दिल्ली पोलिसांनी नुकत्याच एका चोराला अटक केली. मात्र हा साधासुधा चोर नसून तो फक्त नेत्यांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या घरी हातसफाई करायचा. या चोरट्याचा चोरीचा थाटही अजबच होता. शेवरलेच्या कारमधून हा चोरटा दिल्लीतील हायप्रोफाईल विभागात फेरफटका मारायचा आणि ‘शिकार’ शोधायचा. या चोराकडून अमेरिकेन डॉलरसह विविध देशांचे चलनही जप्त करण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांनी सिद्धार्थ मल्होत्रा आणि त्याचे साथीदार जितेंद्र यादव आणि अनुराग सिंह या तिघांना अटक केली आहे. या तिघांकडे असलेला ऐवज पाहून पोलिसही अवाक झाले. शेवरले क्रुज कार, एलईडी टीव्ही, लॅपटॉप्स, प्ले स्टेशन गेमचा सेट, व्हीसीआर प्लेयर्स, महागडी स्वीस घड्याळे, सोन्याचे दोन कडे, चेन आणि अंगठ्या या त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या. याशिवाय २०० अमेरिकन डॉलर, इंडिनेशियन चलनातील एक लाख रुपये आणि नेपाळी चलनही त्यांच्याकडे सापडले आहे. याशिवाय चोरी करताना बोटाचे ठसे उमटू नये यासाठी हातमोजेचा वापरही ते करायचे.

सुपर आणि स्मार्टही

इतक्या प्रतिष्ठित व्यक्तींकडे चोरी करणारा सिद्धार्थ तितका हुशारही होता असे पोलिसांने सांगितले. चोरी करताना तो इतक्या पद्धतशीरपणे चोरी करायचा की कोणताच पुरावा तो मागे सोडत नसे. त्यामुळेच त्याला अटक करण्यासाठी आणि तपासासाठी पोलिसांना तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागला, असे पोलिसांनी स्पष्ट केले. सिद्धार्थकडे असणारी गाडीही त्याने चोरीच्या पैश्यातून घेतल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.