घराबाहेरचं वादळ म्हणजे एक संयमी, सरावलेला खुनी असल्यासारखं भासलं.. क्षणाक्षणाला चमचमणाऱ्या हिमकणांची पखरण करत करत एक थंड तरी शाश्वत पाश आवळत जाणारा वाकबगार खुनी.. नीरव शांततेची, शुभ्र हिमकणांची कधी भीती वाटेल असं वाटलं नव्हतं.. आणि त्याच्यापुढे मनुष्य असण्याचं खुजेपण मनात खोल झिरपत राहिलं..
आम्ही दूरचित्रवाणी संच वापरणं दोन वर्षांपूर्वी सोडून दिलं. त्यानं आजूबाजूच्या घटना अधिक डोळसपणे अनुभवू लागल्याचं जाणवलं होतं. प्रसंग अगदी काल-परवाचाच, आमच्याकडे बोस्टनला ‘जुनो’ या हिमवादळाचा तडाखा बसला.. त्याबद्दलच्या सर्व चर्चा आणि मीमांसा प्रसिद्धी माध्यमांनी दिवसभर केल्या, भयावह भाकिते केली. आम्ही मात्र याबद्दल अनभिज्ञ होतो! कसे जगलो ते ४८ तास याचा एक अनोखा अनुभव.
 बोस्टनच्या आमच्या शेजाऱ्याने येऊन आदल्या दिवशी हिमवादळाची माहिती दिली तरी त्याचं बोलणं आम्ही फारसं गांभीर्यानं घेतलं नव्हतं. त्या आधीच शनिवारी आम्ही पहिल्यांदाच बर्फ पडल्याचा आनंद एक स्नोमॅन बनवून साजरा केला होता! सोमवारी सकाळी जेव्हा फोनवरून सरकारी इशारे आले, तेव्हा वाणसामानाच्या दुकानाकडे धाव घेतली. तिथं एकच झुंबड उडालेली, बर्फ वितळवण्यासाठी लागणारे खडेमीठ संपूर्णपणे संपलं होतं, दुध, अंडी, पावाचे साठे झपाटय़ानं तळ गाठत होते. संपूर्ण न्यूयॉर्क, न्यू इंग्लंड परिसरात हीच परिस्थिती होती. सगळ्यातून कशीबशी सामान घेऊन निघाले तर दुपारी दोन वाजता एरवी मोकळा असलेला महामार्ग खच्चून भरलेला! सर्व शाळा, कार्यालये दुपारीच मोकळी करण्यात आली होती. वाटेत मेमा(Massachusetts  Emergency Management Agency)चे मुख्यालय होते, तिथे दीडशेहून अधिक  snow ploughs ताफा सज्ज होता.
सोमवारी संध्याकाळी ७ नंतर हळूहळू वातावरण पालटू लागलं.. धूसर होत होत आसमंत पूर्ण काळवंडला.. रात्र चढू लागली तसा वाऱ्याने जोर धरला.. वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता वर्तवल्याने गरम कपडे घालून, जवळ बॅटरी आणि फोन ठेवूनच झोपलो. वाऱ्याचा आवाज घुमू लागला.. रात्रीतून वीज गेली नाही, मात्र त्या धास्तीने जाग येत राहिली.. पहाटे उठून बाहेर पाहतो तो दृश्य पूर्ण पालटलेलं.. आमच्या घरापासून रस्त्यापलीकडल्या घरापर्यंत एकच मोठा बर्फाचा गालिचा अंथरलेला होता! ना रस्ता, ना अंगण, ना घरासमोरच्या पायऱ्या! काहीच दिसत नव्हतं! वाऱ्याचं थमान सुरूच होतं.. हिमकण इतके झपाटय़ाने पडत होते की काही फुटापलीकडे काहीच दिसत नव्हतं. आमच्या संपूर्ण राज्यात आणीबाणी घोषित होती, त्याचबरोबर सर्व नागरी सुविधा, दळणवळणाची साधने, पोस्ट खाते सर्वच बंद होते. राज्यभर स्वत:च्या वाहनानं प्रवास करण्यावर बंदी होती. न्यूयॉर्क शहराला हुलकावणी देत हिमवादळ अमेरिकेच्या पूर्वी आणि उत्तर-पूर्वी राज्यात-न्यू इंग्लंड परिसरात पाहुणचाराला दाखल झालेलं होतं.. इंटरनेटवरून निरनिराळ्या बातम्या कळत होत्या. आमच्या घरापासून ४०-५० मिनिटांवर असलेल्या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला हे कळल्यावर मोठाच धक्का बसला! कारण बाहेर संपूर्ण घराला दोन ते अडीच फूट उंच बर्फाचा वेढा पडलेला, बाहेर प्रति ताशी ५५-६५ कि.