करिअरच्या विविध टप्प्यांतील आव्हाने आणि त्यांना सामोरे जाताना आवश्यक ठरणारा तारतम्यभाव याविषयी जाणून घेऊयात, ‘करिअरनीतीया पाक्षिक सदरातून!

गौरवचा आज ऑफिसचा पहिला दिवस. इंजिनीअिरगच्या फायनल इयरला कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये तो निवडला गेला. त्याच्याच कॉलेजच्या नितीन आणि नीलेशचीही निवड झाली होती. ट्रेनी इंजिनीअर्स म्हणून सहा महिने प्रोबेशन होतं.

तिघांनी कंपनीच्या मेन गेटवर भेटायचं ठरवलं होतं. आत मग एकत्र जायचं आणि सगळ्या फॉरमॅलिटीज पूर्ण करायच्या. गौरव पोचला तेव्हा नितीन आणि नीलेश त्याची वाट पाहत उभेच होते. तिघांनी मग मेन गेटवर पासेस बनवून आत प्रवेश केला. कंपनीचा कॅम्पस खूपच ऐसपस आणि इंप्रेसिव्ह होता. तिघांची नजर सगळं काही टिपायला चौफेर फिरत होती जणू.

एच.आर.ने त्यांना बाराव्या मजल्यावर बोलावलं होतं. लिफ्टमध्ये किमान २० जण शिरतील एवढी जागा होती. सकाळची ऑफिस सुरू व्हायची वेळ असल्यामुळे लोकांची रेलचेल खूप होती. लिफ्ट खचाखच भरलीच मग. तसे सगळे यंग दिसत होते. एकच बऱ्यापकी सीनिअर गृहस्थ होते. डोक्यावरचे केस पांढरट आणि विरळ झालेले. ही तिघं सोडल्यास सगळ्यांच्याच गळ्यात आयकार्डस् होती. त्या सीनिअर गृहस्थानं तिघांकडे सहज एक कटाक्ष टाकला. गौरवने धीर एकवटत थोडंसं हलकं हसत ‘गुड मॉìनग’ म्हटलं. त्या सीनिअरनंपण त्यांना विश केलं आणि विचारलं ‘ट्रेनीज?’. गौरवनं लगेचच ‘येस सर, आर फर्स्ट डे टुडे’ म्हटलं. ‘वेल, ऑल द बेस्ट’ विश करीत ते सहाव्या मजल्यावर उतरून गेले. मुलांनीही त्यांना ‘थँक यू’ म्हटलं.

गौरवने आजूबाजूला बघत जणू सगळ्यांनाच उद्देशून विचारलं, ‘हू वॉज ही?’. दोन-तीन जणं एकदम उद्गारली ‘मिस्टर देशमुख, दी एच आर हेड’. गौरवच्या मनात विचार येऊन गेला मग ‘आज यांची भेट परत होणार की काय?’

गौरव आणि त्याचे मित्र ठरल्याप्रमाणे बाराव्या मजल्यावर उतरले आणि बाहेर पडले. सेक्युरिटीने त्यांना एका मोठय़ा खोलीत बसवलं. तिथं आणखीन ८-१० जण येऊन बसली होती. तिघांनी मग एक एक सीट धारण केली. हा हा म्हणता खोलीत २५-३० जण येऊन बसले. वातावरण एकदम तणावपूर्ण होतं. या तिघांसारखेच आणखीन काही ग्रुप्स दिसत होते, पण तेही शांत बसले होते. गौरवनं वळून आळीपाळीनं नितीन आणि नीलेशकडे पाहिलं. तेही गप्प गप्पच दिसत होते. गौरव मग उठला आणि काही ग्रुप्समध्ये जाऊन स्वत:ची ओळख करून दिली आणि त्यांची चौकशी केली- कुठलं कॉलेज, नाव गाव . हळू हळू रूममधल्या वातावरणातला तणाव निवळत गेला. .

इतक्यात गार्डने येऊन सांगितलं ,‘प्राची मॅडम येत आहेत, सगळ्यांनी बसून घ्यावं.’ प्राचीनं येऊन मग सगळ्यांना विश केलं. आजचा त्यांचा संपूर्ण दिवस जॉयिनग फॉरमॅलिटीजमध्येच जाणार आहे हे सांगितलं. सुरुवात इंडक्शन / ओरिएंटेशननं आणि मग दुपारनंतर इतर फॉरमॅलिटीज. ‘चला तर, आपण आता एका मोठय़ा ऑडिटोरियममध्ये जाऊ. तिथे देशमुख सर आपल्याला अ‍ॅड्रेस करतील.’ गौरवने हात वर केला. ‘येस?’. ‘मॅडम आम्ही आधी जरा ५ मिनिटांचा ब्रेक घेऊ का? वॉशरूम ब्रेक?’ ‘येस ऑफ कोर्स, पण एका अटीवर. सगळ्यांना तू दहा मिनिटांत ऑडिटोरियममध्ये हजर करशील’. गौरवनं सगळ्यांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. सगळ्यांनी त्याला एकमुखानं वेळ पाळण्याची ग्वाही दिली. ‘आय प्रॉमिस मॅम.’. ‘व्हॉट इज युवर नेम?’ ‘गौरव मॅम.’

