एक दिवस सकाळी शाळेत येता येता शाळेचे मुख्याध्यापक रस्त्यातला कचरा वेचत येऊ लागले. त्यांचं बघून दुसऱ्या दिवशी लहान लहान मुलं आपणहून कागद-कचरा वेचू लागली. सर आता रोज शाळेची स्वच्छता करू लागले. त्यांनी वेगवेगळय़ा खांबांना कचरा टाकण्यासाठी पोती बांधली. एक दिवस सर स्टाफरूममध्ये आले आणि म्हणाले, ‘‘श्रमदान स्वत:मध्ये रुजवणं खरंच कठीण असतं. पहिल्यांदा माझंही स्वत: खाली वाकून कागद उचलण्याचं धाडस नाही झालं. माझं पद, हुद्दा, मान वाकू देईना. खरंच खूप अवघड आहे हे! पण एकदा वाकलो नि काहीच वाटेनासं झालं. वेगळंच, छान वाटलं. खूप मोकळं वाटलं. इगो सळसळत दिसेनासा झाला..’’

‘‘आमच्या मुलांना शिस्त नाहीए. साध्या साध्या सवयी लावलेल्या नाहीत स्वच्छतेच्या, त्यामुळे प्रसन्न वाटत नाही शाळेत.’’ प्रत्येक शाळेने आपली तक्रार व्यक्त केली. पण ही शाळा मात्र समाधानात होती. हसत होती..  
 या शाळेने ऐकलं होतं इतर शाळांकडून.. मुलं कचरा करतात. शिक्षक, येणारे-जाणारे लोक पान, तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारतात. कुणीही कुठंही थुंकतं. शाळेजवळ खाऊची दुकानं असतात, त्यामुळे मुलं काहीही घेऊन खातात. वर्गात कचरा टाकलेला असतो. आढय़ाला जळमटं असतात. संडास-मुताऱ्या तर विचारूच नका. जाता-येता सगळेच दारं उघडी टाकतात. पुस्तकांना कधीच कव्हर्स घातलेली नसतात. खडूने कुठेही रेघोटय़ा मारलेल्या असतात. पुस्तकांची पानं दुमडलेली. मुलांचे केस वाटेल तसे वाढलेले. मुलींनी वेण्या कशाही घातलेल्या. आणि कितीतरी..
 का घडतं हे सारं? मुलं काय शिकतात? सगळ्या शाळा या विचाराने अस्वस्थ झाल्या होत्या. कुणी सुरुवात करायची? हाताची घडी घालून आणि इतरांना नुसती कामं करायला सांगून हे होईल? भिंती रिकाम्या. परिसर रिकामा. हे सगळं भरून जायला हवं. आपल्या ठिकाणी असणारी औपचारिकता, कृत्रिमपणा नष्ट व्हायला हवा. सगळं कसं यंत्रासारखं चालतंय. इथे मुलं-माणसांचं राज्य असूनही अशी निर्जीवता का यावी? कारण जेव्हा या सगळय़ाला सुरुवात झाली तेव्हाच कुणीतरी इलाज करायला हवा होता. मज्जाव करायला हवा होता. आजार वाढल्यावर उपचार करून काय उपयोग?..
  ही शाळा सगळय़ांच्या दु:खाचा पोत जाणून घेत होती. तिला कारणं समजली होती. तिच्या बाबतीत असं घडत नव्हतं. कारण येणारा जेव्हा तिला बघायचा तेव्हा म्हणायचा, ‘‘किती सगळं स्वच्छ आहे. कागदाचा साधा तुकडाही सापडायचा नाही. येणारं प्रत्येक मूल गेट बंद करतं जाता-येता. इतकंच नाही तर अगदी मोठय़ा माणसांनी, कुणीही गेट उघडं टाकलं तरी त्या व्यक्तीला परत बोलावून मुलं गेट बंद करायला लावतात. मुलांच्या हाताला ही सवय लागलीय. मुलं कुठंही जाताना रांगेनं जातात. शिस्त नुसतीच नाही तर समजून पाळली जातेय. या दोन्हींच्या सवयीमुळे ही मुलं बाहेर जातात तेव्हा वेगळी ठरतात.’’ हे सगळं झालं कारण एकदा शाळेने ठरवलं मुलांच्या सवयींवर काम करायचं.. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत..