मी. वेगाने वारे वाहत होते आणि राज्यभर वाहन बंदी! आणि विजेवर सगळीच भिस्त होती.. घरात तापमान नियंत्रण यंत्रणा विजेवर चालणारी, पाणी वाहते ठेवून, गरम ठेवणारी यंत्रणा वीज नियंत्रित, अन्नाची शेगडी विजेवर चालणारी, फोन व इतर संपर्क साधनांना वीज हवीच आणि बाहेर १० डिग्री तापमान, अशात वीजपुरवठा खंडित झाला तर मोठाच गंभीर प्रसंग उद्भवला असता.. भारतात घरच्यांना फोन करून खुशाली कळवली खरी, मात्र मनात धास्ती कायम होती.. बाहेर बर्फावर नजर ठेवत दुपारची जेवणे उरकली. सकाळपासून ६ तास उलटले तरी वाऱ्याचा जोर ओसरेना.. हिमवादळे तशी अनेक अनुभवली आहेत, अमेरिकेत आणि त्या आधी रशियामध्ये, मात्र आता सोबत अडीच वर्षांची मुलगी असल्यावर एक निराळीच चिंता मन पोखरत राहिली. खूप वेळ खिडकीखालच्या बर्फाची वाढणारी पातळी पाहत राहिले. मनुष्याचं, मनुष्य असण्याचं खुजेपण खोल झिरपत राहिलं..
बाहेरचं वादळ म्हणजे एक संयमी, सरावलेला खुनी असल्यासारखं भासलं.. क्षणाक्षणाला चमचमणाऱ्या हिमकणांची पखरण करत करत एक थंड तरी शाश्वत पाश आवळत जाणारा वाकबगार खुनी.. नीरव शांततेची, शुभ्र हिमकणांची कधी भीती वाटेल असं वाटलं नव्हतं.. िहदी प्रेमपटातला हिमवर्षांव कायमच सुखद, तर हा प्रत्यक्षात आज फार जास्त भयावह.. शांत तरी क्रूर भासणारा..
गेल्या १२ तासांत २८ ते ३० इंच बर्फ जमा झाला होता.. या संपूर्ण परिसराचे ७० वर्षांचे उच्चांक मोडीत काढत ‘जुनो’ हे हिमवादळांच्या यादीत खूप वर जाऊन बसणार अशी चिन्ह दिसू लागली.. कुठेतरी आत अजून एक थरारक अनुभव गाठीशी आल्याचा आनंद होत होताच.. कारण मागच्याच वर्षी polar vortex दरम्यान उणे २७ अंशापर्यंत उतरलेला पारा प्रत्यक्ष अनुभवला होता.. तब्बल २० तासांनी वादळाचा जोर किंचित ओसरला! कपडय़ांचे चार-चार थर घालून घराचे दार उघडू लागलो तो दार बाहेरच्या बर्फामुळे जाम झालेलं! घरासमोरल्या पायऱ्या खोदून काढल्या तोच स्नोमॅनच्या जागी नुसताच ४ फुटी बर्फाचा ढीग आढळला! ३ तास खोदल्यावर एक पायवाट आणि आमच्या दोन गाडय़ा बर्फाच्या कचाटय़ातून मुक्त झाल्या! हे होईपर्यंत अंधाराचे साम्राज्य पुन्हा पसरू लागले आणि वादळाने पुन्हा उसळी मारली.. पुन्हा घरात येऊन बर्फाने भरणारी पायवाट बघत राहिलो!
तितक्यात फोनवरून काही संदेश आले.. गेल्या २४ तासांत २४०० सफाई कामगार snow ploughs  घेऊन सर्व महामार्ग आणि राज्यातले रस्ते साफ करत होते. पोलीस पथके डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना इस्पितळात ने-आण करत होती.. अनेक रहिवाशांनी खासगी – सरकारी यंत्रणेला तात्पुरती देऊ केली होती.. आणि एक वैद्यकीय कर्मचारी तर चक्क या वादळात मलोन् मैल चालत लहान मुलांच्या इस्पितळात रोजच्या कामाच्या वेळेत रुजू झाला!
     पुन्हा बाहेर बघितलं तर आता तेच वादळ तितकं भयावह वाटलं नाही, मनुष्याच्या दुर्दम्य अशावादासमोर, जिद्दीसमोर सारीच वादळे थोडी खुजी वाटू लागतात हेच खरं..
प्राजक्ता पाडगावकर -praj.padgaonkar@gmail.com