लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या धाडीत एका अधिकाऱ्याच्या घरी साड्यांचा खजिनाच हाती लागला. अधिकाऱ्यांनी जेव्हा घराची झडती घेतली तेव्हा त्यांना तब्बल ७ हजाराहून अधिक साड्या मिळाल्या. साड्यांचा इतका साठा पाहून धाड टाकण्यास आलेले अधिकारीही अचंबित झाले. हा प्रकार कर्नाटकातील हुबळी येथे घडला. व्यावसायिक कर विभागाच्या उपायुक्ताच्या घरी लाचलुचपत विभागाने धाड टाकली होती. या साड्या व इतर कपडे मोजण्यास ६ तासांहून अधिक काळ लागल्याचे समजते. या साड्यांचीच किंमत कोट्यवधी रूपये असल्याचे बोलले जाते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक खोली साड्यांनी भरलेली होती. या सर्व साड्या व्यावसायिक कर विभागचे उपायुक्त एन. करिअप्पा यांच्या पत्नीच्या होत्या. अधिकाऱ्यांनी जेव्हा करिअप्पा यांच्या पत्नीला साड्यांबाबत चौकशी केली असता पहिल्यांदा त्यांनी आपला साडीचा व्यवसाय असल्याचा सांगितले. परंतु, त्यांना याबाबतचे पुरावे दाखवता आले नाहीत.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घरातील सर्व साड्या मोजण्यास सुमारे ६ तासांहून अधिक काळ लागला. एका अधिकाऱ्याच्या पत्नीकडे एवढ्या महागड्या साड्या मिळाल्यानंतर आम्हाला विश्वासच बसला नाही. कदाचित या अधिकाऱ्याने साडीच्या दुकानावर धाड टाकली असेल आणि साड्या घरी आणल्या असतील.
कोट्यवधी रूपयांच्या साड्यांशिवाय तपास अधिकाऱ्याना संपत्तीचे कागदपत्रेही मिळली. कर अधिकारी आणि त्याच्या पत्नीच्या नावावर ३ घर, बंगळुरू येथील एक फ्लॅट, शेती आणि प्लॉट्स आहेत. त्याचबरोबर दागिने, महागडे बुट, घड्याळे आणि इतर किमती वस्तूही मिळाल्या. विशेष म्हणजे यांचे दोन्हीही मुले विदेशात शिक्षण घेतात.