ब्रिटनची सद्दी समाप्त? गुंतवणूक मंदावणार; रोजगार आटणार

ब्रेग्झिटबाबत उत्सुकता व अनिश्चितता दोन्ही होते. कुणीही छातीठोकपणे काय होईल हे सांगू शकत नव्हते. युरोपीय समुदायातून बाहेर पडल्याने ब्रिटनला आता युरोपीय समुदायाच्या अर्थसंकल्पात वाटा उचलावा लागणार नाही. गेल्या वर्षी १३ अब्ज पौंड तरतूद करावी लागली होती. ब्रिटनचे सरकार राष्ट्रीय आरोग्य सेवेवर जेवढा पैसा खर्च करते त्याच्या ७ टक्के इतकी रक्कम वाचणार आहे. पण मुक्त व्यापार व इतर कारणांमुळे ब्रिटनला त्यापेक्षा जास्त फायदा मिळत होता का हे सांगता येत नाही. ब्रिटनची ५० टक्के निर्यात ही युरोपीय देशात होती त्यामुळे समुदायाचे सदस्यत्व फायद्याचे होते. युरोपीय समुदाय व ब्रिटन यांच्यातील करारामुळे मुक्त व्यापार क्षेत्र जास्त होते जे ब्रिटिश उद्योगांना फायद्याचे होते. आता तसे होणार नसले तरी स्वतंत्र करार करावे लागतील. नॉर्वेला युरोपीय बाजारपेठेत वाव आहे, पण नियम लागू नाहीत असा मध्यम मार्ग ब्रिटन यात काढू शकते. ब्रेग्झिटचे समर्थक असलेले बोरिस जॉन्सन यांच्या मते कॅनडाच्या धर्तीवर व्यापार करून ब्रिटनला परिस्थिती सुधारता येईल, पण ब्रेक्झिटचे विरोधक असलेले कॅमेरून यांनी अशा करारात फार फायदा नाही असे म्हटले आहे. ओपन युरोप या संस्थेच्या मते ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला यात २०३० पर्यंत एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.२ टक्के इतका फटका बसू शकतो. २००८-०९ च्या मंदीसदृश स्थितीत ६ टक्क्य़ांचा फटका बसला होता.

मोटार उत्पादक कंपन्यांना आता ब्रिटनची वाहने युरोपात करमुक्त पद्धतीने निर्यात करता येणार नाहीत, त्यामुळे या कंपन्या ब्रिटनमधील उत्पादन बंद करतील. बीएमडब्ल्यू व रोल्स रॉइस तसेच मिनी या गाडय़ांच्या विक्रीत युरोपीय समुदायात असेपर्यंतच फायदा होता. बर्कलेजने म्हटले आहे की, ब्रिटनसारखा महत्त्वाचा देश बाहेर पडल्याने युरोपची अर्थव्यवस्था खालावणार आहे. काहींच्या मते ब्रिटनला युरोपीय समुदायात मान होता. त्यातून बाहेर पडल्याने राष्ट्रीय सार्वभौमत्व वाढेल असे काही नाही. उलट गुंतागुंतीच्या स्वतंत्र जगाला तोंड द्यावे लागेल.

नाटो, राष्ट्रसंघ, डब्ल्यूटीओ यांचा ब्रिटन सदस्य आहे, पण म्हणून त्यामुळे काही बंधने आलेली नाहीत. पूर्व व दक्षिण युरोपातून शरणार्थी येण्याची भीती होती. युरोपीय समुदायात असल्याने ब्रिटन सदस्य राष्ट्रातील कुणाला देशात येण्यास आडकाठी करू शकत नव्हता, पण त्याचबरोबर ब्रिटनच्या लोकांनाही युरोपात कुठेही काम करण्याची संधी होती. स्थलांतरितांमुळे शिक्षण, आरोग्य व इतर क्षेत्रात अतिरिक्त ताणाची भीती व्यक्त केली जात होती पण कॅमेरून यांनी असा दावा केला होता की, युरोपीय समुदायाशी झालेल्या करारांमुळे स्थलांतरित कमी झाले असते. आता ब्रिटनला वेगळे नियम करावे लागतील.

एकूणच ब्रिटनच्या या निर्णयामुळे युरोपात नजीकच्या भविष्यात बऱ्याच उलथापालथी घडणार असून त्याचा परिणाम संपूर्ण जागतिक बाजारपेठ व अर्थव्यवस्थेवर होणार आहे. त्यामुळेच ब्रिटनचा निर्णय एकप्रकारे ऐतिहासिक ठरणार आहे.

*****

ब्रेग्झिट समर्थकांच्या मते युरोपीय देशांनी ब्रिटनशी स्वतंत्र व्यापार करार करावेत, पण विरोधकांच्या मते ब्रिटनला त्यातून काही फायदा नाही. फ्रान्सच्या मते आता ब्रिटनमधील गुंतवणूक कमी होईल. जसे स्कॉटलंड स्वातंत्र्याच्या जनमतावेळी घडले होते.

