‘‘..आता घरी दोघेच असतो. मुली मनानं सोबत असतात. भले-बुरे कित्येक प्रसंग वाटय़ाला आले. मात्र हातात हात होते. दोन स्वतंत्र वृत्तीची माणसं. पण आजवर सुखानं जगलो.  सगळ्यांच्या संसारात येते त्याप्रमाणे आमच्याही संसारात अनेकदा एकमेकांना माफ करायची वेळ आली, तसं केलंही!’’ सांगताहेत प्रा. वीणा देव, आपले पती प्रा. विजय देव यांच्याबरोबरच्या सत्तेचाळीस वर्षांच्या सहजीवनाविषयी.  

आमचं लग्न कसं ठरलं, त्याची गमतीची गोष्ट आहे. ते वर्ष होतं १९६७. मी पुण्याच्या एस. पी. कॉलेजमध्ये शिकत होते. गाण्यांच्या, समूहगीतांच्या स्पर्धामध्ये रमले होते. एक दिवस माझा एक मित्र म्हणाला, ‘अगं, आपल्या कॉलेजतर्फे नाटय़वाचन स्पर्धेसाठी टीम जायची आहे. वि. वा. शिरवाडकरांचं ‘कौंतेय’ वाचणार आहेत. तू का नाही नाव देत?’ तो नाटय़ मंडळाचं खूप काम करायचा, त्यामुळे त्याची माहिती खरी असणार होती. मी म्हटलं, ‘कधी द्यायची होती नावं?’ तर म्हणाला, ‘आजच शेवटचा दिवस आहे. विजय देव सर नाटय़ मंडळाचे प्रमुख आहेत, त्यांना लगेच भेट.’
  मी स्टाफरूममध्ये गेले. देव सर मला भेटले. म्हणाले, ‘आता निवड करून झालीये बहुतांशी, पण तुम्ही उद्या वाचनाला या.’ मी गेले. त्यांनी माझ्याकडून वाचून घेतलं, आणि माझी ‘कुंती’ या मुख्य भूमिकेसाठी निवड केली. आता असं म्हणता येईल, की ही निवडच आमच्या लग्नाचं कारण ठरली. स.प.तलं वातावरण त्या वेळी असं होतं की, तरुण मुलगा-मुलगी जरा दोन-चार वेळा एकत्र दिसले, तरी त्यांचं लग्न ठरल्याची चर्चा सुरू होई. खरं तर मी आणि विजय तालीम वगळता एकही शब्द एकमेकांशी बोललो नव्हतो. आणि तालमीला सगळेच वाचक असायचेच. पण आम्हाला अनुरूप ठरवून आमच्या लग्नाची अफवा उठलीच. माझ्या ती कानावर आली. वाचनाचा प्रयोग झाल्यापासून मी पुण्यात नव्हतेच तीन आठवडे. आल्यावर सगळे मला विचारायला लागले आणि मी गडबडले. काही सुचेना. शेवटी माझी मैत्रीण म्हणाली, ‘तू देव सरांचा एक लग्नाचा मुलगा म्हणून विचार का करीत नाहीस?’ मी म्हटलं, ‘अगं तसं खरंच काही मनात नाहीये.’ ती आप्पांना म्हणाली, ‘तुम्ही चौकशी करा आप्पा, मला वाटतं, त्यांची जोडी चांगली जमेल. दोघे गुणी आहेत. दिसायला अनुरूप आहेत. कलेची आवड हा समान धागा दिसतो आहे. बाकीचं तुम्ही पाहालच!’
सिलसिला सुरू झाला. आमच्या प्राध्यापिका डॉ. अनुराधा पोतदार विजयशी बोलल्या आणि ते तळेगावला आमच्या घरी आले. आम्ही परस्परांशी बोललो. बोलणं संपताना माझ्या लक्षात आलं की, ‘माझ्यावरच्या जबाबदाऱ्यांमुळे मला आता लग्नाचा विचार करणं अवघड आहे’ -पासून आमची गाडी- ‘पण तुम्हाला शिक्षण पुरं करायला हवं. माझी पत्नी प्राध्यापक असेल, तर मला खूप आवडेल’ -पर्यंत आली.