मुलं मग त्यांना येणारे वेगळे अनुभव एकमेकांना सांगतात. एका मुलाला ‘‘अरे दोस्ता! गेट काय बंद करायचं असतं? लावतील की मागून येणारे! चल उगाच फार व्यवस्थित आहेस असं दाखवू नकोस.’’ असं कुणी म्हणालं तेव्हा या मुलाला आपल्या शाळेची आठवण होते. कारण कितीही घाई असली, उशीर झाला असला, मागून कुणी येताना दिसत असलं तरी या शाळेतला मुलगा गेट बंद करूनच आत येतो. गेट उघडं टाकल्यावर काय घडतं हे त्याला माहीत असतं. शाळेला माहीत होतं की अशा अनेक गोष्टींच्या सवयी मुलांना लावाव्या लागतात. घराचं जसं गेट बंद केलं जातं तसंच कुठलंही गेट बंद करायचं असतं. येता-जाता ही साधी गोष्ट कुणी आचरणात आणत नाही. सवय लावल्यावर लागते. नि सवय लावण्यासाठी सर्वानी जाणीवपूर्वक ठरवावं लागतं.
 या शाळेत कुठेच कागदाचा तुकडाही टाकलेला दिसायचा नाही. त्याचीही गोष्टच आहे. एक दिवस सकाळी शाळेत येता येता शाळेचे मुख्याध्यापक रस्त्यातला कचरा वेचत येऊ लागले. एका पिशवीत कचरा साठवू लागले. मुलं बघत होती. पटकन कुणी पुढं आलं नाही. पण दुसऱ्या दिवशी लहान लहान मुलं म्हणजे ५ वी, ६ वीतली मुलं आपणहून कागद-कचरा वेचत होती. ८ वीच्या पुढची मुलं काहीशी हसत होती. पण सर काहीच बोलले नाहीत. हा विषयच त्यांनी टाळला. कारण  हे एक दिवसाचं नाटक नव्हतं तर रोज स्वत: ते शाळेची स्वच्छता करू लागले. वेगवेगळय़ा खांबांना त्यांनी कचरा टाकण्यासाठी पोती बांधली. खोल परिणाम झाला याचा. काही शिक्षकही हे काम करू लागले. एक दिवस सर स्टाफरूममध्ये आले आणि म्हणाले, ‘‘आपण मुलांना सांगतो, श्रमदान करा. तासही असतो श्रमदानाचा. पण ते स्वत:मध्ये रुजवणं खरच कठीण असतं. पहिल्यांदा माझंही स्वत: खाली वाकून कागद उचलण्याचं धाडस नाही झालं. माझं पद, हुद्दा, मान वाकू देईना. खरंच खूप अवघड आहे हे! पण एकदा वाकलो नि काहीच वाटेनासं झालं. वेगळंच, छान वाटलं. खूप मोकळं वाटलं. इगो सळसळत दिसेनासा झाला..’’
एका शिक्षकांनी विचारलं, ‘‘सर.. अचानक कसं घडलं हे?’’
 सर म्हणाले, ‘‘इतके दिवस प्रतिष्ठेच्या वल्गना होत्या. कदाचित हा टीकेचा विषय होईल तसा चेष्टेचाही. गांधींच्या एका आश्रमात गेलो होतो. सकाळी सर्वजण स्वच्छता करत होते. प्राचार्य, संस्थाप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थीही. तेव्हा कुणाचं पद माहीत नव्हतं. आपोआप झाडू उचलला गेला. कुणीच बघत नव्हतं माझ्याकडे. मी कोण?.. इतरही कोण होते हे दिवस सुरू झाल्यावर समजलं.  इथे आल्यावरही असंच वागावंसं वाटलं. माझी कुणावर सक्ती नाही बरं का!. मला वाटतं, आपल्या गोष्टीसुद्धा आपण करण्याची सवय नाही आपल्याला, मग सार्वजनिक गोष्टी कशा करणार?’’ असं म्हणून ते निघाले. कुणीतरी चेष्टा केली. ‘‘आजपासून शिपायांना सुट्टी.’’ सर फक्त हसले. म्हणाले, ‘‘कुणावर काय परिणाम होतो ते उद्या बघू. ज्यांच्यावर परिणाम होणं अपेक्षित आहे तेवढा झाला तरी पुष्कळ.. आणि खरं तर तीही अपेक्षा नाही. मला स्वत:ला खूप बरं वाटतंय या स्वच्छतेमुळे..’’
