मुस्लिम बांधवांच्या हज यात्रेत मरण पावलेल्यांची संख्या ७१९ झाली असून त्यात अठरा भारतीयांचा समावेश आहे. गेल्या पंचवीस वर्षांतील ही सर्वात मोठी दुर्घटना मानली जाते.
परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय अधिकारी मक्केत माहिती मिळवण्याचे काम करीत आहेत. बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत १८ भारतीय मरण पावल्याची माहिती मिळाली आहे. सौदी अधिकाऱ्यांबरोबर आम्ही काम करीत आहोत, मृतांची ओळख अजून पटलेली नाही. एकूण १८ भारतीय मरण पावले असून त्यात ११ गुजरातचे तीन तामिळनाडूचे तर तेलंगण, केरळ, झारखंड व उत्तर प्रदेश या राज्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. नंतर जे चार मृतदेह सापडले त्यांची ओळख पटली असून रसूल अली- झारखंड, मोईनुद्दीन -उत्तर प्रदेश, हाफिजाबेन सतर्षां दिवाण- गुजरात व सय्यद अब्दुल हुसेन- गुजरात अशी त्यांची नावे आहेत. एकूण ८६३ लोक या घटनेत जखमी झाले असून त्यात तेरा भारतीयांचा समावेश आहे. दरम्यान सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी सुरक्षा व्यवस्थेची चौकशी करून हज संघटनेची फेररचना करण्यास सांगितले आहे. सौदी अरेबियावर याबाबत इराणने टीका केली असून इराणचे १३१ नागरिक त्यात ठार झाले आहेत. हज यात्रेच्या देखरेखीबाबत सौदी सरकारवर यापुढे विश्वास ठेवता येणार नाही अशी टीका इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांनी न्यूयॉर्क येथे केली.