परराष्ट्र खात्याच्या सचिव सुजाता सिंह यांचा कार्यकाळ संपण्याच्या आठ महिने आधीच त्यांना तडकाफडकी या पदावरून दूर सारण्यात आले आहे. त्यांच्या जागी भारताचे अमेरिकेतील राजदूत एस. जयशंकर यांची वर्णी लावण्यात आली असून, गुरुवारी सकाळी जयशंकर यांनी परराष्ट्र खात्याच्या सचिव पदाची जबाबदारी स्वीकारली.
सुजाता सिंह यांच्या हकालपट्टीवर बुधवारी रात्री कॅबिनेट समितीने शिक्कामोर्तब केले. यूपीए सरकारच्या काळात सुजाता सिंह यांची दोन वर्षांसाठी परराष्ट्र खात्याच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. येत्या जुलै महिन्यात त्या निवृत्त होणार होत्या. मात्र, त्यापूर्वीच अशाप्रकारे तडकाफडकी त्यांना पदावरून हटवण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. जयशंकर यांच्यावर नरेंद्र मोदी यांची विशेष मर्जी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शंका आता उपस्थित होत आहे. जयशंकर यांनी यापूर्वी भारताचे चीनमधील राजदूत म्हणून काम पाहिले आहे. मात्र, गेल्या वर्षभराच्या काळात दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील संबंध सुधारण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे त्यांची सचिवपदावर वर्णी लागल्याचेही बोलले जाते. २०१३मध्ये भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे प्रकरणामुळे भारत-अमेरिकन प्रशासनामध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. त्यावेळीदेखील शिष्टाई करण्यासाठी जयशंकर यांची अमेरिकेत रवानगी करण्यात आली होती. याशिवाय, गेल्यावर्षी नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेतील दौरा आणि प्रजासत्ताक दिनाला बराक ओबामा यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलविण्याची संकल्पना यशस्वीपणे अंमलात आणल्यामुळे नरेंद्र मोदींची त्यांच्यावर विशेष मर्जी बसली. या प्रकारानंतर सुजाता सिंह यांनी अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.