व्यावसायिक कारकिर्दीच्या अक्षरश: अगणित संधी असलेले क्षेत्र म्हणजे मार्केटिंग व्यवस्थापन. मराठीत याला सुयोग्य शब्द प्रचलित नाही. विपणन किंवा विक्री व्यवस्थापन असा शब्द शासकीय पातळीवर वापरतात; तर पणन हा शब्द मार्केटिंगसाठी वापरतात. आपण या लेखासाठी मार्केटिंग हाच शब्द वापरू.

एखाद्या कंपनीसाठी मार्केटिंग व्यवस्थापन विभाग म्हणजे विजयी होणारा आघाडीवरचा सैनिकच! त्या कंपनीची प्रतिमा व उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवून, त्यांना उत्पादनांची उपयुक्तता स्पर्धकांच्या तुलनेत पटवून, सुयोग्य किमतीत विकून व भरघोस फायदा मिळवून देणारा विभाग म्हणजे मार्केटिंग. बाजाराच्या युद्धभूमीवर आपल्या कंपनीच्या वस्तू जास्तीत जास्त विकण्यासाठी रणनीती आखणे व त्याची यशस्वी अंमलबजावणी करणे हे या विभागाचे मुख्य उद्दिष्ट.

Transaction of more than 1000 crore shares of Vodafone Idea a private sector telecom company
व्होडा-आयडियाच्या उलाढालीचा विक्रम; १,००० कोटी समभागांचे व्यवहार
One to three prize shares from Inox Wind
‘आयनॉक्स विंड’कडून एकास तीन बक्षीस समभाग
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर

मुख्य जबाबदाऱ्या

विक्री व्यवस्थापन – दैनंदिन होणाऱ्या विक्रीसाठी ग्राहकांशी संपर्क साधणे, विक्री अधिकाऱ्यांच्या कामाचे संयोजन करणे, दररोजचे विक्रीचे लक्ष्य साध्य होण्यासाठी प्रयत्न करणे.

जाहिरात व्यवस्थापन – कंपनीच्या उत्पादनांची माहिती सर्व प्रसारमाध्यमांचा इष्ट उपयोग करून कमीत कमी खर्चात व वेळात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवणे.

वितरण व्यवस्थापन – कंपनीची उत्पादने कमीत कमी खर्चात व वेळात वितरकांच्या प्रभावी साखळीमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचवणे.

उत्पादित वस्तूंचे नियोजन – ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार वस्तूंची गुणवैशिष्टय़े, त्यांचे पॅकेजिंग, ब्रँडिंग, विक्रीनंतरची सेवा इ. ठरवणे.

सेवाप्रक्रियेचे नियोजन – सेवा कशी दिली जावी याचे मापदंड ठरवणे.

वस्तूंच्या किमतीविषयी धोरण – ठोक व किरकोळ विक्रीची मूळ किंमत, सवलत, देयकाचा कालावधी ठरवणे.

बाजारपेठ संशोधन – एखादी वस्तू बाजारात विक्रीला आणण्याच्या आधी किंवा नंतर त्या वस्तूंची गुणवैशिष्टय़े, किंमत, उपलब्धता, वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता, इ.विषयी ग्राहकांचा कल समजावून घेणे व त्यावरून त्या वस्तूंचा भविष्यात किती उठाव होईल यासंबंधी अंदाज बांधणे. एखादी वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंग प्रक्रियेचे प्रारूप तयार करणे किंवा त्यात सुधारणा करणे.

डिजिटल मार्केटिंग व ग्राहक संबंध – सध्याच्या डिजिटल युगात मार्केटिंगमध्येसुद्धा संगणक प्रणालीचा वापर अपरिहार्य झाला आहे. इंटरनेटवर ई-दुकाने थाटून ग्राहकांना घरच्या घरी खरेदीची संधी देण्याची अहमहमिका लागली आहे. त्यामुळे अशा ई-दुकानांची व संकेतस्थळांची प्रभावी रचना करून त्यातही सातत्याने योग्य बदल करणे, ग्राहकांशी ईमेल, एसेमेसद्वारे संपर्क ठेवणे, हे मार्केटिंगचे मोठे कार्य बनले आहे.

सर्वसाधारणपणे, संस्थेमधील १०० कर्मचाऱ्यांमागे मार्केटिंग व्यवस्थापनाचे ३० ते ५० कर्मचारी/ अधिकारी असतात. रिटेल मार्केटिंगसारख्या व्यवसायात हेच प्रमाण ७० ते ८० कर्मचारी/ अधिकाऱ्यांपर्यंत वाढू शकते.