एक नक्की की, आम्हाला काहीच कल्पना नसताना लोकांनी परस्पर त्यांच्या मनात आमचं लग्न ठरवलं आणि मग रीतसर, लग्न ठरवण्याची सगळी वळणं घेत गो. नी. दांडेकरांची एकुलती एक मुलगी विजय देवांची बायको झाली. सात भावंडांच्या परिवारात गेली. त्या काळात दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेडय़ात आमचं घर. माझे सासरे शेतीच करायचे. माझ्या माहेरचं वातावरण साहित्य-कलांशी अधिक जोडलेलं. बऱ्याच भिन्न असलेल्या घरात मी लग्न होऊन गेले. माझं वय होतं अठरा र्वष पूर्ण. लग्नानंतर दोन-चार दिवसांतच यांनी मला सांगितलं, ‘आपण पुण्यातच राहणार, माझी शिकत असलेली लहान भावंडं मार्गी लागेपर्यंत आपल्याजवळ राहतील. तूही तुझं शिक्षण चालू ठेव. आपण सगळे मिळून राहू. चालेल ना?’ मला आर्थिक बाबींचा काही अंदाज नव्हता. तो हळूहळू येत गेला. यांची नोकरी अगदी नवीन होती. घर भाडय़ाचं होतं. सतत तीन र्वष पडलेल्या दुष्काळामुळे शेतीतून काही मिळणं अवघड झालं होतं. अन् आम्ही शिकणारे चार विद्यार्थी. तीनशे पंचेचाळीस रुपयांत सगळं भागवावं लागे.
दिवस खरंच कठीण होते. मला घरकामाची, स्वयंपाकाची रोजची सवय नव्हती. पण निभावलं सगळं. कारण माझ्या नणंदेचं, दिरांचं सहकार्य आणि त्यांची निगराणी. लग्नानंतरचं पहिलं वर्ष. नववधूचे सण साजरे झाले. मंगळागौर झाली आणि हे मला म्हणाले, ‘मंगळागौरी, हळदीकुंक व जेवणीखाणी याच गोष्टींमध्ये रमू नकोस. तुझ्यामध्ये खूप गुण आहेत. त्यांचा विकास व्हायला हवा असेल तर अभ्यास हवा, सराव हवा. तुला आजवर संधी मिळताहेत. पुढेही मिळतील. त्यातून तुझं व्यक्तित्व फुलायला हवं. मी तुझ्याबरोबर आहे. आणि खरंच तसं झालं. कोणताही निर्णय घेताना थोडा अधिक वेळ घेणारे विजय ‘माझ्या नैसर्गिक गुणांचा विकास’ या मुद्दय़ावर ठाम राहिले. आणि त्यांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन कायमच राहिलं. त्यामुळेच एवढय़ा गोतावळय़ातून माझी वाट मी शोधू शकले. एरवी आयुष्यात पुढे आपण काय करू शकणार आहोत याचा तोवर कधी विचारच केलेला नव्हता. त्या काळी आम्ही मुली तो क्वचितच करीत असू.
