सध्याच्या काळात एक रुपयाला फारसे महत्त्व उरलेले नाही. हॉटेलमध्ये वेटरलाही १० रुपयांपेक्षा जास्त टीप दिली जाते. पण हॉटेलमध्ये एक रुपया अतिरिक्त आकारणे एका वकिलाला रुचले नाही आणि त्याने थेट हॉटेल व्यवस्थापनाला ग्राहक न्यायालयात खेचले. आता ग्राहक न्यायालयाने हॉटेल व्यवस्थापनाला ग्राहकाला १०० रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत .
‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार व्यवसायाने वकील असलेले टी नरसिंह मुर्ती वासूदेव अडिगा फास्टफूड सेंटरमध्ये नाश्त्यासाठी गेले होते. मुर्ती यांनी हॉटेलमध्ये एक प्लेट इडली मागवली होती. मेन्यूकार्डवर इडलीचे दर २४ रुपये होते. तर प्रत्यक्ष बिलामध्ये मुर्ती यांच्याकडून २५ रुपये घेण्यात आले. मुर्ती यांनी चौकशी केली असता हे एक रुपये एनजीओला दिले जातील असे सांगितले गेले. पण हॉ़टेल व्यवस्थापनाची ही पद्धत मुर्ती यांना फारशी आवडली नाही. त्यांनी हॉटेल व्यवस्थापनाला थेट ग्राहक न्यायालयात खेचले. हॉटेलने अतिरिक्त पैसे घेणे अयोग्य असून यातून हॉटेलला किती कमाई होते याचे अंदाजही त्यांनी न्यायालयासमोर मांडले होते. तर हॉटेल व्यवस्थापनाने हे पैसे सामाजिक कार्यासाठी घेतले जातात आणि याची माहिती मेन्यूकार्डातही देण्यात आली आहे असे हॉटेल व्यवस्थापनाने सांगितले. माझा आक्षेप ऐवढाच होता की जे दर मेन्यू कार्डवर आहेत बिलावरही तेच दर असावेत, बिलामध्ये असे अतिरिक्त घेणे चुकीचे आहे असे मुर्ती यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. मुर्ती यांना १०० रुपये नुकसान भरपाई आणि न्यायालयीन प्रक्रियेत झालेला एक हजार रुपयांचा खर्च भरुन देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.