मुस्लिमांना आता सुरक्षेची हमी द्या, हे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे वक्तव्य जातीयवादी असल्याने अन्सारी यांनी माफी मागावी अथवा पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने मंगळवारी केली. अशा प्रकारच्या मागणीमुळे मुस्लीम नैराश्याच्या अंधाऱ्या खाईत लोटले जाण्याची शक्यता असून त्याचे परिणाम धोकादायक असतील, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे. उपराष्ट्रपतींनी राजीनामा देऊन सक्रिय राजकारणात यावे, अशी मागणीही केली जात आहे. उपराष्ट्रपतिपदाचा मान ठेवून विश्व हिंदू परिषदेने या जातीयवादी वक्तव्याचा निषेध केला आहे. एका मुस्लीम नेत्याने असे वक्तव्य केले असून ते उपराष्ट्रपतिपदासाठी शोभादायक नाही. त्यामुळे अन्सारी यांनी माफी मागावी अथवा पदाचा राजीनामा द्यावा, असे परिषदेचे सहसरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी म्हटले आहे. अनेक इस्लामी देशांपेक्षा भारतीय मुस्लिमांना अधिक घटनात्मक अधिकार आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिमांचे लांगूलचालन केले जात आहे, असेही जैन म्हणाले.
‘मुस्लिमांना सुरक्षा पुरवावी’
नवी दिल्ली : छदेशातील मुसलमानांना भेडसावणाऱ्या ओळख आणि सुरक्षेच्या समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी धोरणे आखली जावीत आणि ‘सर्वाचा विकास’ असे धोरण राबवणाऱ्या सरकारने या दृष्टीने ‘सकारात्मक कृती’ करावी, असे आवाहन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केले आहे.
मुस्लिमांना सुरक्षा पुरवण्यातील अपयशासह त्यांच्याबाबत होणारा भेदभाव हा सरकारने लवकरात लवकर दूर करायला हवा आणि त्यासाठी आवश्यक ती साधने विकसित करायला हवीत, असे मुस्लिम संघटनांचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या ‘ऑल इंडिया मजलिस-ए-मुशावरत’च्या सुवर्णजयंती समारंभात ते बोलत होते.
मुस्लिमांचे सक्षमीकरण, सरकारी संपत्तीत समान वाटा आणि निर्णयप्रक्रियेत योग्य तो वाटा या मुद्यांवर उपाय शोधण्यासाठी पद्धती व धोरणे विकसित करणे हे देशासमोरील आव्हान असल्याचे अन्सारी म्हणाले.