मला नागरी सेवांमध्ये करिअर करायचे आहे. यासाठी कोणती पुस्तकं वाचायला हवीत ते सांगा?
– गणेश तानपुरे
नागरी सेवा परीक्षा ही देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक कठीण परीक्षा समजली जाते. या परीक्षेला साधारणत: पाच ते सहा लाख उमेदवार बसतात. त्यातून दरवर्षी हजारेक मुलांची निवड वेगवेगळ्या सेवांसाठी केली जाते. पाच लाख ते एक हजार हा टप्पा गाठणे किती कठीण आहे, हे लक्षात घ्यायला हवं. हे साध्य कठीण असलं तरी अशक्य नाही, हेही तितकंच खरं आहे. या परीक्षेच्या यशासाठी अद्यापतरी कुणालाही हमखास फॉम्र्युला सापडलेला नाही. प्रत्येक यशस्वी उमेदवार हा त्याच्या त्याच्या पद्धतीने अभ्यास आणि तयारी करत असतो. ही परीक्षा प्राथमिक, माध्यमिक आणि मुलाखत अशा तीन टप्प्यात होते. त्यास साधारणत: वर्षभराचा कालावधी लागतो. याचा अर्थ संयमाचीसुद्धा ही परीक्षा असते. या परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी इंग्रजी व मातृभाषेवर चांगले प्रभुत्व असणे गरजेचे आहे. कारण या परीक्षेत इंग्रजी निबंधाचा एक पेपर असतो. तसेच इंग्रजी आणि मराठी या विषयाचे प्राथमिक स्वरूपाचे पेपरही असतात. लेखन आणि अभिव्यक्ती कौशल्याची तपासणी करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. शिवाय सामान्य अध्ययनाचे मुख्य परीक्षेत चार पेपर आणि प्राथमिक परीक्षेत एक पेपर असतो. सामान्य अध्ययनात आपण पाचवी ते बारावीपर्यंत शिकलेल्या जवळपास सर्वच विषयांचा समावेश असतो. त्यामुळे बहुतेक यशस्वी मुले एनसीईआरटीची (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) पुस्तके अतिशय काळजीपूर्व समजून उमजून वाचतात. चांगल्या इंग्रजी दैनिकांचे नियमित वाचन करतात. त्यातील महत्त्वाच्या बाबींची नोंद ठेवतात. भारत सरकारच्या प्रकाशन विभागामार्फत काढण्यात येणाऱ्या इंडिया इअर बुकचे वाचन करतात. योजना, कुरुक्षेत्र, इकॉनॉमिक अँड पोलिटिक वीकली आणि इतर काही वृत्तविषयक नियतकालिकांचं अध्ययन करतात. जो विषय ऐच्छिक म्हणून घ्यायचा असेल त्याचा परिपूर्ण अभ्यास करतात. तुम्हाला ज्ञान असणे जितके महत्त्वाचे तितकेच तुम्ही ते सादर करता हेही महत्त्वाचे. शिवाय तुम्ही आजच्या काळाशी सुसंगत असा या ज्ञानाचा कसा उपयोग करू शकता. त्याचे विश्लेषण कसे करू शकता हे बघितले जाते. अशा प्रकारे आपली मनाची तयारी करा आणि अभ्यासात झोकून द्या. विद्यापीठीय परीक्षांपेक्षा संपूर्णपणे भिन्न आणि उच्चस्तरीय अशी ही परीक्षा असते, हे कायम लक्षात ठेवा.

मी यंदा बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालो आहे. मला बीटेक बायोटेक्नॉलॉजीला प्रवेश घ्यायचा होता. पण मिळाला नाही. मला एमपीएससी किंवा यूपीएससी करायचे असल्यास कोणत्या विषयातून पदवी घेतलेली चांगले राहील?
-मनोज वाघमारे
राज्य अथवा संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी कोणत्याही विषयातील पदवी ही आवश्यक अर्हता आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य, विज्ञान, कला अशा शाखांमधले विषय उमेदवार घेतात आणि यश मिळवतात. आपणास कोणत्या विषयात रस आणि गती आहे हे स्वत: तपासून बघायला हवे. त्याप्रमाणे विषयाची निवड केल्यास संबंधित विषय समजून उमजून घेणे, त्या विषयासंदर्भातील अधिकाधिक संदर्भ गोळा करणे, नव्या बाबींची माहिती मिळवणे सुलभ होते.

