जागतिक बाजारपेठेत अमेरिकेला तुल्यबळ असलेल्या चीनमध्ये सध्या बदलाचे वारे वाहत आहेत. मात्र, हे बदलाचे वारे आर्थिक किंवा लोकशाहीचे नसून सत्तांतराचे आहेत. पुढील आठवडय़ात चीनच्या सत्ताधाऱ्यांची नवी टीम जाहीर होणार असून दशकभरातून एकदाच होणाऱ्या या कम्युनिस्ट सत्तांतर सोहळ्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.
लोकशाही असलेल्या अमेरिकेत बराक ओबामांकडेच पुन्हा अध्यक्षपद आलेले असतानाच चीनमध्ये प्रस्तावित असलेले सत्तांतर हा अनोखा योगायोग आहे. सत्तांतराच्या प्रक्रियेसाठी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीला (काँग्रेस) येथे सुरुवात झाली आहे.     
कसे असेल सत्तांतर?
पुढील आठवडय़ात म्हणजे १४ नोव्हेंबरला कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्च नेते हू जिंताओ पदावरून पायउतार होतील. नियोजित अध्यक्ष झी जिंगपिंग त्यांची जागा घेणार असले तरी प्रत्यक्षात जानेवारी, २०१३च्या पहिल्या आठवडय़ात पदग्रहण करतील. पंतप्रधान वेन जिआबाओ यांची जागा विद्यमान उपपंतप्रधान ली केकियांग घेतील. उर्वरित सात किंवा नऊ सदस्यांकडे विविध महत्त्वाची खाती हस्तांतरित केली जातील.
कशी आहे पक्षरचना?
पक्षाच्या केंद्रीय समितीतील सदस्य : ३६५
पॉलिट ब्युरोतील सदस्य  २४
स्थायी समितीतील सदस्य  सात किंवा नऊ
पक्षाध्यक्ष : १