योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली ब्रॅण्डची बनावट उत्पादनांचे वितरण करणारी टोळी छत्तीसगढ पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे. रायपूर पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना मंगळवारी ताब्यात घेतले.

ही बनावट उत्पादने विकणाऱ्या लोकांना बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून पकडण्यात आला आहे. या टोळीकडून पोलिसांनी मोबाईल्स, ओळखपत्रे, पॅन कार्ड्स आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. महासमुंद जिल्हा पोलिस अधीक्षक नेहा चंपावत यांनी ही माहीती दिली.
माध्यांसमोर बोलताना चंपावत यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार पकडण्यात आलेले दोघे आरोपी हे एकमेकांच्या चांगल्या ओळखीचे आहेत. या दोघांनी आपण पतंजली उद्योगातील व्यवस्थापक असल्याचे भासवून अनेक राज्यात पतंजलीची वितरणाची जबाबदारी घेतली होती. यासाठी या आरोपींनी अद्यापपर्यंत ९ लाख ८५ हजार रूपये वितरणाच्या नावाखाली उकळले आहेत. याप्रकरणी सरयपाली भागात राहणाऱ्या संजयकुमार अगरवाल यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून या टोळीचा पर्दाफाश केला.

याप्रकरणी फसवणूक करणे आणि त्यासाठी सहकार्य करणे या गुन्ह्यांखाली भांदवि कलम ४२० आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदेव बाबा यांच्या पतंजलीचा सध्या बाजारपेठेत चांगलाच बोलबाला पाहायला मिळतो आहे. अनेक दिग्गज कंपन्यांना मागे टाकत पतंजलीने अल्पावधीतच बाजारपेठा आणि घराघरांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळेच आता इतर काही दिग्गज कंपन्यांनी पतंजलीला टक्कर देण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. गृहपयोगी उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर यांच्यासह अनेक दिग्गज कंपन्यांनी पतंजलीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी नवी योजना तयार केली आहे. यासाठी नैसर्गिक उत्पादनांवर भर देण्याचा या कंपन्यांचा मानस आहे. गृहपयोगी वस्तू निर्मिती क्षेत्रात पतंजलीकडे सध्या मोठी आघाडी आहे.

पतंजलीने यंदाच्या आर्थिक वर्षात २१ हजार कोटींची कमाई केली आहे. मागील वर्षातील कमाईचा विचार केल्यास पतंजलीच्या महसुली उत्पन्नात यंदा दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे गृहपयोगी उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या इतर कंपन्यांचा महसूल घटला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हातातून निसटलेली बाजारपेठ पुन्हा काबीज करण्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, नेस्ले, मॅरिको, गोदरेज या कंपन्यांनी विशेष योजना आखली आहे. यासाठी नैसर्गिक उत्पादनांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. आतापर्यंत या क्षेत्रात पतंजलीने मोठी आघाडी घेतली आहे.