचे स्वरूप असते. यात प्रवाशांच्या प्रवासाची आणि राहण्या-खाण्याची व्यवस्था ते पाहतात. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारचे काम पाहणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. यात सर्वसामान्य पर्यटनासह वैशिष्टय़पूर्ण पर्यटन आयोजित करणारेही असतात. उदा. साहसी पर्यटन. टुर ऑपरेटरला इतरांना आपली संकल्पना स्पष्ट करण्याचे, त्यांना आपले म्हणणे पटवून देण्याचे कौशल्य असावे लागते. त्याचबरोबर टुर ऑपरेटर हा मनमिळावू, उत्साही, मदतीला तत्पर आणि पर्यटन स्थळाची उत्तम जाण असणारा असावा लागतो.
ट्रॅव्हल एजन्सीज- ट्रॅव्हल कंपन्या पर्यटकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना प्रवासाच्या व्यवस्थेसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देतात. यात प्रवासमार्ग, प्रवासाचे साधन, आवश्यक असणारी डॉक्युमेन्ट्स, निवासस्थान, भेट देण्यासाठीच्या जागा, तसेच हवामान आदी माहितीचा समावेश असतो. ग्राहकांचे प्राधान्यक्रम, बजेट आणि गरजेनुसार प्रवास आखला जातो. या कामाकरता आरक्षण आदी कामांसाठी कर्मचारी, विक्री आणि विपणन कर्मचारी, टुर ऑपरेटर आणि टुर साहाय्यक, कार्गो आणि कुरिअर एजन्सीज आदींची गरज भासते. ट्रॅव्हल अँड टिकेटिंगमधील अंशकालीन अभ्यासक्रम अथवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण झालेल्यांना अशा कामांसाठी संधी मिळू शकते. काही मोठय़ा पर्यटन कंपन्याही अशा पद्धतीचे अंशकालीन अभ्यासक्रम आखतात आणि त्यातील अनेक प्रशिक्षणार्थीना कामाची संधीही देतात. पर्यटन स्थळांची माहिती, आयोजनाच्या प्रक्रियेची माहिती असलेल्या उत्तम व्यक्तिमत्त्वाच्या उमेदवारांना निवडीत प्राधान्य मिळते.
हॉटेल्स- हॉटेल उद्योग हा पर्यटकांच्या अन्न आणि निवासाची सेवा पुरवणारा उद्योग आहे. या उद्योगात वेगवेगळ्या कौशल्यप्राप्त अशा मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. केवळ भारतात पुढील दशकभरात या क्षेत्रात सुमारे दोन लाख मनुष्यबळाची गरज भासेल. या उद्योगात वेगवेगळ्या विभागांमध्ये मनुष्यबळाची गरज भासते. त्यात ऑपरेशन्स, फ्रंट ऑफिस, हाऊसकीिपग, फूड अ‍ॅण्ड बेव्हरेजेस, अकाऊंटिंग, इंजिनीअरिंग/ मेन्टेनन्स, विक्री, जनसंपर्क आणि सुरक्षा या विभागांचा समावेश आहे. अनेकांना हॉटेल मॅनेजमेन्ट इन्स्टिटय़ूटमधून थेट कामाची संधी मिळू शकते. अनेक हॉटेल्स कर्मचाऱ्यांना परदेशी प्रशिक्षणाची संधीही उपलब्ध करून देतात. या प्रशिक्षणाअंती युवावर्गाला वेगाने पदोन्नती साधता येते.
वाहतूक- रेल्वे अथवा विमान तिकिटाचे आरक्षण, कोच ऑपरेटर, वाहन भाडय़ाने देणे यांसारखी सेवा पुरविण्याचे काम याअंतर्गत येते.
योगिता माणगांवकर

RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…