माझा ऐच्छिक विषय मेकॅनिकल इंजिनीअरिंग आहे. जो मला इंग्रजीमध्ये द्यावा लागेल. मी पूर्ण परीक्षा मराठी भाषेत देऊ शकतो का?
– मनोहर भोसले
नागरी सेवा परीक्षेतील पेपर्स हे इंग्रजी अथवा आठव्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या कोणत्याही भाषांमधून देता येते. तथापी वेगवेगळ्या पेपरसाठी वेगवेगळी भाषा निवडता येत नाही.
मी बी.ई करत आहे. मला मुक्त विद्यपीठातून बी.कॉम करायचं आहे. एकाच वेळी दोन्ही पदवी अभ्यासक्रम करता येतील का?
– केशव शिंदे
तुला दोन्ही पदवी अभ्यासक्रम करणे शक्य आहे. मात्र अभियांत्रिकीचा अभ्यास तुलनेने कठीण असून प्रॅक्टिकल्स, सबमिशन्स यात व्यस्त राहायला होतं. हे सगळं नीट सांभाळलं तरच चांगले पर्सेटाइल मिळू शकते. पुढे नोकरीसाठी वा परदेशात एम.एस करण्यासाठी हे गरजेचं असतं. दुसरीकडे बीकॉम करणंही काही अगदीच सोपं नाही. त्यामुळे या दोन्ही शाखांचा अभ्यास तुला एकाच वेळी करायला जमणार आहे का? हे लक्षात घे आणि मगच निर्णय घे.

मी भौतिकशास्त्रात बीएस्सी केलंय. मला ५७ टक्के मिळाले आहेत. मला नोकरीच्या संधी कुठे मिळतील?
-दस्तगीर तांबोळी
बँकेच्या परीक्षा देऊन तू अधिकारी किंवा कारकून संवर्गात जाऊ शकतोस. तुला खासगी बँकांमध्येही संधी मिळू शकते. बीएड केल्यास अध्यापन क्षेत्रात जाता येईल. सर्वात आधी तुला नेमका कशामध्ये रस आहे, हे शोध. त्यानुसार मग करिअरचा मार्ग शोध. चांगले लिहिता येत असल्यास पत्रकारिता वा जनसंवाद अभ्यासक्रम करून वृत्तपत्रे, टीव्ही, रेडियो या माध्यमांमध्ये तुला संधी मिळू शकते. व्यवस्थापकीय कौशल्य आणि उत्तम आवाज असल्यास कार्यक्रम सादरीकरण करता येईल.

मी बी.कॉमच्या तिसऱ्या वर्षांला आहे. मला एमपीएससी द्यायची आहे. यासाठी मार्गदर्शन करावे.
– आकाश रणवीर
एमपीएससीसाठी किमान अर्हता ही पदवी परीक्षा उत्तीर्ण अशी आहे. यंदा पदवीच्या अंतिम वर्षांला असलेले विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. मात्र एमपीएससीने निर्धारित केलेल्या तारखेपर्यंत अंतिम परीक्षेचा निकाल लागणे आवश्यक आहे. ही परीक्षा प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यात घेतली जाते. लागणारा कालावधी-एक र्वष.
प्राथमिक आणि मुख्य परीक्षेचे पेपर्स हे वस्तुनिष्ठ पद्धतीचे असतात.

मी आयटी इंजिनीअरिंगचं पहिलं वर्ष पूर्ण केलंय त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बीएच्या थेट दुसऱ्या वर्षांला प्रवेश घेतलाय. मी पुढच्या वर्षी एलएलबीला प्रवेश घेऊ शकेन का?
– प्रवीण पठारे
जर तुला ३ वर्षांचा एलएलबी कोर्स पूर्ण करायचा असेल तर प्रवेशासाठी किमान अर्हता ही पदवी आहे. २०१७-१८ मध्ये तू पदवी परीक्षा उत्तीर्ण होत असशील तर एलएलबी करता येईल.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवा.)

सुरेश वांदिले