16-blogपंगत आटोपली. वधूमायनं वरमायच्या तळहातावर दूध, चांदीच्या लवंगा, चांदीची दातकोरणी असं बरंच काय काय घातलं. अन् विहीणबाई रवाना झाल्यावर वधूमायनं सुटकेचा निश्वास सोडला. ती मग आपल्या नातेवाइकांनी केलेलं कौतुक झेलत राहिली की, ‘व्वा ! फारच जोरदार थाट उडवला विहिणीच्या पंगतीचा!’ पण.. एव्हाना मघा रेखलेली फुलापानांची रांगोळी पार विस्कटली होती. सारीजणं ती बेदरकारपणे तुडवत होती. कारल्याचे वेल मलूल होऊन पडले होते. कमानींना धक्के लागून त्या आडव्या झाल्या होत्या..

मध्यंतरी एका लग्नाला गेले होते. लग्न अगदी घरचेच होते. त्यामुळे दुपापर्यंत थांबण्याचा आग्रह झाला. वेळ होता म्हणून थांबले. लग्नविधी आटोपले. सप्तपदी, लज्जाहोम सारं काही साग्रसंगीत पार पडलं. मधल्या वेळात येणाऱ्या पाहुण्यांच्या जेवणाच्या पंक्ती उठल्या अन् मग विहिणीच्या पंक्तीची धामधूम सुरू झाली. तळघरात जेवणाचा हॉल अन् वर लग्नाचे सभागृह अशी एकूण कार्यालयाची विभागणी होती. विहिणीच्या पंगतीची जय्यत तयारी झाली अन् विहीणबाईंना सन्मानाने जेवणाचे निमंत्रण गेले. माझ्यासोबतची माझी आत्येबहीण म्हणाली, ‘‘चल, आपण विहिणींची पंगत पाहून येऊ. पेशवाई थाट केला आहे म्हणे.’’

man jumps into lake after being fed up with expenses of daughters treatment
मुलीच्या उपचाराच्या खर्चाला कंटाळून पित्याची तलावात उडी; वेळीच दोन पोलिसांनी…
Father-daughter love
बाप असावा तर असा…! लेकीच्या घटस्फोटानंतर वाजत-गाजत आणलं घरी! वडिलांच्या ‘या’ कृतीचा समाजाने का घ्यावा आदर्श?
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द

‘‘पेशवाई थाट? तो काय असतो ?’’ माझा बावळट प्रश्न ऐकून ती मला खेचूनच घेऊन गेली. अन् विहिणीच्या पंगतीचा थाट पाहून मी अवाक् झाले. सभागृहाच्या हॉलपासून तर तळघराच्या शेवटच्या पायरीपर्यंत लाल गालिचा अंथरलेला, त्या गालिच्यावर गेलार्डी, झेंडू अन् लाल गुलाबांच्या पाकळ्यांनी भरगच्च नक्षी काढलेली, त्याला हिरव्या पानांच्या रंगाची सुबक कमान, तिथून पुढे विहीणबाईंच्या जेवणस्थानापर्यंत दुसरा लाल गालिचा अंथरून त्यावरही तशीच सुंदर नक्षी काढलेली. माझे तर डोळेच दिपले. पण हे इथंच संपलं नाही. विहिणीच्या पानापर्यंत सुबक कमानी बनवून त्यावर कारल्यांसह कारल्याचे वेल सोडलेले. माणूसभर उंचीच्या समया मणभर फुलांचे भरगच्च हार लपेटून पेटवता येतील तेवढय़ा वाती पेटवून. अर्धा किलो तेल आपल्यात सामावून घेऊन त्या विहीणबाईंचा मार्ग उजळत होत्या. अन् जेवणाच्या पंक्तीचा वेगळाच थाट. पांढरेशुभ्र लोड विहीणबाईंना टेकायला, पाटसदृश लोड तक्क्यांचे आसन बसायला, अन् चौरंगावर चांदीचं ताट विराजमान झालेलं. २५-३० चांदीची ताटं अन् रंगीत चौरंगानं पंगत शोभिवंत अन् लखलखीत झालेली. तिथं पुन्हा फुलांच्या पाकळ्यांनी काढलेल्या पानाभोवतीच्या रांगोळ्या. एकूण काय, फुलांनी सजवलेली ती पंगत, उदबत्तीचा सुगंधी दर्वळ, त्यात मिसळलेला पंचपक्वान्नांचा सुवास .. सारं काही कल्पनातीत. बहीण म्हणाली, ‘‘बघ, कळलं कशी असते पेशवाई पंगत ते?’’ अन् मी काही उत्तर देण्यापूर्वी विहीणबाई जिन्यावरून ‘हळूच भुलाबाई पाय टाका’ येवढय़ा नजाकतीनं अवतरल्या. त्यांची भरजरी (विहिणीच्या पेशवाई पंगतीला शोभेल अशी) पठणी (माझी बहीण हळूच माझ्या कानाशी लागून कुजबुजली, ‘सव्वा लाखाची आहे म्हणे! खऱ्या सोन्याच्या तारांचे मोर आहेत. येवल्याला खास ऑर्डर देऊन करवून घेतलीय.’) बापरे! लय भारी काम दिसतंय.’’
