‘झुबी डुबी’सारखं एखादं पेपी गाणं असो, ‘कल हो ना हो’सारखं शांत गाणं असो किंवा ‘ये दिल दिवाना’सारखं उडतं गाणं असो.. तो आवाज नेहमीच ऐकावासा वाटतो. साधारण २० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारा हा आवाज नंतर काही वर्षांनी रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षकाचा आवाज बनला. तोवर त्या आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तो आवाज म्हणजे सोनू निगम. सर्व प्रकारच्या गाण्यांसाठी योग्य असलेला सोनू निगम पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी परीक्षकाच्या भूमिकेत दिसतोय. सोनी चॅनलवर ‘इंडियन आयडॉल’ हा शो नुकताच सुरू झाला. या कार्यक्रमाची लोकप्रियता अफाट आहे. उत्तम स्पर्धकांमुळे या कार्यक्रमाचा दर्जा अधिकाधिक उंचावतोय. इंडियन आयडॉलच्या या नवव्या सीझनमध्ये सोनू निगम, फराह खान आणि अनू मलिक हे त्रिकूट बारा वर्षांनी एकत्र येताना दिसतंय. स्पर्धकांची भावनिक कहाणी दाखवून त्यांना स्पर्धेत ठेवत टीआरपी खेचण्याच्या शर्यतीबाबत सोनूचं काहीसं वेगळं मत आहे. स्पर्धकांनी आणखी कशावर मेहनत घ्यायला हवी याबाबतही त्याने खास ‘लोकप्रभा’शी संवाद साधला.

इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनमधलं परीक्षकांचं त्रिकूट बारा वर्षांनी पुन्हा एकत्र दिसत असल्यामुळे कार्यक्रमाचे चाहते सुखावले आहेत. सोनूसुद्धा पुन्हा कार्यक्रमाशी जोडला गेल्यामुळे खूश आहे. ‘प्रेक्षकांना आमचं त्रिकूट पुन्हा एकत्र दिसत असल्यामुळे ते समाधानी, आनंदी असल्यामुळे आम्हालाही खूप मस्त वाटतंय. यंदाच्या सीझनमध्ये आलेल्या स्पर्धकांना आमचं त्रिकूट बघून खूप आनंद झाला. त्यांचा हा आनंद बघून त्यांचा आमच्यावर असलेला विश्वास दिसून येतो’, असं सांगत कार्यक्रमाचा दर्जाही यंदा उंचावला असल्याचं त्याने नमूद केलं. सोनी चॅनलच्या ‘एक्स फॅक्टर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सोनू निगम परीक्षक म्हणून दिसला होता. त्यानंतर चॅनल्सची संख्या वाढली, त्यावरील कार्यक्रमही वाढले तरी त्यापैकी कोणत्याही शोमध्ये तो परीक्षकाच्या भूमिकेत दिसला नाही. आता थेट पाच वर्षांनी स्मॉल स्क्रीनवर सोनू पुन्हा येत आहे.

रिअ‍ॅलिटी शो म्हटला की एखाद्या स्पर्धकाची भावनाविवश करणारी कहाणी, एखाद्याच्या आयुष्यातला संघर्ष, एखाद्याची आर्थिक परिस्थिती, एखाद्याची शारीरिक दुर्बलता अशा विविध गोष्टी त्यात येतातच. तो कार्यक्रम ‘रिअल’ वाटावा म्हणून त्यात अनेक गोष्टी भरडल्याही जातात. कधी कधी एखाद्या स्पर्धकाच्या कोणत्या तरी एखाद्या गोष्टीसाठी त्याला स्पर्धेतही घेतलं जातं. त्या जोरावर कार्यक्रमाचा प्रेक्षकवर्ग वाढवण्याचाही प्रयत्न होतो. असे प्रकार याआधी घडलेले दिसले आहेत. आजच्या चॅनल्सच्या स्पर्धेचा भाग म्हणून असे विविध प्रयोग करण्यात काहीच गैर नाही. पण, सोनूने या सगळ्यावर काट मारली आहे. आम्ही अशा कोणत्याही कहाणीला बळी पडणार नाही, असं त्याने चॅनलला स्पष्ट सांगितलं आहे. ‘स्पर्धकांची निवड करताना तो किती गरीब आहे, तो कुठून आला आहे, त्याला काहीतरी व्यंग आहे अशा कारणांचा विचार अजिबात केला जाणार नाही. स्पर्धकांची भावुक कहाणी ऐकून, बघून आम्ही त्यांची निवड करणार नाही. आमच्यासाठी संगीतच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे याबाबतीत आमच्यावर दडपण आणू नये, असं आम्ही चॅनलला आधीच सांगितलं आहे. आम्ही स्पर्धकांच्या गायकीलाच प्राधान्य देणार, असंही त्यांच्याशी स्पष्ट केलं आहे’, सोनू त्याच्या मतावर ठाम असल्याचं जाणवतं.

