‘विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास’ हा विषय अर्थशास्त्र विषयाशी संलग्न करून मुख्य परीक्षेच्या पेपर-४ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचा विकास हा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाशी अपरिहार्यपणे जोडला गेलेला आहे. उमेदवारांनी पूर्व परीक्षेसाठी ‘सामान्य विज्ञान’ समजून घ्यायला हवे आणि ‘सामान्य विज्ञान’ विषयाचे उपयोजन म्हणजे ‘तंत्रज्ञान’ मुख्य परीक्षेसाठी वेगवेगळ्या ‘आर्थिक’ बाबींशी संबंध जोडून अभ्यासायला हवे; अशी आयोगाची अपेक्षा आहे. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यावर हे लक्षात येते की ‘तंत्रज्ञान’ व त्याचा मानवी कल्याणासाठी वापर या अनुषंगाने सगळे घटक अभ्यासणे MPSC ला अभिप्रेत आहे. घटकवार अभ्यास कशा प्रकारे करायचा ते पाहू या.
ऊर्जा –
ऊर्जासाधने व त्यांचे प्रकार, स्वरूप, ऊर्जानिर्मिती या घटकांमधील वैज्ञानिक संकल्पना व्यवस्थित समजावून घेणे आवश्यक आहे. ऊर्जानिर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनांमागची तत्त्वे व प्रक्रिया तसेच तंत्रज्ञान यांची मूलभूत माहिती करून घ्यायला हवी. ऊर्जेची गरज वेगवेगळ्या क्षेत्रांतील वापर, मागणी, ऊर्जानिर्मिती, पुरवठा इत्यादीबाबतची आकडेवारी (टक्केवारी) भारत व महाराष्ट्राच्या आíथक पाहणी अहवालातून पाहायला हवी. भारतातील याबाबतच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्राचे स्थान माहीत असायला हवे. ऊर्जानिर्मिती, मागणी, car07वापर व पुरवठा इत्यादीबाबतचा महाराष्ट्राचा इतर राज्यांच्या तुलनेत क्रमांक माहीत करून घ्यावा. ऊर्जानिर्मिती प्रकल्पांचे प्रकार व त्यांचा ऊर्जानिर्मितीमधील वाटा समजून घ्यायला हवा. ऊर्जानिर्मितीसाठीच्या विविध योजनांचा अभ्यास टेबलमध्ये करता येईल. वेगवेगळय़ा योजनांबाबत त्यांची उद्दिष्टे, त्यासाठी विहित कार्यपद्धती, खर्चाचे वितरण, अंमलबजावणी यंत्रणा, यशापयश अशा मुद्दय़ांच्या आधारे टेबल तयार करून अभ्यास करावा. याबाबत संबंधित महत्त्वाच्या संस्था, व्यक्ती, राजकीय पलू इत्यादींचाही आढावा घेणे आवश्यक आहे. भारत व महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल व इंडिया इयर बुक या स्रोतांमधून आपली माहिती अद्ययावत करत राहायला हवी.
संगणक व माहिती तंत्रज्ञान –
संगणकाची कार्यपद्धती, नेटवर्किंग, वेब तंत्रज्ञान या बाबींचा अभ्यास बेसिक व उपयोजित संकल्पनांच्या आधारे करायला हवा. सायबर कायद्याबाबतचा अभ्यास पेपर-२ मधील विधी विभागामध्ये पूर्ण होईल. माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे आíथक महत्त्व वेगवेगळया पलूंनी अभ्यासायला हवे. रोजगारनिर्मिती, आयात-निर्यात, परकीय गुंतवणूक व जीडीपी यांमधील या उद्योगाचा वाटा नेमका किती आहे हे आíथक पाहणी अहवालातून पाहायला हवे. माहिती तंत्रज्ञान उद्योगातील समस्यांचे स्वरूप, कारणे, उपाय या बाबींचा अभ्यास इंडिया इयर बुक व रोजच्या घडामोडी यातून करायला हवा. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठीची शासकीय धोरणे व विविध शासकीय उपक्रमांचा अभ्यास त्यांचे उद्देश, उद्दिष्टे, स्वरूप, अंमलबजावणी, खर्चाची विभागणी इत्यादी मुद्दय़ांच्या अनुषंगाने करायला हवा.
अवकाश तंत्रज्ञान
या घटकाचे ‘कालानुक्रमांवर’ आधारित टेबल्स बऱ्याच संदर्भ साहित्यात सापडते. या टेबल्समध्ये उपक्रमाची ठळक वैशिष्टय़े, उपयोजन व आनुषंगिक माहिती हे तीन मुद्दे समाविष्ट केल्यास विविध कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने, क्षेपणास्त्र व विविध अवकाश प्रकल्प यांचा अभ्यास पूर्ण होईल. यातून या तंत्रज्ञानाचा ‘विकास’ कसा झाला हे तुलनात्मकदृष्टय़ा अभ्यासता येईल. कृत्रिम उपग्रह, क्षेपणास्त्र, सुदूर संवेदन व जीआयएस या तंत्रज्ञानामधील वैज्ञानिक तत्त्वे, त्यांची कार्यपद्धती व त्यांचा उपयोग या बाबी विज्ञानविषयक संदर्भ साहित्यातून अभ्यासायला हव्यात. सुदूर संवेदनासाठी भूगोलविषयक पुस्तक उत्तम संदर्भ साहित्य आहे. मात्र इंटरनेटच्या माध्यमातून माहिती जमविणे, नव्या संकल्पना समजून घेणेही आवश्यक आहे.
जैव तंत्रज्ञान, आण्विक धोरण आणि आपत्ती व्यवस्थापन
या तिन्ही घटकांचे अभ्यासक्रमातील विवेचन विस्तृतपणे केलेले आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात नमूद केलेल्या प्रत्येक मद्दय़ाच्या अनुषंगाने अभ्यास आवश्यक आहे. हे मुद्दे या प्रत्येक घटकाचे विविध पलूच आहेत आणि त्यांचा अभ्यास म्हणजेच त्या त्या घटकाचा लॉजिकल व संकल्पनात्मक अभ्यास आहे. या तिन्ही घटकांबाबत ‘चालू घडामोडी’ हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी इंडिया इयर बुक व आíथक पाहणी अहवाल इ. मधील संबंधित प्रकरणे बारकाईने पाहावी लागतील. ‘भारताचे आण्विक धोरण’ असा घटक असला तरी आण्विक तंत्रज्ञानाच्या मूलभूत संकल्पना माहीत असणे आवश्यक आहे. ‘आपत्ती’ या फक्त अभ्यासक्रमातील नमूद केलेल्या संकटांपुरत्याच मर्यादित नाहीत. याबाबत ‘चालू घडामोडी’ माहीत असणे आयोगाने गृहीत धरले आहे. या घटकासाठी पक्का संकल्पनात्मक अभ्यास व त्यावर आधारित उपयोजित मुद्दय़ांचा अभ्यास हे अभ्यासतंत्र आवश्यक आहे. संकल्पनात्मक अभ्यासासाठी मूलभूत विज्ञानाची पुस्तके व उपयोजित मुद्दय़ांसाठी इंडिया इयर बुक वापरल्यास अभ्यास होईल. संदर्भ साहित्यामध्ये योजना व सायन्स रिपोर्टर यांचा समावेश केल्यास अभ्यासास पुरेशी खोली प्राप्त होईल.