‘छ-यांच्या बंदुकांमुळे आतापर्यंत अनेक जण जखमी झालेत, त्यासाठी आम्ही दिलगीरी व्यक्त करतो, पण ना प्राणघातक शस्त्रासारखा प्रकार नसतो, छ-यांच्या बंदुका हा त्यातल्या त्यात कमी प्राणघातक पर्याय आहे.’ असे वक्तव्य सीआरपीफचे महासंचालक दुर्गा प्रसाद यांनी केले. काश्मीरमध्ये सुरु असणारा हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी ११ हजार सैनिकांच्या ११४ तुकड्या काश्मीरमध्ये पाठवण्यात आल्या आहे. या तुकड्यांना सध्या तणाव नियंत्रणात आणण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे या प्रशिक्षणामध्ये जवानांना फक्त गुडघ्याखाली गोळ्या चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. छ-याच्या बंदुकांमुळे आतापर्यंत जे जखमी झालेत त्यांच्यासाठी आम्हाला वाईट वाटते पण आता कमीत कमी या बंदुकांचा वापर करून इजा होऊ न देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तसेच आपातकालीन परिस्थिती निर्माण झालीच तरच या बंदुकीचा वापर करण्याचे आदेश जवानांना देण्यात आला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘दि इंडिअन एक्सप्रेस’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार छ-यांच्या बंदुकामुळे जखमी झालेल्या ३१७ जखमींपैकी पंन्नास टक्के जखमींना डोळ्यांना इजा झाली आहे. तर जमावाकडून झालेल्या दगडफेकीमुळे १००० हून अधिक जवान जखमी झाले आहेत. आतापर्यंत या हिंसाचारात अडीच हजारांहून अधिक जण जखमी झालेत. गेल्याच्या आठवड्यात छ-यांच्या बंदुकांचा  विषय राज्यसभेत देखील चर्चिला गेला होता. काश्मीरमध्ये सुरु असलेला हिंसाचार थोपण्यासाठी सैनिक छ-यांच्या बंदुकांचा वापर करतात त्यावरून केंद्र सरकारवर चांगलीच टीका झाली होती या पार्श्वभूमीवर, या बंदुकांसाठी प्राणघातक नसलेला एखादा पर्याय शोधण्याचा सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले होते.