मृणालचा जन्म झाला. मी एम.ए.च्या तासांसाठी जाई तेव्हा तिला सांभाळायला घरात त्यांची भावंडं होती, प्रसंगी माझी आई होती. साडेचार वर्षांनी मधुरा झाली तेव्हा मात्र आम्ही दोघेच होतो. अडचणीला आई आणि माझी थोरली नणंद. मधुराच्या वेळी गर्भवती असतानाच मी प्राध्यापक झाले आणि आमच्या संसाराची नेटकी वाट दिसू लागली. मुलींना सांभाळत आम्हा दोघांचं कॉलेजमध्ये शिकवणं, त्यांची कॉलेजमधली राज्यशास्त्र विभाग आणि नाटय़ मंडळाची जबाबदारी पेलणं सगळं सुरू झालं. माझे कविता वाचनाचे कार्यक्रम, मुलाखती घेणं, प्रायोगिक नाटकांमध्ये सहभागी होणं, हेही सगळं कधी एकटीनं तर कधी दोघांनी, सुरू झालं. खूप धावपळ होई. पण करीत असू. त्यामध्ये १९७५ पासून आणखी एक वैशिष्टय़पूर्ण उपक्रम सुरू झाला. आप्पांनी लिहिलेल्या ‘मोगरा फुलला’ या कादंबरीच्या अभिवाचनाचे कार्यक्रम त्यांनी आम्हा दोघांना घेऊन सुरू केले. त्याचे प्रयोग परगावी असले की माझी आई मुलींसाठी येत असे. अभिवाचन म्हणजे निवेदनप्रधान लेखन, नाटक, कथाकथन सगळय़ाचं मिश्रण असलेला कलाप्रकार. तो खुद्द लेखकाच्या साक्षीनं सादर करणं फार आनंदाचं असे. ‘मोगरा’नंतर एकेक वेगळी कादंबरी निवडून आम्ही वाचत गेलो. अशा नऊ कादंबऱ्या आता आम्ही वाचतो. सहाशेहून अधिक प्रयोग झाले आहेत त्याचे. वाचिक अभिनयाने ते नमुने सातत्याने गेली सदतीस र्वष सादर करण्यातून आम्हाला कलेच्या क्षेत्रात एक पाऊल उमटवता आलं.
मृणाल, मधुरा लहानपणापासून हे आमचे उपक्रम पाहत, ऐकत आल्या. त्यासाठी आम्ही घेत असलेली मेहनत पाहत होत्या. नकळत ते संस्कार त्यांच्यावरही होत होते. त्यांच्या शाळांमधून त्याही लोकनृत्यं, कथाकथन, एकांकिका स्पर्धा यातून भाग घेऊ लागल्या. मग मात्र त्यांच्या उपक्रमांसाठी वेळ देणं हे माझं महत्त्वाचं काम मानून मी महाविद्यालयात शिकवण्याबरोबर दूरदर्शनवरच्या मुलाखती, सूत्रसंचालन आणि मॅजेस्टिक गप्पांमधल्या साहित्यिक मुलाखती एवढंच क्षेत्र मर्यादित केलं. आम्हा दोघांचाही एक आग्रह होता, की आपलं ‘शिक्षकपण’ सर्वात महत्त्वाचं, नाटकात काम करणं किंवा मुलाखती घेणं हा आपला व्यवसाय नव्हे. ते काम मिळवण्यासाठी आटापिटा करायचं कारण नाही. सहजपणे आपल्याकडे आलेलं काम आवडलं असेल, तर करायचं. आणि ते स्वीकारल्यावर त्यामध्ये कोणतीही उणीव ठेवायची नाही. परस्परांच्या कामात आम्ही कधीच हस्तक्षेप केला नाही. मात्र दोघेही एकमेकांच्या आणि मुलींच्या कामाचे कठोर समीक्षक होतो आणि आजही आहोत.