मार्केटिंग व्यवस्थापनाचे शिक्षण – मार्केटिंग एक तर अनुभवाने शिकता येते, पण त्याच्या परिणामकारकतेला मर्यादा पडतात. त्यामुळे विद्यापीठांनी दिलेली मार्केटिंगमधील बीबीए/ बीएमएस पदवी ही किमान पात्रता ठरते. अभियांत्रिकी, तांत्रिक व वैज्ञानिक वस्तूंच्या मार्केटिंगसाठी त्या विषयातील पदवी, जसे बीएस्सी, बीई, एमएस्सी, बीफार्म असल्यास कंपन्या अशा उमेदवारांना प्राधान्य देतात. अर्थात त्यानंतर उमेदवाराने मार्केटिंगमधील एमबीए पदवी मिळवलेली असली पाहिजे.

मार्केटिंगमधील काही वैशिष्टय़पूर्ण विभागांसाठी वेगळ्या पदविका व पदव्यासुद्धा आता काही स्वायत्त संस्थांतर्फे उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, टुरिझम मार्केटिंग, समारंभ व्यवस्थापन, हॉस्पिटॅलिटी व्यवस्थापन, रिटेल मार्केटिंगचे व्यवस्थापन, इत्यादी. दुर्दैवाने भारतात तरी मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्यांची स्वत:ची संस्था नाही, की जेणेकरून त्यांना मार्केटिंगमधील छोटे छोटे प्रमाणपत्र अभ्यासक्रम करून त्यांची गुणवत्ता वाढविता येईल. यामुळेच काही कंपन्या योग्य उमेदवारांना भरती करून मार्केटिंगचे प्रशिक्षण स्वखर्चाने देतात.

नोकरीच्या संधी – व्यवसायात मंदी असो, ठीक चाललेला असो वा अगदी भरभराटीला आलेला असो; मार्केटिंगचा माणूस लागतोच. त्यामुळे मार्केटिंगमधील नोकरीच्या भरपूर जाहिराती कायमच सगळ्या वृत्तपत्रांत झळकत असतात. खासगी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, छोटय़ा, मध्यम, मोठय़ा अशा सर्व प्रकारांच्या संस्थांमध्ये मार्केटिंग व्यवस्थापनाचे कर्मचारी/ अधिकारी लागतात. यामध्ये कारखाने, बँका, शैक्षणिक संस्था, माध्यमे- दूरदर्शन, वर्तमानपत्रे, सेवा क्षेत्रे अशा सर्वाचाच समावेश होत असल्याने नोकरीच्या प्रचंड संधी आहेत. याशिवाय, बाजारपेठ संशोधन क्षेत्रातील सल्लागार संस्था अशा ठिकाणी तर या क्षेत्रातील प्रशिक्षित व तज्ज्ञ व्यक्तींची फार निकड भासते. मार्केटिंगचे प्रशिक्षण घेतलेल्यांना स्वयंरोजगाराचे एक मोठे क्षेत्र कायम खुले असते. या जगात अगणित वस्तू व सेवा विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि अशा प्रत्येक वस्तू/ सेवेसाठी एक ग्राहक व उपभोक्तासुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही उद्योजक होऊन एखादी वस्तू किंवा सेवा ग्राहक शोधून त्याला विकू शकता. उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या अशा तुमच्यासारख्या उद्योजकांच्या कायम शोधात असतात व तशा जाहिराती तुम्हाला अगदी दररोजच्या वृत्तपत्रांत बघायला मिळतात. तेव्हा तुमच्याकडे एखाद्या मार्केटिंगमधील पदविका/ पदवीबरोबरच उत्तम संवादकौशल्य, भाषाप्रभुत्व, धडधाकट मन व शारीरिक आरोग्य, विश्लेषण क्षमता, न कंटाळता वाटाघाटी करण्याचे कौशल्य, त्वरित निर्णय घेण्याची सवय, सकारात्मक विचार आणि यशस्वी होण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर आता वाट पाहू नका; ताबडतोब मार्केटिंग व्यवस्थापन क्षेत्रात या आणि एका रोमांचकारी व भरपूर पैसे मिळवून देणाऱ्या कारकिर्दीची सुरुवात करा.