आता एकच क्विक रिस्पॉन्स म्हणजेच क्यूआर कोडमधून सर्व प्रकारचे पेमेंट नेटवर्क करता येणार आहे. भारतक्यूआर नावाची ही नवी कोड प्रणाली नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मास्टर कार्ड आणि व्हिसा यांच्या सहकार्याने विकसित केले आहे. सर्वच प्रकारच्या पेमेंट्ससाठी एकच क्यूआर कोड असण्याचा हा जगातील पहिलाच क्यूआर कोड असेल.
सध्या वेगवेगळया पेमेंट प्रोव्हायडरचे एकाच दुकानात वेगवेगळे क्यूआर कोड असतात. उदा. सध्या पेटीएमचा व एचडीएफसीचाही क्यूआर कोड हा वेगवेगळा आहे. जर एखाद्याकडे पेटीएमचे मोबाइल वॉलेट असेल तर त्याला पेटीएमचा क्यूआरकोड दाखवावा लागतो. तो क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देता येतात. परंतु, नव्या व्यवस्थेत क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसे देणे सोपे होणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या डिजिटल व्यवस्थेत पाँईट ऑफ सेल (पॉस मशीन) मशीनच गरज नसते. फक्त आपल्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. सध्या देशात सुमारे १०० कोटी मोबाइल ग्राहक आहेत. यामध्ये ३५ ते ४० कोटी स्मार्टफोन आहेत.

हा नवा कोड भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्यूटी गर्व्हनर आर. गांधी यांनी सोमवारी सादर केला. नव्या व्यवस्थेत दुकानदाराला वेगवेगळया कोडऐवजी एकच कोड काऊंटरवर ठेवावा लागेल. हा कोड संबंधित बँकेच्या मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मिळू शकतो. इतकंच नव्हे तर नवा कोड इतर देशातही सहजपणे लागू करता येऊ शकतो. विशेष म्हणजे नव्या कोडसाठी दुकानदारांना आपल्या सध्याच्या क्यूआर कोडमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्याची गरज भासणार नाही.
क्यूआर कोडने पैसे देणे इतर माध्यमांपेक्षा सुरक्षित मानले जाते. त्याचबरोबर ते अत्यंत किफायतशीरही आहे. यामध्ये फक्त स्कॅन करून पैसे देता येतात. या व्यवस्थेला ‘पुश पेमेंट’ नावानेही ओळखले जाते. यामध्ये पैसे देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची जबाबदारी व्यापाऱ्याची नव्हे तर ग्राहकांची असते. त्याचबरोबर यामध्ये पिन क्रमांक किंवा वैयक्तिक माहिती देण्याची गरज नसते.
भारतक्यूआरमध्ये बँक खाते, आयएफसी कोड, यूनिफाइड पेमेंट इंटरफेस आणि आधारची माहिती देण्याचीही सुविधा उपलब्ध असेल. यामुळे डिजिटल पेमेंट करणे आणखी सोपे जाणार आहे.
या बँकांमध्ये नवा कोड सुरू होणार:
भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, सिटी यूनियन बँक, डेव्हल्पमेंट क्रेडिट बँक, करूर वैश्य बँक, आरबीएल बँक, विजया बँक, यस बँक याशिवाय लवकरच यामध्ये आणखी काही बँकांचा समावेश होणार आहे.