आमच्या संसारात आर्थिक व्यवहाराचा भाग विजय सांभाळायचे. थोडय़ाफार हौसेचा आणि सौंदर्यदृष्टीचा मी. एकदा असं झालं, की आमच्या शेजारी गणितज्ञ आजोबा राहायचे, त्यांच्याकडे मी गेले होते. गप्पा मारता मारता त्यांनी मला विचारलं, ‘आता किती पगार मिळतो तुला?’- मी गप्प झाले. कारण मला नक्की ठाऊक नव्हतं. त्यांनी पुढला प्रश्न विचारला, ‘तो खर्च कसा करायचा हे कोण ठरवतं!’ मी लगेच उत्तर दिलं, ‘हे!’ ते हसून म्हणाले, ‘हे उत्तर प्रेम म्हणून ठीक आहे. पण तू आता प्राध्यापक आहेस. जबाबदार आहेस. तुझं आर्थिक स्वातंत्र्य तुला मिळायला हवं, अन् तू त्याचा लाभ घ्यायला हवा. सुरुवातीला त्यांचा सल्ला जरूर घे.’ -आजोबांनी मला एक नजर दिली. आम्हा दोघांच्या नात्यात नवी स्वतंत्र जाणीव आली.
‘‘आपल्याला आणि मुलींना, चौघांनाही जे काय करायचं आहे, ते करता यायला हवं. ते प्रत्येकाला पोषक ठरेल. सांसारिक उपचारांना त्यासाठी बाजूला ठेवावं लागलं तरी चालेल,’’ हे विजय यांचं मत कुटुंबानं स्वीकारलं. मुलींवरच्या संस्कारांची जबाबदारी आम्ही दोघांनीही घेतली. हिंदी, इंग्रजीवर यांचं प्रभुत्व होतं. सामाजिक शास्त्र हा यांचा अभ्यास विषय, आणि मी साहित्य, संगीत, कलावाली! मुलींना दोन्हीचा लाभ झाला. समान आवडींमुळे दोन पिढय़ांमधला पूल जोडला गेला.
मी नेहमी म्हणायची, ‘आपल्या मुली कोणत्याही क्षेत्रात गेल्या तरी पाय रोवून उभ्या राहतील. कारण आपण त्यांना तसंच घडवलंय. मराठी माध्यमात त्या शिकल्या. प्रयत्नपूर्वक त्यांनी स्वत:मधल्या गुणांना झिलई दिली. मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं. मृणालनं अभिनयाच्या क्षेत्रात तिचं नाणं खणखणीत वाजवलं. आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही ती ‘रमा-माधव’च्या निमित्तानं दुसऱ्यांदा दिग्दर्शिका म्हणून रसिकांसमोर येणार आहे. मधुराही स्वयंसिद्ध आहे. बालकल्याणाचं (चाइल्ड वेल्फेअर) काम ती उत्तम रीतीनं करते आहे. तिच्यातली कलावती आता त्यामध्येही तिच्या कामी येते आहे. दोन्ही जावई कलारसिक आहेत. मुलींच्या पाठीशी भक्कम उभे आहेत. थोरला आमच्या अभिवाचनाच्या उपक्रमात गेली चोवीस र्वष मन:पूर्वक सहभागी असतो, तर धाकटय़ाची हुन्नर आणि जाणकारी आम्हा सर्वाना पूरक ठरते. आमच्या कुटुंबाला मिळालेला कलेचा वारसा नातवंडांपर्यंतही समर्थपणे पोचला आहे. मृणालचा विराजस आणि मधुराची राधा दोघेही कलावंत आहेत. लेखन, दिग्दर्शन, अभिनय ही क्षेत्रं विराजसची, तर छायाचित्रण हे राधाचं. दोघेही कलेच्या क्षेत्रात पताका फडकवणार अशी चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. आम्ही दोघे त्यामुळे खूप सुखावलो आहोत.
संसारात आम्हा दोघांच्या स्वभावाचा तसा मेळ जुळला आहे. पण स्वभावात साम्य आहेत, तसे भेदही आहेत. त्यांना जीवनातल्या सर्व गोष्टींमध्ये रस आणि प्रत्येक गोष्ट करून पाहायला आवडते. सुतारकामापासून स्वयंपाकापर्यंत. मी मात्र माझ्या आवडींची कक्षा निश्चित केलेली. ते सर्व वयाच्या सर्व प्रकारच्या माणसांमध्ये रमतात, तर काही माणसांशी माझा सहज संवाद नाही होऊ शकत. ते सगळीकडे रमत असल्यानं त्यांना वेळेचं भान नसतं, तर मी सतत भानावर. ‘आज करे सो कल कर, कल करे सो परसों।’ हे यांचं म्हणणं, तर मी आपली आणि इतरांचीही वेळ पाळली गेली पाहिजे याबद्दल आग्रही. त्यामुळे फुटाणे फुटतात ते या गोष्टींवरून. अर्थात ते फोडण्याचं काम बहुधा मीच करते. ते शांतपणे ऐकत असतात आणि त्यांना हवं तेच करतात!