चौफेर जमलेल्या स्त्री जमावाकडे कटाक्ष टाकत विहीणबाई कारल्याच्या मांडवाखालून जाऊ लागल्या तेव्हा कमानींच्या अवतीभवती, हातात पाकळ्यांची चांदीची तबकं घेऊन उभी असलेली हौशी स्त्री सेना विहीणबाईंवर पाकळ्यांची उधळण करू लागली. फोटोग्राफर्स फोटो टिपायला अगदी सज्ज असलेले. खट् खट्-क्लिक क्लिक् .. हुश्श ! विहीणबाई स्थानापन्न. अन् एवढय़ा पायऱ्या उतरून विहीणबाईंच्या सेवेतले अब्दागीर चवऱ्या ढाळायला त्यांच्या सिंहासनामागे सज्ज. सारे मानकरी विराजमान झाल्यावर पेशवाई पोशाखातले अब्दागीर हातातल्या भल्याथोरल्या पंख्यानं चवऱ्या ढाळू लागले. इतरही काही सोहळे पार पडल्यावर विहीणबाईंनी घास घेतला. पंगत आटोपली. वधूमायनं वरमायच्या तळहातावर दूध, चांदीच्या लवंगा, चांदीची दातकोरणी असं बरंच काय काय घातलं. अन् विहीणबाई रवाना झाल्यावर वधूमायनं सुटकेचा निश्वास सोडला. ती मग आपल्या नातेवाइकांनी केलेलं कौतुक झेलत राहिली की, ‘‘व्वा! फारच जोरदार थाट उडवला विहिणीच्या पंगतीचा!’’ एव्हाना मघा रेखलेली फुलापानांची रांगोळी पार विस्कटली होती. सारीजणं ती बेदरकारपणे तुडवत होती. कारल्याचे वेल मलूल होऊन पडले होते. कमानींना धक्के लागून त्या आडव्या झाल्या होत्या. केटररची माणसं धावपळ करीत तो कचरा गोळा करीत होती. चवऱ्या ढाळणारे अब्दागीर आपले पेहराव बदलून केटररच्या टोळीतले कामकरी म्हणून वावरू लागले होते. लग्न समारंभातील एक महत्त्वाचं पर्व आटोपलं होतं. विहीणबाईंना रुसा-फुगायला काही कुठं फट मिळाली नव्हती.
