‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सय्यद सलाउद्दीनचा मुलगा सय्यद शाहिद युसूफला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी अटक केली. दहशतवादी कारवायांना होत असलेल्या अर्थपुरवठ्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.

एनआयएने २५ ऑक्टोबर २०११ रोजी हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवादी कारवायांना होत असलेल्या अर्थपुरवठ्यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता. अफेक्टीज रिलीफ ट्रस्ट या संस्थेच्या नावाने पाकिस्तानमधून हिज्बुल मुजाहिद्दीनला पैसे पाठवले जायचे. दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्याच्या प्रकरणात युसूफ हा तपास यंत्रणांच्या रडारवर होता. युसूफ हा सौदी अरेबियातील हिज्बुलचा हस्तक एजाझ अहमद भटच्या संपर्कात होता. शाहिद युसूफ हा जम्मू-काश्मीर सरकारच्या कृषी विभागात कामाला होता. त्याचे कुटुंब बडगाम येथे वास्तव्यास आहे.

युसूफला वेस्टर्न युनियनच्या माध्यमातून एजाझने पैसे पाठवले होते. एजाझ सध्या फरार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दहशतवादी कारवायांसाठी युसूफला चार टप्प्यांमध्ये पैसे पाठवण्यात आले. २०११, २०१२, २०१३ आणि २०१४ मध्ये त्याला पैसे पाठवण्यात आले होते. एजाझ आणि युसूफमधील कॉल रेकॉर्डही तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे. आमच्याकडे पैशांचे व्यवहार आणि कॉल रेकॉर्डचे पुरावे असून त्याच आधारे आम्ही युसूफला अटक केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एनआयएने सलाहउद्दीनच्या मुलाला समन्स बजावले होते. मंगळवारी सकाळी युसूफ चौकशीसाठी एनआयएच्या कार्यालयात आला. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएने सप्टेंबरमध्ये श्रीनगरमधील ११ ठिकाणी आणि दिल्लीतील पाच ठिकाणी छापा टाकला होता. याप्रकरणात अनेक फुटीरतावादी नेतेही एनआयएच्या रडारवर आहेत.