ऑडिटोरियम सुंदरच होतं. छोटासा डायस, नाटय़गृहासारख्या चढत्या उंचीच्या फोिल्डग खुच्र्या. अद्ययावत साउंड सिस्टिम्स. सगळ्या ट्रेनीजनी सीट्स घेतल्या आणि देशमुख सर आत आले. त्यांनी सगळ्याचं स्वागत केलं आणि ते कंपनीची माहिती देऊ लागले. बोलता बोलता त्यांची नजर सर्वत्र फिरली आणि त्यांना गौरवचा चेहरा दिसला आणि त्यांची नजर गौरवच्या चेहऱ्यावर स्थिरावली. पुढचा तासभर मग ते गौरवशीच बोलत होते असा त्याला भास झाला .. ‘वुई ऑल हॅव ड्रीम्स ..’ गौरव भानावर आला तो सरांच्या त्याच्याकडे रोखलेल्या हातानं. ‘यू यंग मॅन देअर, व्हॉट इज युअर नेम?’. शेजारचे ज्या तऱ्हेने त्याच्याकडे पाहू लागले त्यावरनं गौरवला कळलं – प्रश्न आपल्यालाच विचारलाय. ‘गौरव सर.’

‘ व्हॉट इज युवर ड्रीम?’

‘सर, मला खूप मोठ्ठं व्हायचंय. आणि कंपनीलाही खूप मोठ्ठं करायचंय.’

‘दॅट्स ग्रेट यंग मॅन’ सर उद्गारले.

तुम्हाला काय वाटतं, गौरव पुढे जाऊन मोठ्ठा होईल, यशस्वी होईल? नाही सांगता येणार. त्यासाठी इतर अनेक गुणांची आवश्यकता असते. पण कुठल्याही संधीसाठी जेव्हा चार जणांचा विचार होतो, तेव्हा गौरवचीही बेसिक पात्रता असली, तर त्याचा विचार केला जाईल का? नक्कीच ! केवळ विचारच नाही, पण त्याची निवड होण्याची शक्यताही जास्त असेल. करिअरमध्ये अशा अनेक संधी येतात जेथे एखाद्या प्रमोशनसाठी किंवा एखाद्या रिकाम्या झालेल्या जागेसाठी अर्हताप्राप्त लोकांचा विचार केला जातो. कोण असतात या अर्हताप्राप्त व्यक्ती? ते सर्व उमेदवार बऱ्याचदा तोलामोलाच्या कुवतीचेच असतात. बाजी तो मारून नेतो जो कुणाच्या ना कुणाच्या नजरेत, मनात काहीतरी जागा करून गेलेला असतो, ज्याला ‘व्हिझिबिलिटी’ असते.

‘व्हिझिबिलिटी’ म्हणजे निव्वळ छापपाडूपणा नव्हे. ‘व्हिझिबिलिटी’ म्हणजे केवळ पुढे पुढे करणं नव्हे. तुमचं अस्तित्व इतरांच्या लक्षात येण्यासाठी, लक्षात राहण्यासाठी तुमच्यातील अनेक गुण कारणीभूत असू शकतात. हे गुण अंगभूत असू शकतात किंवा अंगीकारलेलेही असू शकतात. ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतात. अनेक गुणांची ऑर्गनायझेशनला गरज असते, पण तुमच्याकडे ते आहेत, हे मॅनेजमेंटला माहीत असणं गरजेचं असतं – हा खरा कळीचा मुद्दा आहे. अनेक हुशार कर्तबगार व्यक्तींची हुशारी लोकांना माहीत नसते आणि लक्षातही येत नाही ते ‘व्हिझिबिलिटी’च्या अभावामुळे. ती लक्षात येण्यासाठी आणि आपण ‘व्हिझिबल’ होण्यासाठी मग काय करायचं? पाहूया पुढच्या लेखात.

करिअरमध्ये अशा अनेक संधी येतात जेथे एखाद्या प्रमोशनसाठी किंवा एखाद्या रिकाम्या झालेल्या जागेसाठी अर्हताप्राप्त लोकांचा विचार केला जातो. कोण असतात या अर्हताप्राप्त व्यक्ती? ते सर्व उमेदवार बऱ्याचदा तोलामोलाच्या कुवतीचेच असतात. बाजी तो मारून नेतो जो कुणाच्या ना कुणाच्या नजरेत, मनात काहीतरी जागा करून गेलेला असतो, ज्याला ‘व्हिझिबिलिटी’ असते.

palsule.milind@gmail.com