किती बदललंय सगळं. पूर्वानुपार चालत आलेली ही विहिणींची पंगत, ते रुसवे फुगवे, ते समजावणं, त्या उखाळ्या-पाखाळ्या सारं मागंच पडलं, की पुन्हा नव्या स्वरूपात पुनरुज्जीवित झालं? हो, एका वेगळ्याच स्वरूपात, नको तितक्या अवडंबरासह ते सारं पुनरुज्जीवित झालं आहे हे सत्य नाकारता येत नाही. याला मुख्य कारण आहे ते म्हणजे हाताशी असलेला अमाप पसा. पण त्याहून महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याच मित्रमत्रिणींशी, नातेवाइकांशी आपण केलेली स्पर्धा. अमक्यांच्या घरच्या लग्नात असा थाट होता काय? ठीक आहे. आपण त्याहून अधिक करू. अन् यातून निर्माण होणारी ईष्र्या. या साऱ्यांचं दृश्यरूप म्हणजे लग्न-मुंजींमध्ये वाढत जाणारं उधळपट्टीचं प्रमाण. जी फुलं बागेत, देवाच्या अंगावर शोभिवंत दिसतात, ती फुलं चुरगळून, त्याच्या पाकळ्या करून आपण काही क्षणक दिखाव्यापोटी पायाखाली तुडवायची? आणि हे सारं चालतं ते फक्त विहिणीच्या पंक्तीच्या नावाखाली? व्याहीबुवांच्या नावानं अशी पंगत सजत नाही. अर्थात विहिणीच्या पदराआडून व्याहीबुवांचे साधते तो भाग निराळा. प्रश्न असा निर्माण होतो की अजूनही स्त्री वर्ग स्वत:कडे मुलाची आई म्हणून विशेष मोठेपणा घेऊ इच्छितो का? म्हणजे पुन्हा एकदा ‘मुलीची आई कनिष्ठ’ असंच आम्ही सुचवतो का?
मला आठवते, १९६३ ला माझ्या आत्याचे लग्न अकोला मुक्कामी मे महिन्यात झाले होते. मे महिन्यात अकोल्याचा उन्हाळा कसा असणार याची कल्पनाच केलेली बरी. रीतिरिवाजानं झालेल्या या लग्नात विहिणीच्या पंक्तीवेळी आत्याच्या सासूबाईंनी पायघडय़ांची मागणी केली. आमची खूप धावपळ उडाली. एक मोठी शाळा लग्नासाठी म्हणून घेतली होती. तिथंच मुलाकडच्यांना जानोसा (उतरण्याची जागा) दिला होता. मांडवापासून जानोशाचे ठिकाण बरेच लांब होते. पण आम्हाला आठवतंय की, मी, माझी उपरोक्त लग्नात माझ्या सोबत असणारी आत्येबहीण, अन् इतर काही आमच्यासारख्या उत्साही कार्यकर्त्यांनी आपणहून पायघडय़ा टाकण्याचे काम आपल्याकडे ओढून घेतले होते. काकांनी दोन पांढरीशुभ्र धोतरे दिली. त्यावर आम्ही हळदी-कुंकवाचे ओले िशपण केले. मग जानोशाच्या ठिकाणापासून आठ जणींनी त्या धोतराच्या पायघडय़ा अंथरल्या. एका पायघडीवरून विहीणबाई दुसऱ्या पायघडीवर विराजमान झाल्यावर मागची पायघडी उचलून ती पुढे मांडायची. असे करत विहीणबाईंना जेवणाच्या पंगतीपर्यंत आणून सोडले. तिथं कारल्याची एक फांदी कमानीसारखी ठेवलेली. तो म्हणे कारल्याचा वेल. त्याखालून गेल्यावरच विहीणबाई पानावर बसल्या. शिवाय मुलीकडच्यांनी दिलेलं हिरवं टोपपदरी नऊवार त्या नेसल्या होत्या. जेवणात त्यांच्यासाठी कारल्याची भाजी केली होती. तेवढय़ा त्यांच्या दोन-तीन अटी पूर्ण केल्यामुळे लग्न सुखरूप पार पडले. पण वयात येणाऱ्या माझ्यासारख्या मुलीला अनेक प्रश्न छळू लागले होते की, ‘मुळात अशा प्रथांची गरज आहेच का? आणि असलीच तर का म्हणून मुलाच्याच आईच्या वाटय़ाला हा सन्मान? म्हणजे मुलाला जन्म देताना तिनं काही विशेष त्रास भोगला, अन् मुलीच्या आईला मात्र आईपण विनासायास प्राप्त झालं?’
