निवडणूक आयुक्तांचे खरमरीत बोल

नैतिक मूल्ये धाब्यावर बसवून, काहीही करून निवडणूक जिंकणे हा आजच्या राजकारणातील जणू शिरस्ताच झाला आहे, असे खरमरीत बोल केंद्रीय निवडणूक आयुक्त ओ पी. रावत यांनी गुरुवारी ऐकवले. असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉम्र्स (एडीआर) या संस्थेच्या कार्यक्रमात गुरुवारी रावत बोलत होते. निवडणुका जेव्हा खुल्या, मुक्त वातावरणात पार पडतात तेव्हा लोकशाही खऱ्या अर्थाने वृद्धिंगत होते. मात्र तसे नसल्यास त्याबाबत सामान्य माणसाच्या मनात नकारात्मक प्रतिमा तयार होत जाते, असे रावत यांनी यावेळी नमूद केले. निवडणुकीत जेता हा जणू  निष्कलंकच असतो, एखाद्या पक्षातून फुटून सत्ताधारी पक्षाकडे वळलेला हाही जणू तेवढाच स्वच्छ असतो. या अशा गोष्टी हल्ली वारंवार होत आहेत. काहीही करून निवडणूक जिंकायचीच, असा जणू शिरस्ताच तयार झाला आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.

निवडणूक जिंकण्यासाठी अत्यंत हुशारीने राजकीय व्यूह रचणे, पैशांच्या आधारावर मते खेचणे, सरकारी यंत्रणांचा बेमुर्वतपणे वापर करणे या गोष्टी हल्ली नित्याच्याच दिसतात, असे निरीक्षणही निवडणूक आयुक्तांनी नोंदवले.

गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पाडून त्यांची मते खेचण्याचा व त्याआधारे आपले तीन उमेदवार जिंकून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जंगजंग पछाडले होते. मात्र त्यांना त्यात यश आले नाही व काँग्रेसचे अहमद पटेल त्यात विजयी झाले. या कुठल्याही गोष्टींचा थेट उल्लेख निवडणूक आयुक्तांच्या बोलण्यात अर्थातच नव्हता. मात्र त्यांच्या खरमरीत टिप्पणीला गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीतील घटनाक्रमाची पाश्र्वभूमी होती.