हिपाटायटिस ‘ए’ किंवा ‘ई’ विषाणूंमुळे होणारी ‘साथीची कावीळ’ वर्तमानपत्रांमधून लगेच झळकते. पण हिपाटायटिस ‘बी’ किंवा ‘सी’ विषाणूंची बाधा ही सर्वसाधारणपणे वैयक्तिक पातळीवर व बऱ्याच वेळा कोणतीही लक्षणे दाखवीत नसल्याने आम जनतेलाच काय पण ज्याला त्यांची बाधा झालेली आहे त्याला देखील माहीत नसते. त्यामुळेच या हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ विषाणूला ‘छुपे रुस्तम’ असे म्हणावे लागेल.
दूषित अन्न-पाण्यावाटे हिपाटायटिस ‘ए’ विषाणूंमुळे होणारी कावीळ बहुतेकांना माहिती असते. अनेक यात्रांच्या किंवा तत्सम गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक मलमूत्र विसर्जनाच्या सोयींवर अवास्तव ताण आल्यावर, अनेकदा सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या ठिकाणी अनभिज्ञपणे मलमूत्र विसर्जन केले जाते. हिपाटायटिस ‘ए’ विषाणूंनी बाधित असलेल्या एखाद्यामुळे संपूर्ण सार्वजनिक पाणीपुरवठाच दूषित होतो व मोठय़ा संख्येने हिपाटायटिस ‘ए’ विषाणूबाधित लोकांच्या संख्येत अचानक वाढ होते. अशा हिपाटायटिस ‘ए’ विषाणूंमुळे बाधित झालेल्या लोकांना ‘यकृताचा दाह’ (Hapatitis) सुरू होतो. त्यांना उलटय़ा, जुलाब, मळमळ, ताप सुरू होतो. यकृताला सूज आल्यामुळे पोटात उजव्या बाजूला, बरगडय़ांच्या खाली दुखू लागते. यथावकाश डोळे, मूत्र, जीभ, नखे पिवळी पडू लागतात. याला ‘साथीची कावीळ’ असे म्हणतात. योग्य विश्रांती, आहार व पथ्ये पाळून, साधारणपणे महिना-दीड महिन्यात असे रुग्ण नैसर्गिकपणेच ठणठणीत होतात. यकृत पुन्हा पूर्ववत कामाला लागते व त्याला झालेल्या इजेचा मागमूससुद्धा मागे शिल्लक राहात नाही.   
क्वचित प्रसंगी मोठय़ा शहरातील सदोष व्यवस्थेमुळे मानवी मलमूत्र व पिण्याचे पाणी एकमेकांत मिसळले जाते. त्यावेळी सुद्धा काविळीची साथ संपूर्ण शहरात पसरते. हिपाटायटिस ‘ए’ ऐवजी ‘ई’ विषाणूंमुळे पसरलेल्या अशा जगातील सर्वात मोठय़ा काविळीच्या साथीला काही वर्षांपूर्वी भारताची राजधानी दिल्लीला सामोरे जावे लागले होते.
सहज न जाणवणारे हे विषाणू लक्षात येतात तरी कसे? यासाठी काही विशेष प्रयोगशालेय तपासण्या कराव्या लागतात. गरोदरपणात किंवा नवीन नोकरीत भरती होताना अथवा एखाद्या अतिदक्षता रुग्णालयात रुग्ण म्हणून प्रवेश घेताना किंवा शस्त्रक्रियेपूर्वी केल्या जाणाऱ्या दैनंदिन प्रयोगशालेय तपासण्या, रक्तदानाच्या वेळी रक्तदात्याच्या रक्तावर, रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी केल्या जाणाऱ्या प्रयोगशालेय तपासण्या,आरोग्य विमा उतरवताना केल्या जाणाऱ्या प्रयोगशालेय तपासण्या अशा ‘प्रसंगविशेषी’ हिपाटायटिस ‘बी’ च्या विषाणूंची लागण झालेली असल्याचे लक्षात येते.
