*    मी सध्या सीआयएसएफ पॅरा मिलिटरीमध्ये कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहे. मी सावित्रीबाई फुले विद्यापीठातून ५८ टक्के गुणांसह बीसीए केले आहे. आता मला एलएलबीला प्रवेश घ्यायची इच्छा आहे. काही महाविद्यालये यासाठी तयारही आहेत. पण माझ्या मनात खूप शंका आहेत. सरकारी नोकरीत असतानाही असे करणे कायदेशीर आहे का? मला जमेल का? – ज्ञानेश्वर  उकांडे

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी शासकीय सेवेत असतानाच एलएलबी केले होते. याचा अर्थ शासकीय कर्मचाऱ्याला नोकरीत असताना शिक्षण घेण्यास कोणताही विरोध नाही. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचे काहीही कारण नाही. उलट तुम्हाला असलेली शिक्षणाची ओढ बघून तुमचे वरिष्ठ खूश होऊ  शकतात. तुमच्या कार्यालयीन कामकाजात कोणताही अडथळा येत नसल्याची तुम्हास खात्री असेल तर तुम्ही पुढील शिक्षण घ्यायला काहीच हरकत नाही. पण एक बाब लक्षात ठेवावी की, पुढील शिक्षणासाठी आवश्यक ती परवानगी आपल्या विभागप्रमुख वा कार्यालय प्रमुखांकडून घेणे योग्य ठरेल. एलएलबीचा अभ्यासक्रम आपल्याला जमणार नाही, अशी शंका मनात ठेवू नका. इच्छा व आवड असली की कठीण गोष्टीही सोप्या होतात.

*   मी सध्या बी.एस्सी.च्या द्वितीय वर्गाला आहे. मायक्रोबायोलॉजी या विषयात पुढे काय संधी आहेत? मला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे. अकाऊंटन्सीच्या क्षेत्राविषयी माहिती द्याल का? – पुरुषोत्तम मोहिते

तुझ्या प्रश्नावरून असे दिसते की, तुझ्या डोक्यात विचारांचा गोंधळ उडाला आहे. सध्या तू विज्ञान विषयात पदवी अभ्यासक्रम करीत आहेस. तुझा विषय मायक्रोबायोलॉजी असावा, असे तुझ्या प्रश्नावरून वाटते. या विषयात करिअरच्या उत्तम संधी आहेत. उमेदवारांना खासगी प्रयोगशाळा, रुग्णालये, संशोधन केंद्रे येथे काम मिळू शकते.

पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला बँकिंग आणि अकाऊंटन्सी या क्षेत्रात करिअर करायचे आहे. अकाऊंटंट होण्यासाठी तुला त्या क्षेत्रातील प्रशिक्षण घ्यावे लागेल. तर बँकिंगविषयी सांगायचे झाल्यास भारतीय बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राचा विस्तार अतिशय वेगाने होत आहे. त्यामुळेच या क्षेत्रात सध्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. दर वर्षी साधारणत: अधिकारी व लिपिक संवर्ग आणि विशेष अधिकारी यांची भरती तब्बल २० हजारांच्या आसपास केली जाते. पुढील काही वर्षे ही गती अशी राहील. त्यामुळे तुला या क्षेत्रात करिअर करायचे असल्यास या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेच्या तयारीस आतापासून लाग. सध्या या परीक्षा प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती अशा तीन टप्प्यांमध्ये होतात. स्पर्धा मोठी असते, त्यामुळे तयारीही तशीच करावी लागते. तू जर मनात पक्का निर्धार केलास आणि त्याप्रमाणे अभ्यास, तयारीही केलीस तर कोणत्याही क्षेत्रात तुला करिअर करता येणे शक्य आहे. परंतु त्यासाठी आधी तू डोक्यात पक्के ठरवायला हवेस, तुला कोणत्या बाजूला जायचे आहे ते!