  सरांच्या स्वत:च्या उदाहरणामुळे पडलेले कागद उचलायची मुलांना सवयच झाली. इतकंच नव्हे तर वाचनालयात पुस्तकं न नोंदवता जागेवरून बाहेर येऊ लागली नि परत जागेवर जाऊ लागली. गुलजार, रश्दी यांच्या पुस्तकांबद्दलच्या कवितांची सुलभ भाषांतरं फळय़ावर दिसू लागली. पुस्तकांची पानं दुमडणं, पुस्तकांना गुंडाळणं सवयीनं कमी कमी होऊ लागलं. मात्र त्यासाठी मुलांशी बोलावं लागलं, त्यांना उदाहरणं द्यावी लागली. प्रात्यक्षिकं करून घ्यावी लागली. ‘‘आपला एक हात आज दोन तास दुमडून राहू या.’’ या प्रयोगावर मुलं म्हणाली, ‘‘पुस्तकं निर्जीव आहेत. त्यांना दुमडून रहायचा काय त्रास असतो. आणि शिवाय फाटलं पुस्तक तर आपण नवं आणू शकतो..’’
पुस्तकाचं सजीवपण सांगायला, हे घडायला मात्र वेळ गेला. एका कार्यानुभवाच्या तासाला बाईंनी ‘बुकमार्कस्’ करून घेतले. गोष्टी वाटेल तशा वापरल्या तरी चालतात या समजुतीला तडा जाऊ लागला. याने शाळा सुखावली होती. अशा अनेक गोष्टींची सवय फक्त मुलांना लागून चालत नाही. सगळय़ांनाच लागावी लागते. त्याचा प्रयोग सुरू झाला.. प्रार्थनेला येताना मुलं काही नोंदी करून घेण्यासाठी वह्य़ा आणायची. राष्ट्रगीत-प्रतिज्ञा झाल्यावर बसायला सांगितलं जायचं. त्याआधी ‘सावधान’मध्ये उभं राहताना मुलं उभ्यानं वह्य़ा खाली टाकायची. धडाधड आवाज व्हायचे. कुणालाच काही वाटायचं नाही. मग एके दिवशी प्रार्थनेनंतर बाई म्हणाल्या, ‘‘आपण आता वह्य़ा हातात घेणार आहोत आणि आवाज न करता खाली ठेवू सगळय़ांनी, अलगद. कारण वह्य़ांना पण लागतं. आपल्याला लागेल ना कुणी फेकल्यावर.! तुम्ही म्हणाल, ‘‘वह्य़ा निर्जीव, बाकं निर्जीव, पुस्तकं निर्जीव. पण मग त्याच्याबरोबर असं वागणारी आपण माणसंपण निर्जीवच ना!’’ हळूहळू मुलांच्या कृतीत बदल झाला. आणि आता मुलं सभागृहात येतात नि प्रार्थनेसाठी वह्य़ा जमिनीवर ठेवतात तेव्हा अजिबात आवाज येत नाही.
हा सगळा बदल ही शाळा बघत होती नि समाधानाने श्वास घेत होती. शाळा बघायला येणारे विचारत, तुम्ही हे सगळं कसं करता? मुलं इतक्या ओळीने कशी जातात? वर्गातून ओळीत कशी बाहेर पडतात? गेट बंद करतात. आणि कितीतरी सवयी आम्ही बघतोय. आम्हाला त्या जाणवतायत. आमचा प्रश्न आहे, हे कसं शक्य आहे?  तेव्हा त्या शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं, ‘तुमच्या मते चांगल्या सवयी कोणत्या आणि वाईट सवयी कोणत्या’ असा प्रश्न विचारून मुलांना आम्ही चक्क यादीच करायला सांगितली. आम्हालाही नवल वाटलं. मुलांना चांगलं वाईट यातला फरक किती स्पष्ट कळतो. मग एकदम सगळं काम नाही करायला घेतलं. नियोजन केलं. कोणत्या पद्धतीनं काम करायचं यावर विचार केला. ‘आनंद’ हा गाभा ठेवून. आपण चांगले वागतो यावर विश्वास ठेवायला शिकायचंय असं ठरवलं. मग वेगवेगळय़ा उपक्रमांतून, कार्यक्रमांतून, दैनंदिन घटनांतून अनेक वाईट सवयी बाजूला केल्या.
शाळेतून जेव्हा मुलं बाहेर पडतात तेव्हा ‘नजरियाँ’ बदलतो पाहणाऱ्याचा. कधी कधी चांगल्या सवयींचा त्रास होतोच. झाला तर समोरच्यात बदल होतोही..
ऐकणाऱ्या शाळा अवाक् झाल्या होत्या नि शाळा मनापासून समाधानाने हसत होती..

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Loksatta lokshivar Agriculture Business Milk business animal husbandry
शेती नसणाऱ्याची धवलक्रांती!
Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…