नैसर्गिकपणे महिना-दीड महिन्यात बरी होणारी कावीळ दीर्घकाळ रेंगाळली, तर डॉक्टरांना हिपाटायटिस ‘ए’ किंवा ‘ई’ विषाणूंऐवजी, हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ च्या विषाणूंमुळे कावीळ झाल्याची शंका येऊ  लागते. काही डॉक्टर रुग्णाचा विशिष्ट इतिहास लक्षात घेऊन काविळीच्या सुरुवातीलाच ही प्रयोगशालेय तपासणी करण्यास सांगतात. ‘ऑस्ट्रेलिया अन्टीजेन’ नावाच्या या तपासणीमध्ये हिपाटायटिस ‘बी’ या विषाणूंची रक्तामधील उपस्थिती तपासली जाते. तर हिपाटायटिस ‘सी’ या विषाणूंच्या तपासणीसाठी (Anti-HCV)  शरीराने त्याला दिलेला प्रतिसाद तपासला जातो.
हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ चे हे विषाणू मानवी शरीरात शिरण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ विषाणूंमुळे बाधित झालेले मानवी पदार्थ (उदा.रक्त, वीर्य, लाळ, योनीचे स्राव असे मानवी द्रव), हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ विषाणूंची लागण नसलेला मानवी रक्तप्रवाह व या दोन्ही गोष्टींना एकत्र आणणारे एखादे माध्यम (उदा. अनारोग्यकारक लैंगिक संबंध, अस्वच्छ अशी गोंदण्याची, केशकर्तनालयातील, शस्त्रक्रियेची, वा दंत वैद्यालयातील हत्यारे, अस्वच्छ  इंजेक्शनच्या सुया किंवा डायलिसीससारखी वैद्यकीय यंत्रे इ.) या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ विषाणूंची लागण होण्याची शक्यता असते.
जर काहीही त्रास होत नाही तर या हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ विषाणूंकडे एवढे लक्ष द्यायचे कारण तरी काय?  जोपर्यंत हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ विषाणू काहीही त्रास देत नाहीत तोपर्यंत असा विचार मनात येणे साहजिकच आहे. पण ते त्रास द्यायला लागतील तेव्हा कदाचित खूप उशीर झालेला असेल. कदाचित यकृत कायमचे बाद झालेले असू शकेल. अशा वेळी मग यकृत रोपणाशिवाय पर्याय राहणार नाही. सुदैवाने पुणे शहरात याची सोय आता तरी उपलब्ध झालेली आहे.
असा कोणता त्रास हे हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ चे विषाणू देऊ  शकतात? त्यांच्यामुळे होणारा यकृतदाह दीर्घकाळ चालू राहिला तर शेवटी यकृताच्या पेशींचा नाश होतो. या नाश झालेल्या पेशींच्या ठिकाणी यकृताच्या रक्तप्रवाहाच्या मार्गावर,  रुग्णाचे शरीर, छोटे छोटे असंख्य बांध बांधते(Liver cirrhosis). त्यामुळे यकृताचा रक्तप्रवाह अवगुंठीत होतो. त्यामुळे आतडय़ांकडून यकृताकडे जाणारा रक्तरस पोटात साठू लागतो. पोटाचा नगारा होतो (Ascitis). पोटावरील, अन्न नलिकेतील व गुद्द्वारातील रक्तवाहिन्या फुगू लागतात. फारच फुगल्या तर ताणाने फुटू लागतात (Haemorrhages) वेळीच लक्ष दिले नाही तर ही गोष्ट प्राणावर बेतते. हळूहळू यकृत काम करेनासे होते. यकृताचे काम पूर्णपणे थांबले की मृत्युघंटा वाजू लागते. अशा वेळी दुसऱ्याचे यकृत उधार आणण्याशिवाय गती राहात नाही. हे काम अत्यंत खर्चीक असते.
