सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत ठार मारला गेलेला अबू दुजाना हा ‘लष्कर ए तोयबा’सोडून ‘अल कायदा’मध्ये सामील होण्यासाठी भारतात आला होता असा दावा ‘अल-कायदा’चा जम्मू-काश्मीरमधील प्रमुख झाकिर मुसाने केला आहे. त्यामुळे आता काश्मीर खोऱ्यात आता ‘अल कायदा’ विरुद्ध ‘लष्कर ए तोयबा’ यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील काकापोरा येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू दुजानासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दुजाना अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. त्याच्यावर १५ लाखांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. या कारवाईवर अल-कायदाचा काश्मीरमधील प्रमुख झाकिर मुसाने व्हिडिओ जाहीर केला आहे. या व्हि़डिओत मुसा म्हणतो, दुजाना हा ‘लष्कर’ सोडून अल-कायदात सामील होणार होता. अल- कायदाची काश्मीर खोऱ्यात बांधणी करुन देण्याचे काम तो करणार होता असे मुसाचे म्हणणे आहे. या व्हिडिओतील व्यक्ती मुसा आहे का याविषयी पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. पण मुसाच्या यापूर्वीच्या क्लिपमधील आवाज आणि व्हिडिओतील व्यक्तीचा आवाज समान असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुसा आणि दुजाना हे दोघेही आधीपासूनच चांगले मित्र होते याकडेही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. ‘अल-कायदा’ने यापूर्वीही काश्मीरमध्ये संघटना सक्रीय असल्याचा दावा केला आहे. आम्ही आत्ताही ‘अल-कायदा’चा दावा तपासून बघू. पण आमच्यासाठी दहशतवादी हा दहशतवादीच असतो आणि मग तो कोणत्याही संघटनेचा असो असे पोलीस महासंचालक एसपी वैद यांनी सांगितले.

ओसामा बिन लादेनच्या ‘अल-कायदा’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीर युनिट सुरु केल्याची घोषणा केली होती. काश्मीरमधील दहशतवादाचा चेहरा आणि हिज्बुल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर झाकीर मुसाला अल-कायदाने जम्मू-काश्मीरमधील प्रमुख म्हणून नेमले आहे.