वादग्रस्त ठरलेल्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारासंदर्भात सोमवारी माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. सोमवारी सकाळी त्यागी सीबीआयच्या मुख्यालयात पोहोचले. त्यानंतर बंद खोलीमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली.
या प्रकरणात इटली न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये त्यागी यांच्यावर ठपका ठेवला होता. त्यागी यांचे बंधू हे सातत्याने ऑगस्टाकडून नेमण्यात आलेल्या मध्यस्थाच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यागी यांच्यावर न्यायालयाने ठपका ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआयकडून नव्या पुराव्यांसह त्यागी यांची चौकशी केली जाणार आहे. ऑगस्टा वेस्टलॅंडला हे कंत्राट मिळवून देण्यासाठी त्यागी यांनी मदत केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.
दरम्यान, या हेलिकॉप्टर खरेदीबाबतच्या सविस्तर घटनाक्रमासह वस्तुस्थिती मी बुधवारी संसदेत मांडेन. खरेदी करारातील काही आवश्यक कलमे व तरतुदी या कंपनीच्या फायद्यासाठी कशा व केव्हा शिथिल करण्यात आल्या याची माहिती मी देईन, असे पर्रिकर यांनी कालच सांगितले होते.