बाजारातील चलन तुटवडा वर्षाच्या अखेरपर्यंत संपेल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ३० डिसेंबरपर्यंत बाजारात नव्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील. त्यामुळे देशातील चलन कल्लोळ वर्षाअखेरपर्यंत संपुष्टात येईल, असे जेटली यांनी म्हटले आहे.

८ नोव्हेंबरला जितक्या मूल्यांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या, तितक्या मूल्यांच्या नोटा वर्षाच्या अखेरपर्यंत बाजारात येणार नाहीत, ही गोष्ट अरुण जेटलींनी स्पष्ट केली आहे. मात्र देशातील चलन संकट संपेल, इतक्या नव्या नोटा बाजारात येतील, असे जेटली यांनी म्हटले आहे. ‘आधी बाजारात जितकी रक्कम होती, तितकी रक्कम डिसेंबरपर्यंत अखेरीस बाजारात येणार नाही,’ असे जेटली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्या. या जुन्या नोटा बँकासह टपाल खात्यात बदलून मिळत आहेत. मात्र रद्द झालेल्या सर्व नोटा बँकांमध्ये जमा झालेल्या नाहीत. रद्द झालेल्या नोटांपैकी काही नोटा या काळ्या पैशाचा भाग होता. त्यामुळे यातील काही रक्कम बँकांकडे जमा होणार नाहीत, असा अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. लोकांकडे असणारा पांढरा पैसा बँकांमध्ये जमा झाला आहे. आता जास्तीत जास्त लोकांनी कॅशलेस व्यवहारांकडे वळावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे जेटली म्हणाले.

‘अधिकाधिक लोकांनी कॅशलेस व्यवहार करावेत, हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारांमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही. सुरुवातीला थोडी अडचण होईल. मात्र त्याचे परिणाम तीन महिन्यांमध्येच दिसू लागतील,’ असे अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

‘काळा पैसा संपुष्टात आणण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. गेल्या ७ दशकांमधील समस्या संपवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. यामुळे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्येही पारदर्शकता येईल,’ असे अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

‘आजच्या घडीला किमान तीनवेळा एका व्यक्तीला कर भरावा लागतो. मात्र भविष्यात ही करप्रणाली अतिशय सोपी होईल. एका व्यक्तीकडून एकदाच कर आकारला जाईल. त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत,’ अशी माहिती अरुण जेटली यांनी दिली आहे.