*  मी बी.टेक.च्या (फूड टेक्नॉलॉजी) दुसऱ्या वर्षांला आहे. हा अभ्यासक्रम करता करता मी मुक्त विद्यापीठात बी.ए. करत आहे. मला एमपीएससी करायची आहे. त्यासाठी काय करावे? माझे स्वप्न, ध्येय्य उच्च आहे. आत्मविश्वास खूप आहे.

– प्रतीक पाटील

एमपीएससी होण्यासाठी तुझ्यासारख्या उच्च धेय्य आणि आत्मविश्वास असलेल्या उमेदवारांची गरज असते. मुक्त विद्यापीठाचा बी.ए.चा अभ्यास तू परिपूर्णरीत्या केल्यास तुला ही परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण नाही. तथापि तू सध्या बी.टेक. (फूड टेक्नॉलॉजी) हा अभ्यासक्रमसुद्धा करत आहे. तो उत्तमरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात. मात्र त्यासाठी या अभ्यासक्रमावरच पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे गरजेचे ठरते. एकाच वेळेस दोन अभ्यासक्रम करण्याने दोन्हीकडे व्यवस्थित लक्ष पुरवणे हे जवळपास अशक्य आहे. दोन्ही अभ्यासक्रमांच्या पदवी मिळणे अजिबातच कठीण नाही. मात्र दोन्ही क्षेत्रांत करिअर करण्यासाठी तेवढेच पुरेसे नाही. कोणत्या तरी एका क्षेत्रातील संधी दुरावू शकते, ही बाब लक्षात ठेवूनच पुढील मार्ग अनुसरावा.

*   मी नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास करीत आहे. मला पत्रकारितेचा पदविका अभ्यासक्रम करायचा आहे. पण त्यात वेळ खूप जाईल,असे मला वाटते. मी काय करावे? या अभ्यासक्रमाचा मला परीक्षेसाठी उपयोग होईल का?

– तुकाराम घुगारे

आपणास विविध विषयांवर लिखाण करण्याची आवड असल्यास व स्वत:ची लेखनशैली विकसित केली असल्यास पत्रकारितेच्या क्षेत्रात विविधांगी संधी उपलब्ध होऊ  शकतात. या लेखनकौशल्याचा उपयोग नागरी सेवेत उत्तमरीत्या एखादी योजना/धोरण/निर्णयाचे प्रारूप तयार करणे, त्याची प्रसिद्धी करणे, आपले सहकारी व नागरिक यांच्यासोबत प्रवाभीरीत्या संवाद साधणे यासाठी होऊ  शकतो. त्यामुळे तुम्ही पत्रकारितेचा पदविका अभ्यासक्रम करायला हरकत नाही. पण तुम्हाला वाटत असलेली वेळ जास्त जाण्याची भीती खरीच आहे. एका वेळी दोन दगडांवर पाऊल ठेवणे खरेच धोकादायक असते. शिवाय ही परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक आहे. त्यामुळे त्याच्या अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.