आयकर विभागाने काळ्या पैशाविरोधात कारवाईचा धडाका सुरु ठेवला आहे. चेन्नईतील आठ ठिकाणांवर आयकर विभागाने छापा टाकला असून या ज्वेलर्सकडून ९० कोटी रुपये रोख आणि १०० किलो सोने जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या नोटांमध्ये ७० कोटी रुपयांच्या नवीन नोटा असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

आयकर विभागाने चेन्नईमध्ये काळा पैसा बाळगल्याच्या संशयावरुन आठ ज्वेलर्सच्या दुकानांवर छापा घातला. या ज्वेलर्सकडून आयकर विभागाने ९० कोटी रुपयांच्या आणि १०० किलो सोने जप्त केले आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे ३० कोटी रुपये असल्याचे आयकर विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. गुरुवारी सकाळी चेन्नईतील टी नगर आणि अण्णानगर या भागातील हॉटेल, ज्वेसर्सचे दुकान आणि निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले. हे सर्व आरोपी छोटे मासे असल्याचे सूचक वक्तव्यही आयकर विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबररोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. यानंतर आयकर विभागाने देशभरात कारवाईला सुरुवात केली आहे. ११ नोव्हेंबररोजी चेन्नईमधील ११ ज्वेलर्सवर कारवाई करण्यात आली. यातील काही ज्वेलर्स पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा स्वीकारुन सोने विकत असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. यानंतर आयकर विभागाने कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे.  नोटाबंदीच्या निर्णयानंतर आत्तापर्यंत तब्बल २ हजार कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम उघड झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली होती. यामध्ये १३० कोटी रुपयांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता.