आता खरं म्हणजे घरी परतायची वेळ झाली होती, पण पावलं मात्र पुढचीच वाट धरत होती. फर्लागभर गेले असेन, जुन्या घराच्या समोर असलेल्या एका डेरेदार झाडाच्या सावलीला आपली छोटी टपरी टाकून धंदा करणारा दामू चांभार माझ्यासमोर दत्त म्हणून उभा, या वेळी मात्र मीच बोलायला सुरुवात केली..

रोजच्यासारखी सकाळी फिरायला बाहेर पडले. रस्ताबदल हवा वाटला म्हणून आमच्या जुन्या घराकडे जाणारी वाट धरली. अलीकडे घरात एकटी असले की स्वत:ला तपासून बघण्याचा नाद मला लागलाय. उगीचच म्हणजे असं- काल दिवसभरात आपण काय केलं, कुणाकुणाशी किती कसं काय बोललो वागलो ते सारं बरोबर होतं का? नसलं तर आपण नेमकं कुठं चुकलो वा गैर वागलो, वेगळं कसं वागायला हवं होतं? असा नातेसंबंधाच्या गुंत्याचा एक विचित्र शोध मनात सतत चालू राहतो. स्वत:ला कमी लेखत सतत पडती बाजू मी का घेत राहते याचा जणू शोध घेत असते.
विचारांच्या अशा कल्लोळात बुडालेली असतानाच समोरून येणारी एक वृद्धा मला पाहताच एकदम थांबली. हातातील दोन जड पिशव्या खाली टेकवत, जवळ येऊन मला निरखीत मोठय़ा आवाजात एकदम म्हणाली, ‘‘तू होय. बरोब्बर ओळखलं मी, कशी आहेस?’’ तिच्या शब्दांतून अवचित भेटीचा आनंद ओसंडत होता.
क्षणभर गोंधळले. चटकन संदर्भ लागेना. माझ्याकडं जरा निरखून पाहात तीच पुढं बोलू लागली.
‘‘अगं असं काय करतेस. रोजच्या रोज सकाळी भाजी घेऊन येत नव्हते का मी तुझ्या दारी?’’
आता माझी टय़ूब पेटली. तेव्हाची ती एकदम उभीच राहिली माझ्या डोळय़ापुढं काच्या मारून चापूनचोपून नेसलेलं नऊवारी लुगडं, धारवाडी खणाची चोळी उन्हापावसानं रापलेला चेहरा, त्यावरील मोठं कुंकू, बोलके डोळे, जोडीला मोठ्ठा घुमणारा आवाज. डोक्यावर भाज्यांची जाड पसरट टोपली, नव्या जागेत राहायला आल्यानंतरची पहिली अकल्पित भेट!
‘‘लई दिसांनी पहात्येय बघ तुला. ती बी रामप्रहरी. ग्वाड वाटलं. आज माझी समदी भाजी खपणार बघ!’’
क्षणभर मी अवाक्! केवढा हा भोळा आशावाद, निव्र्याज मनाचा. मग ती एकटीच काहीबाही बोलत राहिली. मुलांची आठवण काढीत. माझी मुलं लहान. शाळकरी वयात होती, तेव्हा ही ऋतुमानानुसार वेगवेगळय़ा भाज्या आणायची. कधी मी सांगेन तशा शेतावरच्या ताज्या रसरशीत. वाटे बाजूला काढूनच ठेवायची ती माझ्या नावाचे. हवी नको- कमी जास्त- सवालच नसायचा. मुलांचा तो एक चेष्टेचा विषय असायचा. माझ्या भोळेपणाचा-माझ्या लेखी तिच्या पोटाची काळजी..
बरेचदा त्या ऋतूत मिळणारी अस्सल फळेही आणायची. फळं तरी कोणती तऱ्हेतऱ्हेचे गावठी रायवळ आंबे- चोखून खाण्याजोगे, आंबटगोड बोरं- काळी बोरं- रसरशीत करवंद- गाभुळलेल्या चिंचा- राय आवळे, चण्या मण्या बोरं असा अस्सल रानमेवा. ‘स्वस्त-मस्त- मुलं करीत फस्त’ असा सारा ‘आनंदाचे डोही-आनंद तरंग.’
बऱ्याच वेळानं माझी समाधी भंग पावली. लक्षात आलं की तिच्याशी काहीच बोललेली नाही! मग सहज म्हटलं, ‘आणि या दोन पिशव्यातनं काय ठेवलंयस गं?’ तिकडं बघत म्हणाली, ‘अगं भाजीच आहे त्यात आणि काय असणार?’ उदास वाणीनं पुढं म्हणाली, ‘आता पहिल्यावानी जड टोपली नाय गं पेलवत डोक्याला..’
मी एकदम शरमले. माझ्या एका अनाठायी प्रश्नानं हिचा निरागस आनंद गढुळणार तर नाही? माझी मलाच लाज वाटली. खूप राग आला स्वत:चा. पण ती आपल्याच नादात होती. माझा हात हाती घेत एकदम जायलाच निघाली. ‘एवढी सारी भाजी खपवायचीय ना,’ मनाशी पुटपुटली. एकवार माझ्याकडे पाहात म्हणाली, ‘जपून जा गं बायो- दीस लई खराब आल्येती’ तिच्या या नकळत बाहेर पडलेल्या उद्गारांना माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
चालत चालत आणखी थोडी पुढं आले. मन मात्र मागंच रेंगाळत होतं.. आणि एकदम फुलांचा सुवास दरवळला. नाकातनं शिरत देहसर पसरू लागला. लक्ष देऊन वेध घेतला तर जुना फुलवाला दिसला.. तोच आनंदी निर्मळ चेहऱ्याचा. आपल्या नेहमीच्या बसायच्या जागेवर झाडू फिरवत होता. त्यानं आणलेल्या वेगवेगळय़ा फुलांच्या संमिश्र सुवासानं आसमंत भरून राह्य़ला होता. माझा नूर पालटला. सुगंधाच्या त्या गळामिठीनं एकदम प्रसन्न वाटलं. सकाळी ही वाट निवडताना हे ध्यानीमनीही नव्हतं. पावलं आपसुक गंधाचा मागोवा घेऊ लागली. फुलवाल्याच्या जवळ जाताच त्याच्या नजरेनंच ओळख पटवली. निर्मळ भावनेनं उत्साहात उद्गारला.
‘‘या ताई, पाहा आज किती प्रकारची फुलांनी शिगोशीग टोपली भरलीय ती- तुमच्या आशीर्वादानं तुमच्या आवडीचा बट मोगरा, झालंच तर पिवळा गुलाब ही गावलाय आज. तुम्हाला खूप आवडायचा, नाही का?’’
मी थिजलेच जागच्या जागी! मला आवडणारी फुलंसुद्धा याला लक्षात आहेत याच्या. गुलाब घेण्यापलीकडे काय दिलं मी याला? मी पार हरवूनच बसले जणू स्वत:ला. मग लक्षात आलं, शेजारी उभ्या असलेल्या एक बाई मला हलवून काही सांगू पाहात होत्या!
‘अहो, तो फुलवाला तुम्हाला काही विचारतोय, बऱ्या आहात ना तुम्ही..’
मी भानावर.. ‘सॉरी हं.. माझं लक्ष नव्हतं.’
‘‘लई दिसांनी दिसताय आज, कुठं राहाता आताशी’’ माझ्या उत्तराची वाट न बघता, तोच पुढं सांगू लागला.
‘‘तिकडंही अशीच सुंदर फुलं मिळत असतील ना, की याहून छान..?’’
‘‘मिळतात हो. ऋतूप्रमाणे सर्व मिळतात, पण खरं सांगू तुमचीच फुलं मला जास्त आवडायची..’’
‘‘असं काही नसतं बाई,’’ निव्र्याज मनानं तो सांगू पाहात होता. फुलं ती फुलंच शेवटी सुवास घेऊनच उमलणार बघा..
‘‘आज ही सगळी फुलं हातोहात खपणार बघा. तुमच्या हातची भवानी शकुनाची,’’ माझ्या ओंजळीत पिवळय़ा गुलाबाचे एक फूल घालत उद्गारला.
मी अचंबित – या अवचित प्रसादानं.
फुलांसारख्या नाशवंत व्यवसायावरची निष्ठाच जणू त्याच्या वाणीतून नकळत बोलत होती. अशी ऊर्जा कुठून मिळत असेल याला. फुलांच्या संगतीचा लाभ असाही असू शकतो.. मी चक्रावले.
आता खरं म्हणजे घरी परतायची वेळ झाली होती, पण पावलं मात्र पुढचीच वाट धरत होती. फर्लागभर गेले असेन, जुन्या घराच्या समोर असलेल्या एका डेरेदार झाडाच्या सावलीला आपली छोटी टपरी टाकून धंदा करणारा दामू चांभार माझ्यासमोर दत्त म्हणून उभा, या वेळी मात्र मीच बोलायला सुरुवात केली..
‘‘कसा आहेस- अजून धंदा करतोयस ना?’’ एकवार माझ्याकडे बघत त्यानं मान डोलावली. होकार भरला.
‘‘झेपण्याएवढंच काम राह्य़लंय आता..’’
‘‘म्हणजे?’’ माझी अडाणी शंका..
माझं अगाध ज्ञान क्षणभर मनाआड करत तो सांगायला लागला, ‘अहो, ताई, चप्पल, बूट शिवून द्यायचा माझा धंदा, जोरात कसा काय चालणार बघा- आजकालच्या फॅशनच्या चपलांना दुरुस्ती कशी ती ठाऊकच नसते म्हणा ना-
जितक्या अधिक फॅशनेबल तितक्या नाजूक, तकलादू, त्यांना कसलीही दुरुस्ती-शिलाई मारायची तरी कुठं. चार-पाचदा वापरल्या की टाकून देण्याच्या लायकीच्या.
मला हसू आवरेना. ‘वापरा आणि फेका’ हे आजचे घोषवाक्य. त्याच्या भाषेत त्यानं उभं केलेलं वास्तव चित्र. आपल्या पोटापाण्याच्या धंद्यावर आलेली गदाही त्यानं किती ताकदीनं तरीही सहजपणे स्वीकारलेली जीवनाविषयीचं हे ‘सार’ कुठून कसं मिळवलं असेल या निरक्षर माणसानं, त्यासाठी पुस्तक नव्हे, प्रत्यक्ष जगणंच उपयोगी पडलं असेल का त्याला? दुसरीकडे मला थोडी गंमतही वाटत होती. या फॅशनच्या दुनियेची. एक काळच्या पायताणाच्या क्षेत्रातील केवढी ही उलथापालट!
दामू छत्र्या दुरुस्तीही करायचा, पण चपलेसारखीच क्रांती छत्र्यांच्या विश्वातही झालेली असल्यामुळे सुज्ञपणे मी त्याबद्दल मौन स्वीकारले! तरी त्याला बरंच काही सांगावंसं वाटत होतं.
दुरुस्तीला जास्तीचं काम आलं नाही. तरी काही बिघडत नाही बघा. माझ्यासारखी आणखी दोघं-चौघं घटकाभर माझ्यासंग बसतात. गावाकडच्या शेतीवाडीतील पीकपाण्याचं सांगतात. तिकडील खुशाली समजते. बरं वाटतं. जीव हलका होतो.’
‘‘म्हणजे अजून इथं बसून काम करायची उमेद वाटते तुला?’’
‘‘काय आहे बाई, हात-पाय चालतात तोवर करायचं. घरात बसून उगीच किटकिट करण्यापेक्षा.. आता मुलं कमावतात. माझा पैसा चहा-पाण्याला, पान-सुपारीला, विडी-काडीला पुरतो. आता आणखी काय मागायचं अन् कशापायी?’’
दामू इतकं सहज बोललां, जणू स्वत:शीच बोलत होता. मी जायला निघाले तशी म्हणाला, ‘‘आज सहज गाठ पडली- ओळख दिलीत. खुशाली कळली- बरं वाटलं. या आता-जपून जा..’’
त्याचा निरोप घेऊन परतीची वाट धरली. स्वस्थ चित्तानं. माझ्या सर्व (तथाकथित) कूट प्रश्नांचा- शंकांचा एव्हाना सहजी निचरा झाला होता!
प्रभा हर्डीकर – chaturang@expressindia.com