अनेक वर्षांपासून संगीतविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांशी सोनू निगम संबंधित आहे. त्यामुळे त्यात होणारे बदल त्याला जाणवतात. या बदलांविषयी तो सांगतो, ‘अलीकडे चॅनल्सची संख्या वाढली आहे. त्यावरील कार्यक्रमांमध्येही वाढ झाली आहे. हे कार्यक्रम आधीपेक्षा बऱ्याच प्रेक्षकांपर्यंत वेगाने पोहोचतात. अशा कार्यक्रमांचा आवाकाही वाढला आहे. पण, या सगळ्यात न बदललेली गोष्ट म्हणजे संगीताबद्दलचं प्रेम आणि जाण. मला वाटतं की संगीत विषयाबद्दलची मूल्यं बदलली नसतील तर कोणत्याही काळात असे कार्यक्रम करा, त्यासाठी कोणतीच तडजोड करावी लागणार नाही.’ काही वर्षांपूर्वी रिअ‍ॅलिटी शोजमध्ये स्पर्धक ऑल राउंडर असायला हवा म्हणजे त्याला सगळ्या प्रकारची गाणी गाता आली पाहिजेत, असा प्रयत्न असायचा आणि त्या अनुषंगानेच स्पर्धकांचं परीक्षण केलं जायचं. पण, आता बदलणाऱ्या ट्रेण्डप्रमाणे परीक्षकांचा दृष्टिकोनही बदलला आहे. सोनू स्वत: याविषयी सांगतो, ‘एखादा स्पर्धक विशिष्ट बाजाची गाणी गाण्यात माहीर असला तरी त्याला दुसरेही सगळे बाज जमायला हवेत, असं सांगितलं जायचं. पण आता आम्हा परीक्षकांचा हा दृष्टिकोन बदलला आहे. एखादा स्पर्धक विशिष्ट बाज उत्तम गात असेल तर त्याला त्यातच पुढे कसं जाता येईल याचं मार्गदर्शन केलं जाईल. स्पर्धकांच्या आवडीकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन बदलला आहे.’

‘इंडियन आयडॉल’मध्ये येणारे उत्तम गातातच. शिवाय त्यांच्यात वेगवेगळे ट्रेण्ड दिसून येतात. शास्त्रीय संगीताला धरून आजच्या संगीतात प्रयोग करणारे काही स्पर्धक असतात. तर काही अस्सल बॉलीवूडच्या गाण्यात रमणारे असतात. या नव्या प्रयोगशील पिढीबाबत सोनू त्याचं मतं व्यक्त करतो. ‘नवव्या सीझनमध्ये येणारे सगळेच स्पर्धक अतिशय तयार आहेत. आवाजाचे वेगवेगळे बाज त्यांच्यात दिसतात. ते विविध प्रयोग करत असतात. पण अजूनही त्यांनी एक गोष्ट पूर्णपणे आत्मसात करायला हवी. ती म्हणजे हावभाव. गायनातले हावभाव ही गायकामध्ये असणारी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. इथे आजची तरुणाई थोडी कमी पडते. एखादं गाणं गात असताना ते अनुभवून ते व्यक्त करायला हवं’, सोनू सांगतो. गाण्याबाबत रोखठोक मतं असलेला सोनू नव्या सीझनमधल्या देशभरातील स्पर्धकांना ऐकण्यासाठी सज्ज आहे. रिअ‍ॅलिटी शो असला तरी त्याभोवती येणाऱ्या वलयांकडे फार लक्ष न देता त्याचं लक्ष्य फक्त संगीत हेच असेल. सोनू निगमसह फराह खान, अनू मलिक हे त्रिकूट पुन्हा एकदा कार्यक्रमात काय धमाल आणतं हे हळूहळू कळेलच.

चैताली जोशी