*****

काहींच्या मते ब्रिटनचे जगातील एक मोठे अर्थकेंद्र हा दर्जा संपुष्टात येईल, ते अमेरिकी बँकांसाठी युरोपचे प्रवेशव्दार राहणार नाही. ब्रेग्झिट समर्थकांच्या मते सिंगापूर पद्धतीने अर्थव्यवस्था उभारून ब्रिटनला नव्याने स्वत:चा शोध घेता येईल.

* युरोपीय युनियन ही युरोपमधील २८ देशांची राजकीय आणि आर्थिक सहकार्य संस्था आहे.

* ब्रिटनने युरोपीय संघात राहावे की नाही या प्रश्नावर ब्रिटनमध्ये २३ जून रोजी सार्वमत घेण्यात आले.

* मतदानात ब्रिटनच्या ७१.८ टक्के म्हणजे सुमारे ३० दशलक्ष नागरिकांनी भाग घेतला. त्यांपैकी ५२ टक्के नागरिकांनी ब्रिटनने बाहेर पडण्याच्या बाजूने तर ४८ टक्के नागरिकांनी संघात राहण्याच्या बाजूने कौल दिला.

* डॉलरच्या तुलनेत स्टर्लिग पौडाची किंमत १९८५ पासूनच्या नीचांकी पातळीवर म्हणजे १.३४६६ इतकी घसरली.

* देशात वाढते स्थलांतर हा मतदानाच्या प्रक्रियेतील कळीचा मुद्दा बनला.

* ५ जून १९७५ रोजी ब्रिटनने युरोपीय संघात (त्या वेळच्या नावानुसार ईईसी) राहावे की नको यासाठी सार्वमत घेतले होते. त्या वेळी नागरिकांनी संघात राहण्याचा निर्णय घेतला होता.

 

Untitled-13

 

विभागवार निकाल

* इंग्लंड आणि वेल्स प्रांतांमध्ये प्रामुख्याने बाहेर पडण्याच्या बाजूने तर स्कॉटलंड आणि उत्तर आर्यलडमध्ये संघात राहण्याच्या बाजूने मतदान झाले.

* इंग्लंडमध्ये संघात राहण्याच्या बाजूने ५३.४ टक्के तर बाहेर पडण्याच्या बाजूने  ४६.६ टक्के नागरिकांनी मतदान केले.

* वेल्समध्ये ५२.५ टक्के नागरिकांनी बाहेर पडण्याच्या बाजूने तर ४७.५ टक्के नागरिकांनी संघात राहण्याच्या बाजूने मतदान केले.

* स्कॉटलंडमधील ६२ टक्के नागरिकांनी संघात राहण्याच्या बाजूने तर ३८ टक्के नागरिकांनी बाहेर पडण्याच्या बाजूने मतदान केले.

* उत्तर आर्यलडमधील ५५.८ टक्के नागरिकांनी संघात राहण्याच्या बाजूने तर ४४.२ टक्के नागरिकांनी बाहेर पडण्याच्या बाजूने मतदान केले.

शहरी विरुद्ध ग्रामीण

ब्रिटनने युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतला त्यातून तेथील सामाजिक, राजकीय परंपरांतील मतभेद सामोरे आले आहेत. बाहेर पडण्याचा निर्णय ठीक, पण कुठल्या प्रकारचा देश लोकांना हवा आहे. हा प्रश्न अनुत्तरित आहे. युरोपीय समुदायात राहणे म्हणजे आधुनिक परस्परावलंबित्वाचा मार्ग, तर बाहेर पडणे परंपरा व वारसा यांचा स्वतंत्र देशाचा मार्ग असे हे समीकरण होते. मतदानाची स्थिती पाहिली तर ब्रिटनमधील शहरांवर ग्रामीण भागाने मात केलेली दिसते. लंडन, मँचेस्टर, ब्रिस्टॉल, लिसेस्टर, लीड्स व लिव्हरपूल या शहरी भागांत युरोपीय समुदायात राहण्याच्या बाजूने कौल मिळाला. काही भागांसाठी मात्र अस्तित्वाची लढाई होती. काही मतदारांसाठी तो राष्ट्राभिमान जागवण्याची संधी होती. त्यामुळे इंग्लिश राष्ट्रवादासाठीचे ते जनमत ठरले. ब्रेग्झिटमागे आणखी एक कारण म्हणजे परदेशी लोकांचा लोंढा थोपवणे हे होते, कारण त्यामुळे मूळ समुदायावर परिणाम होत होता. शहरी व ग्रामीण भागातील कौल वेगळा होता तशी तरुणाई ब्रेग्झिटच्या विरोधात होती.

Untitled-12