एका बाबतीत मात्र आमचं पूर्ण जुळतं. ते म्हणजे आप्पांसारख्या नामवंत साहित्यिकाचं, त्याच्या कलाकृतींचं स्मरण, जागरण करणं हे आपलं काम आहे हा विचार रसिकांच्या मनात लेखन-जागता ठेवायला हवा. आम्हाला जे पाथेय त्यांच्याकडून मिळालं ते आमच्यापुरतं न ठेवता ते देता येईल तेवढं आणि देता येईल तसं समाजाला द्यायला हवं. आमच्या शिक्षकी वृत्तीला ते अनुकूल आहे. माणूस घडायला उपयोगी पडेल असे उपक्रम आता अधिक करावेसे वाटतात. आप्पांच्या स्मृतीसाठी एका उत्तम लेखकाला गेली चोवीस र्वष आम्ही ‘मृण्मयी पुरस्कार’ देतो. आणि आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका निरलस समाजसेवकाला ‘नीरा-गोपाळ’ पुरस्कार देऊन गेल्या दहा वर्षांपासून गौरवतो. त्याखेरीज आप्पांची उपलब्ध नसलेली पुस्तकं प्रकाशित करणं, अभिवाचनं याबरोबर आता चार वर्षांपूर्वी ‘दुर्ग साहित्य संमेलन’ही सुरू केलं आहे. आप्पांच्या दुर्गविषयक साहित्यानं प्रभावित झालेला तरुण-तरुणींचा समूह आता एकविचारानं त्यांचे दुर्गविषयक विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवायला सज्ज झाला आहे. एका अर्थानं हा आमचा कुटुंबविस्तारच. तिथे विजय मार्गदर्शक असतात आणि मी दुवा जोडून ठेवणारी वीणाताई.
माझ्यापेक्षा विजय अधिक उत्साही आहेत, कल्पक आहेत. त्यांना नवं नवं सुचत असतं. आमची ‘कांचनसंध्या’ असली तरी ते जोमानं काम करीत आहेत. त्यांनी जरा ती दगदग कमी करावी, असं मी सुचवत असते सारखी, पण..
आता घरी दोघेच असतो. मुली मनानं सोबत असतात. भले-बुरे कित्येक प्रसंग वाटय़ाला आले. मात्र हातात हात होते. दोन स्वतंत्र वृत्तीची माणसं. पण आजवर सुखानं जगलो. अनेकांच्या संसारात येते त्याप्रमाणे आमच्याही संसारात अनेकदा एकमेकांना माफ करायची वेळ आली, तसं केलंही!
आजवरचं काय काय आठवतं, पण अलीकडची काही दृश्यं खूप सुखवतात. मुलींची यशाची झेप तर आहेच. पण विराजस आणि राधा या दोन्ही नातवंडांना शिकवणारा ‘बाबू’ पाहणं फार आवडतं. किती वेगवेगळे विषय परोपरीनं ते त्या दोघांना समजवीत असतात. स्वत:तल्या शिक्षकाचं सारं प्रावीण्य वापरून. मी हळूच ते पाहत असते, पुन:पुन्हा.
मी आजवर कधीच कोणाचा हेवा केला नाही. पण एक मात्र वाटतं, या विजय देवांची बायको होण्यापेक्षा मी त्यांचं नातवंड व्हायला हवी होते.