जगभरात धूमाकूळ घालणाऱ्या वॉनाक्राय रॅन्समवेअर सायबर हल्ल्यातून सुटका करुन देणारा मार्कस हचिन्स या २३ वर्षाच्या तरुणाला अमेरिकेतील एफबीआयने हॅकिंगप्रकरणी अटक केली आहे. बँक खात्यांचे पासवर्ड हॅक करण्यासाठी मालेवअर तयार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

दीडशे देशांना फटका बसलेल्या ‘वॉनाक्राय रॅन्समवेअर’ हल्ल्याने मे महिन्यात जगभरात खळबळ निर्माण केली होती. भारतातही काही प्रमाणात या सायबर हल्ल्याचे परिणाम झाले होते. वॉनाक्राय रॅन्समवेअर सायबर हल्ल्यात जगभरातील सुमारे तीन लाख यंत्रणा विस्कळीत झाल्या होत्या. हा हल्ला परतावून लावण्यासाठी ब्रिटनमधील २३ वर्षाचा सायबर तज्ज्ञ मार्कस हचिन्सने मोलाची भूमिका निभावली होती. हचिन्सचे यासाठी जगभरातून कौतुक होत होते.

अमेरिकेतील लास वेगास येथे सायबर तज्ज्ञ आणि हॅकर्ससाठी एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या निमित्ताने मार्कस लास वेगासमध्ये आला होता. ब्रिटनला परतण्यासाठी निघाला असताना अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयने त्याला अटक केली. एफबीआयच्या या कारवाईनंतर परिषदेसाठी आलेल्या सायबर तज्ज्ञांना धक्काच बसला. अनेकांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.
मार्कस हचिन्सवर मालवेअरची डिझाईन केल्याचा आरोप आहे. मार्कसनने क्रोनोस बॅकिंग ट्रोजन नामक मालवेअर डिझाईन केले होते. जुलै २०१४ ते जुलै २०१५ या कालावधीत त्याने हे मालवेअर तयार केले होते. क्रोनोस मालवेअर विकण्यासाठी मार्कसला आणखी एकाने मदत केली होती. मात्र अद्याप या व्यक्तीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. एखादा यूजर जेव्हा ऑनलाईन पेमेंटसाठी बँक किंवा अन्य संकेतस्थळार जातो त्यावेळी मालवेअर त्याच्या वेब ब्राऊझरवर हल्ला करतात आणि त्या यूजरचा यूजर नेम आणि पासवर्ड हा तपशील हॅकर्सना पुरवतात.