केंद्रशासित प्रदेश पुदुचेरीच्या नायब राज्यपाल पदाचा पदभार घेतल्यापासून किरण बेदी यांनी तेथे स्वच्छता अभियानावर भर दिला आहे. परंतु त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्या नाराज असून प्रशासन व लोकप्रतिनिधींचा असाच दृष्टीकोन राहिल्यास नायब राज्यपालपद सोडण्याची धमकी त्यांनी दिली आहे. बेदी यांच्या या पावित्र्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मी येथे नोकरीसाठी नाही तर एका मिशनसाठी आले आहे. पुदचेरीत स्वच्छता अभियान राबवण्यासाठी मला मदत मिळाली नाही तर मी हे पद सोडून जाईल, अशा शब्दात त्यांनी आपला राग व्यक्त केला.
यावर प्रतिक्रिया देताना बेदी म्हणाल्या, स्वच्छता अभियानासाठी राज्यात विविध ठिकाणी मी भेटी दिल्या. त्या वेळी माझ्यासोबत असलेल्या काही अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी मदत करत नसल्याची तक्रार केली. रस्त्याची स्वच्छता करण्याची जबाबदारी माझी एकटीची नाही. मी आणखी वाट पाहणार नाही, असेही त्या म्हणाल्या. तीन महिन्यांपूर्वीच बेदी यांची पुदुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री पी. नारायणसामी यांनी मात्र राज्य सरकार व नायब राज्यपाल किरण बेदी यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे म्हटले आहे. सरकार आणि बेदी यांचे एकच लक्ष्य असून ते आम्ही पूर्ण करू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला . अशाप्रकारचे स्पष्टीकरण करण्याची मुख्यमंत्री नारायण सामी यांची दोन महिन्यातील ही दुसरी वेळ आहे.
राज्यातील आम आदमी पक्ष (आप) व अण्णा द्रमुकने बेदी यांच्या कार्यशैलीवर यापूर्वीही टीका केली होती. बेदी या सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला होता. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्या पद्धतीनुसार बेदी काम करत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यावेळीही सामी यांना खुलासा करावा लागला होता.
बेदी यांनी राज्यातील अधिकाऱ्यांचे विविध व्हॉटसअॅप ग्रूप तयार केले असून त्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात असतात. मुख्यमंत्री नारायण सामी यांनी हे सर्व अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे म्हटले. राज्यपाल व राज्य सरकार हे आपापल्या मर्यादेत राहून व घटनेप्रमाणे दिलेल्या अधिकारानुसारच काम करत असल्याचे म्हटले होते.