समाजवादी पक्षात सध्या गृहकलह माजला आहे. मुलायम सिंह यादव, त्यांचे बंधू शिवपाल सिंह हे एका गटात, तर मुख्यमंत्री अखिलेश यादव, रामगोपाल यादव एका गटात आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होते आहे. या निवडणुकीआधी मुख्यमंत्री अखिलेश यादव नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

मुख्यमंत्री अखिलेश यादव नव्या पक्षाचे नाव ‘प्रोग्रेसिव्ह समाजवादी पार्टी’ ठेऊ शकतात. या पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘मोटारसायकल’ असू शकते, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीआधी अखिलेश त्यांच्या समर्थकांसोबत नव्या पक्षाची स्थापना करु शकतात. महासचिव रामगोपाल यादव यांनी दिल्लीत जाऊन निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्याने या चर्चेला उधाण आले आहे.

‘नव्या पक्षाची स्थापना हा सर्वात शेवटचा आणि दु:खद निर्णय असेल,’ असे अखिलेश यादव यांच्या समर्थकाने सांगितले असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. ‘अखिलेश यादव यांनी पक्ष स्थापन केल्यास त्या पक्षाला सत्तेत येण्याची संधी असेल. कारण या पक्षाला मतदार अखिलेश यांनी केलेल्या कामांमुळे मतदान करतील,’ असा विश्वास अखिलेश यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जातो आहे.

बाहुबली नेते मुख्तार अन्सारी यांच्या कौमी एकता दलाचे समाजवादी पक्षात विलीनीकरण करण्यावरुन समाजवादी पक्षातील संघर्षाला सुरुवात झाली. अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांना विलीनीकरण घडवून आणायचे होते. मात्र अखिलेश या विलीनीकरणाच्या विरोधात होते. अखिलेश यांच्या गैरहजेरीत हे विलीनीकरण पार पडले. मात्र अखिलेश यांनी विलीनीकरणाचा निर्णय रद्द केला. यानंतर अखिलेश आणि शिवपाल यांच्यातील दुरावा वाढू लागला.

आमच्यातील संघर्ष हा कौटुंबिक नसून तो राजकीय असल्याचे अखिलेश यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. यानंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शिवपाल यादव यांच्याकडून अनेक महत्त्वाची खाती काढून घेतली. यानंतर शिवपाल समर्थकांनी आंदोलने केली. त्यामुळे अखिलेश यांनी माघार घेत शिवपाल यांना त्यांची खाती परत केली. दरम्यानच्या काळात शिवपाल यांनी मुलायम यांना आपल्या बाजूने वळवले. यानंतर पुन्हा एकदा कौमी एकता दलाचे समाजवादी पक्षात विलीनीकरण करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच अखिलेश यादव यांनी पत्नीसोबत आपला मुक्काम वेगळ्या घरात हलवला.