दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने घटनेचे उल्लंघन केले असल्याने केंद्र सरकारने केजरीवाल सरकार बरखास्त करावे, अशी मागणी दिल्ली भाजपने केली आहे. दिल्लीतील आप सरकारचा एक वर्षांचा कारभार संघर्षांचा होता, असेही भाजपने म्हटले आहे. दिल्लीतील आप सरकारला एक वर्ष पूण होत असून त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी भाजपने निषेध दिन पाळण्याचे ठरविले आहे, असे दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी सांगितले. दिल्ली सरकारने जारी केलेल्या ५२ अधिसूचनांची यादी जाहीर करून विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांनी, या अधिसूचना घटनेचे उल्लंघन करून जारी करण्यात आल्याचा आरोप केला.
दिल्लीतील आप सरकारला काँग्रेसकडून शून्य गुण
दिल्लीतील आप सरकारला सत्तेवर येऊन वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने काँग्रेसने या सरकारचे मूल्यांकन केले असून सरकारला शून्य गुण दिले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकार केवळ राजकारणात गुंतले असून विकास आणि उत्तम कारभाराचा अभाव आहे, असे दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी म्हटले आहे. आप सरकारचे पहिले वर्ष केंद्र सरकारशी संघर्ष करण्यात आणि आपल्या चुकांबद्दल इतरांना दोष देण्यातच गेले, असेही माकन म्हणाले.

 

सपाच्या आमदारांचे निलंबन रद्द
लखनऊ: सीतापूर जिल्ह्य़ातील सपाच्या पाच आमदारांचे पक्षातून करण्यात आलेले निलंबन त्वरित मागे घेण्यात येत असल्याची घोषणा शनिवारी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
रामपाल यादव, महेंद्रसिंह ऊर्फ झीन बाबू, मनीष रावत, राधेश्याम जयस्वाल आणि अनुप गुप्ता यांचे निलंबन सपाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी रद्द केल्याचे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी सांगितले.