गच्चीत/ बाल्कनीत बाग साकारताना जागेचे नियोजन महत्त्वाचे असते. त्यामुळे कुंडय़ांबरोबर, नर्सरी बॅग्जही सोयीच्या पडतात. नर्सरीत अगदी सहज त्या उपलब्ध होतात व विविध आकाराच्या या बॅग्समध्ये फुलझाडे किंवा भाजीपाला घेता येतो. या विविध आकारांत म्हणजे अगदी ५ बाय ५ इंचापासून १६ बाय १६, १८ बाय १८ अशा उंची व व्यासाच्या आकारात मिळतात. आपल्याकडील उपलब्ध जागेचा विचार करून त्या आकाराच्या पिशव्या निवडाव्यात. योग्य माती व पोषण मिळाल्यास कोणतेही झाड वाढू शकते. या बॅग्स टिकावू असतात. दोन ते अडीच वर्षे सहजपणे कडक उन्हातही टिकू शकतात. यात रिपॉटिंग करणे अगदी सोपे. दक्षिण भारतात आता या  पिशव्या रंगीतही मिळतात, पण काळ्या रंगाच्या पिशव्या नेहमीच चांगल्या. कारण झाडांचे मूळ व गांडूळ वाढण्यासाठी आतील अंधार आवश्यक असतो. पारदर्शक पिशव्यात झाडवाढीची अर्थात मुळेवाढीची संख्या व गती कमी होते. या बॅग्स भरताना वरील कडा बाहेर दुमडून घ्यावी म्हणजे पाणी देताना पिशवी सरळ उभी राहते. तसेच बॅग्स उचलताना तळाशी आधार द्यावा. वरील बाजूने धरल्यास पिशवी ताणू किंवा फाटू शकते. नर्सरी बॅग्सचा हा पर्याय सर्वात स्वस्त व अनेक अर्थाने सोयीस्कर आहे.
 नर्सरी बॅग्जप्रमाणे आपल्याकडे जमा होणाऱ्या अनेक पिशव्या झाडे- लावण्यास उपयुक्त ठरू शकतात. जसे की आपण पाश्चराइज्ड दूध घेतो. या दुधाच्या पिशव्या अगदी- पाव लिटर ते अर्धा लिटरच्या का असेना उपयुक्त असतात. या पिशव्यांच्या मदतीने आपल्याला छोटी रोपवाटिका तयार करता येतेच शिवाय दीड ते दोन महिने रोप त्यात तग धरू शकते. तसेच तेला-तुपाच्या पिशव्यांमध्ये मोहरी, पुदीना, व भुईमुगांच्या शेंगाही घेता येतात. यांचा आकार लहान असल्यामुळे कुठेही मांडणी करता येते. या पिशव्या टिकतात व सहज उपलब्ध होतात. आपण आरंभकत्रे असाल व कमी खर्चात बाग फुलवायची तर अशा पर्यायापासून सुरुवात करायला हरकत नाही.
संदीप चव्हाण – sandeepkchavan79@gmail.com