गेल्या पाच वर्षांत सोशल मीडियातील उपलब्ध नोकऱ्यांची संख्या अत्यंत वेगाने वाढली आहे. मुळात लोकांच्या समाजातील वावराच्या, संपर्कात राहण्याच्या कल्पना बदलत गेल्याने त्याचाच परिणाम सोशल अथवा डिजिटल मीडियाच्या वाढीत दिसून येतो. सोशल मीडियाच्या या लाटेत काही आले आणि गेलेही; पण फेसबुक, ट्विटर, लिंकडिनसारख्या सोशल मीडिया नेटवर्कनी मात्र ऑनलाइन कल पूर्णत: बदलून टाकले आहेत, जणू त्यांची परिभाषाच पुरती बदलली आहे. एक मात्र नक्की की, आता वैश्विक व्यापारासाठी सोशल मीडिया अत्यावश्यक आहे आणि त्यामुळे सोशल मीडिया मार्केटिंग आणि डिजिटल मीडियातील नोक ऱ्यांसाठी हा काळ सुगीचा ठरत आहे.
सोशल मीडिया हे केवळ वेळ घालवण्याचे साधन आहे, असे जर आजही कुणाला वाटत असेल तर त्यांनी याबाबत पुन्हा विचार केलेला बरा! कारण हे क्षेत्र नवनव्या संपर्क, साधनांच्या उदयात आणि अपव्ययातही टिकून राहील, असा कयास व्यक्त केला जात आहे. जर तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या मार्केटिंगमध्ये स्वारस्य असेल तर या क्षेत्राकडे वळायला हरकत नाही.

जाहिरात- सोशल अ‍ॅडव्हर्टायझिंगसाठी व्यक्तीचे सामाजिक वर्तन जाणून घेणे आवश्यक असते. नव्या नेटवर्कसाठी योग्य ठरेल अशा नावीन्यपूर्ण जाहिरातींच्या कल्पनांची आवश्यकता असते. त्यामुळे सोशल जाहिरातींची निर्मिती, अहवाल, प्लेसमेंट या संबंधित कौशल्ये प्राप्त करणे हे या संबंधित करिअरमध्ये आगेकूच करण्यासाठी लाभदायक ठरते.

सेवा क्षेत्र- ग्राहकसेवेवर सोशल मीडियाच्या होणाऱ्या मोठय़ा परिणामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ऑनलाइन शॉपिंग उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांना मिळणारा ग्राहक प्रतिसाद किती शक्तिशाली असतो, हे आपण जाणतोच. उत्पादन आणि सेवासंबंधातील ग्राहकांच्या तक्रारींमुळे ऑनलाइन कंपन्यांची प्रतिष्ठा नेहमीच पणाला लागते आणि म्हणूनच ग्राहकांशी संवाद साधण्याची व्यवस्था उभारणे ही त्या कंपनीसाठी उपयुक्त गुंतवणूक ठरते. सोशल मीडियाच्या
या सेवा क्षेत्रात कामाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

माहिती- सोशल मीडिया क्षेत्रात माहितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उपलब्ध माहितीचा नेमका उपयोग नफा कमावण्यासाठी करणे हे या क्षेत्रातील कंपन्याचे धोरण असते. सोशल मीडियातील उपलब्ध माहिती समजून घेणे आणि त्या माहितीचे व्यवस्थापन करणे यावर नोकऱ्यांचे एक संपूर्ण क्षेत्रच उभारले गेले आहे.
उपलब्ध सामग्री- सोशल मीडियात ब्रँड युद्ध ही काही नवी गोष्ट नाही. उलट यामुळेच तुमच्या ब्रँडची उपस्थिती जाणवते. मात्र, लोकांच्या सामाजिक अवकाशाला छेद न देता आपल्या कंपनीची अथवा ब्रँडची प्रतिमा उंचावण्यासाठी लोकांना आपल्यातर्फे उत्तम सामग्री उपलब्ध करून देणे हा एकमेव मार्ग असतो. लोकांना माहिती देऊन, त्यांचे रंजन करून, त्यांच्या पैशाची कशी बचत होईल हे सांगून, त्यांना प्रेरणा देत आपल्याकडे वळवण्याचे उत्तम साधन म्हणजे सर्वोत्तम कंटेन्ट! यातून लोकांना नेमके काय हवे आहे, हेही तुम्हाला कळते.
सोशल आणि डिजिटल मार्केटिंग माध्यमाचे जग हे या माध्यमाचे धोरण, विपणन, प्रकल्प आणि मोहीम व्यवस्थापन तसेच समुदायाचे व्यवस्थापन यांवर अवलंबून असते. सोशल मीडिया क्षेत्राचे हे वेगवेगळे पैलू समजून घेत या अत्यंत अनवट अशा या क्षेत्रात तुम्ही तुम्हाला अवगत असलेल्या कौशल्यानुसार तुमचे करिअर उभारू शकता. प्रत्येक नेटवर्कवर उपलब्ध सामग्रीचा उपघटक कसा वेगळ्या पद्धतीने काम करतो हे जाणून घेणे आणि त्याप्रमाणे कार्यपद्धतीत बदल करणे हे तुमच्या व्यक्तिगत उत्कर्षांसाठी आणि कंपनीच्या यशासाठी आवश्यक ठरते.
– राज शिंदे