उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून आतापर्यंत १४ जण यामुळे दगावले आहेत. वाढत्या गारठय़ामुळे अनेकांनी सोमवारी घराबाहेर पडणे टाळले. दिल्लीमध्ये सोमवारी सकाळी ५.५ इतके तापमान नोंदविले गेले. शहरातील सरासरी किमान तापमानापेक्षा हे दोन अंश सेल्सियसने कमी आहे. थंडी आणि धुक्यामुळे शहरातील वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेशातही थंडीचा जोर कायम असून राज्यात यामुळे आतापर्यंत ८३ जण दगावले आहेत.
सोमवारी जालून आणि भडोची जिल्ह्यात सोमवारी तीन जण मृत्युमुखी पडले; तर आझमगड, बहरीच जिल्ह्यांत दोन, तर गाझीपूर आणि सोनभद्र जिल्ह्यात एकाचा थंडीमुळे मृत्यू झाला. राज्यातील काही भागात सरासरीपेक्षा ४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील सर्वात कमी तापमान मुझफ्फरनगरमध्ये ४ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले.
पंजाब व हरियाणा राज्यातही थंडीमुळे जनजीवन गारठले असून रस्ते, रेल्वे तसेच विमान वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. वाढत्या धुक्यामुळे चंदीगड विमानतळावरून सोमवारी सुटणारी बहुतेक विमाने रद्द करण्यात आली. तसेच राज्यातील बहुतेक रेल्वे उशिराने धावत होत्या. या थंडीचा पाणी व वीज पुरवठय़ावरही परिणाम झाल्याने सामान्य नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडली आहे.