हे सर्व टाळण्यासाठी हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’  विषाणूंची लागण झालेल्या व्यक्तींवर, जे अजूनही रुग्णावस्थेत गेलेले नाहीत(Asymtomatic carriers),  त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असते. यकृतदाह अजूनही चालू आहे का, हे कळण्यासाठी यकृताच्या कार्यावर, विशेषत: त्याच्या वितंचकांवर (Enzymes- S.G.P.T) करडी नजर ठेवणे,  विषाणू बाधेची व्याप्ती समजण्यासाठी विषाणूंची संख्या मोजणे  (Viral load), येऊ  घातलेल्या शारीरिक लक्षणांकडे(अग्निमांद्य – भूक न लागणे, पोटाचा घेर वाढणे, शिरा फुगणे, रक्ताची उलटी होणे, मूळव्याध इ.) लक्ष ठेवणे अशी कामे वैद्यकीय व्यावसायिकांना विशेषत: यकृत तज्ज्ञांना (Hepatologist/Gastro Enterologist) करावी लागतात. विषाणूंची संख्या खूपच जास्त असल्यास यकृत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली औषध योजना सुरू करून ती कमी करता येते.
आतापर्यंत आपण हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ विषाणूंची लागण झाल्यानंतर काय करता येते याबद्दलची माहिती घेतली. पण ही लागणच होऊ  नये म्हणून काय करता येईल? हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ चे विषाणू,  हिपाटायटिस ‘ए’ प्रमाणे दूषित अन्न-पाणी या वाटे प्रसारित होत नसल्यामुळे स्वच्छतेचा मुद्दा येत नाही. हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ विषाणूंची लागण झालेल्या व्यक्तीचे दूषित रक्त,  लाळ,  वीर्य, योनीस्राव इ. गोष्टी दुसऱ्या निरोगी व्यक्तीच्या रक्त प्रवाहाच्या संपर्कात येणार नाहीत याची मात्र  काळजी घ्यायला हवी. असा संपर्क जेथे जेथे, ज्या ज्या माध्यमातून घडू शकेल ते ते सर्व मार्ग बंद केले पाहिजेत. ती ती संपर्काची साधने एक तर टाळली पाहिजेत किंवा टाळता येणे शक्य नसेल तर सुरक्षितपणे वापरली पाहिजेत. हे सर्व येथे सविस्तर सांगणे विस्तारभयास्तव शक्य नाही व त्याची गरजही नाही. प्रत्येकजण सूज्ञ आहे.
त्यामुळे वैयक्तिक अडचणी व प्रतिबंधाचे वैयक्तिक मार्ग यांचा विचार करण्यापेक्षा आपण हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ विषाणूंच्या प्रतिबंधाचे सार्वत्रिक मार्ग यांचा विचार करू. पती-पत्नींकडून एकमेकांकडे, रक्तदात्याकडून रक्तग्राहकाकडे व मातेकडून बालाकडे या हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ विषाणूंच्या प्रसाराच्या सार्वत्रिक मार्गाचा आपण विचार करू. पती-पत्नी या पैकी कोणीही एक हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ विषाणूंने बाधित असल्यास ते आपल्या जोडीदाराला हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ विषाणूंची लागण लैंगिक संबंधांच्या मार्गाने देऊ  शकतात. हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ विषाणूंच्या अशा प्रसारणाला प्रतिबंध करायचा असेल तर काही विशिष्ट प्रयोगशालेय तपासण्या व काही विशिष्ट औषध योजना करून हे साधता येते.
रक्तदात्याकडून रक्तग्राहकाकडे होणारा हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ विषाणूंचा प्रसार असे दूषित रक्त योग्य त्या सुरक्षित पद्धतीने नष्ट करून टाळता येतो. तर दूषित मातेकडून बाळाकडे होणारे हिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ विषाणूचे संक्रमणसुद्धा विशिष्ट प्रयोगशालेय तपासण्या व विशिष्ट औषध योजना करून टाळता येते.आजकाल हिपाटायटिस ‘बी’ विषाणूंचे लसीकरण हा प्रतिबंधाचा राजमान्य राजश्री मार्ग आहे.