भारतातून आखाती देशांमध्ये सेवा पुरवणाऱ्या प्रवासी विमान वाहतूक कंपन्या पाकिस्तानवरून उड्डाणे टाळून अहमदाबादमार्गे अरबी समुद्रावरून प्रवास करण्याची विनंती केंद्र सरकारला करत आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध, त्यातून उद्भवलेले सुरक्षेसंबंधी प्रश्न आणि प्रवासखर्च कमी करणे अशी कारणे त्यामागे आहेत.

एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो आणि स्पाइसजेट या कंपन्या भारत ते आखाती देश सेवा पुरवतात. त्यांची विमाने पाकिस्तानच्या भूमीवरून उड्डाण करतात. मात्र गेल्या काही दिवसांत पाकिस्तामधून भारतात येणाऱ्या काही पूर्वनियोजित नसलेल्या विमानांना भारतात उतरण्यास मनाई करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद म्हणून पाकिस्तानही तसाच पवित्रा घेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर प्रश्नावरून सध्या दोन्ही देशांतील संबंध पुन्हा तणावपूर्ण बनले आहेत. अशा वेळी पाकिस्तानच्या हावई हद्दीतून उड्डाण करण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

याशिवाय विमान कंपन्यांसाठी प्रवासखर्चाचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. पाकिस्तानवरून उड्डाण करताना वक्राकार मार्ग अवलंबावा लागत असल्याने इंधन अधिक खर्च होते आणि प्रवासखर्च वाढतो. त्याऐवजी अहमदाबादमार्गे थेट अरबी समुद्रावरून दुबई किंवा आखाती देशांतील अन्य ठिकाणी प्रवास केल्यास हा खर्च वाचतो. मात्र त्या मार्गावर समुद्र आणि काही संवेदनशील ठिकाणांवरून प्रवास करावा लागतो. त्यातील काही भागांत केवळ हवाईदल आणि नौदलाच्या विमानांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. हे मार्ग प्रवासी विमानांसाठीही खुले करण्याची विनंती विमान कंपन्या करत आहेत. तशी विनंती स्पाइसजेटने नुकतीच संरक्षण आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला केली आहे. संरक्षण मंत्रालयाकडून त्या प्रस्तावाला अद्याप उत्तर मिळाले नसले तरी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.