प्राप्तिकर खात्याच्या छाप्यांमध्ये १५२ कोटींची बेहिशेबी मालमत्ता, सोने, दागिने सापडले

नव्या चलनी नोटांमध्ये करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या सगळ्यात मोठय़ा रोकड जप्तीची रक्कम पाच कोटींहून अधिक झाली आहे. याशिवाय, बंगळुरू व इतर ठिकाणी घातलेल्या छाप्यांमध्ये आपण १५२ कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम शोधून काढली असल्याचे प्राप्तिकर खात्याने म्हटले आहे.

राज्य सरकारच्या सेवेतील दोन अभियंते आणि दोन कंत्राटदार यांच्या इमारतींवर गुरुवारी घालण्यात आलेल्या छाप्यांमध्ये सापडलेली रोख रक्कम ५.७ कोटी रुपयांपर्यंत पोहचली असून, ही रक्कम नव्याने चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांमध्ये आहे. या समूहाने मान्य केलेली बेहिशेबी रक्कम १५२ कोटी रुपयांची असून या प्रकरणी अद्याप तपास सुरू आहे, असे प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी सांगितले.

या छाप्यांनंतर खात्याने ७ किलोग्रॅम सोने-चांदी आणि ९ किलो वजनाचे दागिने जप्त केले असून त्यांची रक्कम ५ कोटी रुपये आहे. सुमारे ९० लाख रुपये चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटांमध्ये आढळले. याशिवाय मालमत्ताविषयक अनेक कागदपत्रेही आढळली व ती जप्त करण्यात आली, असे हे अधिकारी म्हणाले.

प्राप्तिकर खात्याचे कर्मचारी व पोलीस मिळून सुमारे ५० जणांच्या पथकाने गुरुवारी राबवलेल्या या मोहिमेत बेंगळुरू, चेन्नई व ईरोड येथील घरांवर छापे घातले होते. या नव्या नोटा व दागिने चलनातून रद्द झालेल्या नोटांच्या मोबदल्यात एक अभियंता व एक कंत्राटदार यांना देण्यात आल्याचे कळते, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका निवेदनात म्हटले होते.