अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा बुधवारपासून आशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात अमेरिकेचे आíथक आणि संरक्षण विषयक हितसंबंध जपण्याबरोबरच आशिया-पॅसिफिक क्षेत्राशी संबंधित अमेरिकेचे धोरण अधिक बळकट करण्यावर ओबामा भर देणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ओबामा यांच्या आशियाई दौऱ्यात चीनचा समावेश केलेला नाही.
राष्ट्रपती म्हणून ओबामा हे पाचव्यांदा आशिया दौऱ्यावर जाणार आहेत. बुधवारी प्रथम ते जपानला जाणार आहेत. त्यानंतर मलेशिया, फिलिपाइन्स आणि दक्षिण कोरियाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात आशिया-पॅसिफिक क्षेत्राबाबत अमेरिकेचे असणारे एकूणच धोरण अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे. ओबामा आपल्या दौऱ्यात चीनला भेट देणार नसल्याबाबत आशियासंबंधी विभागाचे संचालक एव्हान मेडेइरॉस यांनी सांगितले की, काही आठवडय़ांपूर्वीच ओबामा आणि चीनच्या अध्यक्षांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये अतिशय चांगली चर्चा झाली. त्यामुळे आता परत इतक्या लवकरच दोन्ही नेत्यांची भेट होणे गरजेचे नाही.