असल्या तर्कट प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचं एकमेव हक्काचं स्थान होतं, ते म्हणजे ‘बुढ्ढी आत्या.’ माझ्या तीर्थरूपांची आत्या. वयाच्या चौदाव्या वर्षी बालविधवा होऊन ती माहेरी आली. अन् या विकेशा आत्यानं घराचा सारा भार सांभाळला. पु.लं.च्या लेखातल्या नारायणाची भूमिका आत्याकडे असे. साहजिकच मी आत्याकडे गेले अन् नाराजीच्या स्वरात तिला पायघडय़ांचा प्रकार कथन केला. अन् हे मला कसं पटलं नाही ते समजावून सांगितलं. त्यावर आत्यानं केलेलं विश्लेषण फार मार्मिक होतं. ते अजूनही ध्यानात आहे. ती म्हणाली, ‘असं पाहा बाबी, बाईचा अख्खा जन्म चुलीत जातो. बाहेरचं मोकळं वारंही तिला कधी मिळत नाही. पण तिला जर मुलगा झाला तर तिची संसारातली पत जरा उंचावते. मुलाच्या कारणानं तिला सन्मान मिळणार असतो अन् सन्मान कोणाला नको वाटतो गं? प्रत्येकाला वाटतंच ना की आपली दखल इतरांनी कधीतरी घ्यावी म्हणून? तर आपल्या समाजात बाईच्या बाबतीत हे घडतं मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं ! अन् म्हणून ती काही नेम करते. जसं की- मुलाच्या लग्नात मी पायघडय़ांवरून जेवायला जाईन, किंवा मुलाच्या लग्नापर्यंत मी कारल्याची भाजी खाणार नाही, किंवा हिरवं वस्त्र वापरणार नाही, अशासारखे.’’
‘‘पण मग तिचे तिने स्वत: घ्यावे ना मुलाच्या लग्नात हिरवे नऊवार पातळ.’’
‘‘त्यात काय गंमत गं?’’
‘‘अन् मग मुलीच्या आईनं काय घोडं मारलं? तिला का नाही हे सारं मिळत?’’
‘‘ तो आहे खरा विचार करण्यासारखा मुद्दा. पण म्हणून तर आपल्याकडे पुत्रजन्माचा येवढा आनंद ना! आता तुम्ही नव्या पिढीतल्या, शिकलेल्या मुली नका हे चुकीचे पायंडे पुढे नेऊ. जे मनापासून पटत नाही ना ते सोडून देण्याची िहमत बाळगा. म्हणजे पुत्रजन्माचं महत्त्व कमी होईल बघ. अन् तुम्हाला हवी तशी व्यवस्था तुम्ही निर्माण करू शकाल. खरं तर जे काय हारतुरे मिळवायचे आहेत, ज्या पायघडय़ा तुम्हाला हव्याशा वाटतात त्या स्वकर्तृत्वावर मिळवा ना! हट्ट करून अन् नियम करून दुसऱ्यांच्या जिवावर कशाला प्राप्त करता? त्यात कसलं आलंय समाधान अन् कसला आलाय मोठेपणा? निदान तू तरी यातलं काही करू नकोस.’’
साऱ्या आयुष्याचं शहाणपण बुढ्ढय़ा आत्यानं त्याक्षणी माझ्या पदरात बांधलं. या समोरच्या विहीणबाईंच्या घरी अशीच एक बुढ्ढी आत्या असती तर? किंबहुना प्रत्येकच घरी अशी एक बुढ्ढी आत्या असती तर एवढी फुलं धारातीर्थी पतन पावली नसती. मुलाच्या जन्माचे सोहळे एवढय़ा दिमाखात साजरे केले गेले नसते. माझ्या लहानपणी माझ्या आत्याला सुचलेले शहाणपण आजही का फारसं झिरपलं नाही समाजात? का अजून काही ठिकाणी हे सारं बिनदिक्कत सुरू आहे? समानतेच्या, अन् स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या आम्ही स्त्रियांनी स्वत:भोवतीची खोटय़ा प्रतिष्ठेची वर्तुळं पुसलीत तरी का अजून?
चौदाव्या वर्षी बालविधवा झालेली माझी विकेशा बुढ्ढी आत्या आयुष्यातला कुठलाही आनंद न भोगता कष्ट करीत मरून गेली. तिच्या वाटय़ाला आलेले भोग कुणाच्याही वाटय़ाला येऊ नयेत. त्या काळात न टाळता येणाऱ्या अनेक गोष्टी आज आम्हाला टाळता येणाऱ्या आहेत, मग का म्हणून आम्ही तेच पायंडे पुढे चालवायचे?