पंतप्रधानांची घोषणा

पुढील पाच वर्षांसाठी भारत आफ्रिका खंडातील देशांना १० अब्ज डॉलरचे स्वस्त दराने कर्ज देईल, त्याचबरोबर आफ्रिकेला ६० कोटी डॉलर अनुदानाच्या स्वरूपात भारत देईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केली. भारत आणि आफ्रिका हे जागतिक अर्थव्यवस्थेचे उत्साहवर्धक आशास्थान असल्याचेही मोदी म्हणाले. भारत-आफ्रिका परिषदेत ते बोलत होते.
संयुक्त राष्ट्रे सुरक्षा समितीमधील सुधारणा, दहशतवादविरोधी धोरण आणि वैद्यकीय सेवांसहित अन्य महत्त्वाच्या मुद्दय़ांवर परिषदेत चर्चा होण्याची शक्यता आहे.
भारत आणि आफ्रिकेने एकत्रितपणे वाटचाल करण्याची शपथ घेतली असल्याचे या वेळी मोदी म्हणाले.
आफ्रिका आणि भारतातील एकूण लोकसंख्येच्या दोनतृतीयांश लोकसंख्येचे वय ३५ पेक्षा कमी आहे, हे शतक आपले आहे, ही केवळ भारत आणि आफ्रिकेची परिषद नाही, जगातील एकतृतीयांशपेक्षा अधिक लोकसंख्येचे हे एकत्रीकरण आहे. आफ्रिकेतील ५४ स्वतंत्र देशांच्या सार्वभौमत्वामुळे जग अधिक समृद्ध झाले आहे, असेही मोदी म्हणाले.
दहशतवाद आणि सागरी सुरक्षा क्षेत्रातील परस्परसहकार्य अधिक व्यापक करण्याची गरज आहे, स्वच्छ ऊर्जा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि बदलत्या हवामानास पूरक असलेल्या शेतीच्या विकासासाठी भारत आणि आफ्रिका खंडातील भागीदारीची गरज आहे, तंत्रज्ञान हा भागीदारीचा पाया असेल, असेही मोदी म्हणाले.