ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध; दोघांना अटक

उत्तर प्रदेशमध्ये रामपूर जिल्ह्य़ात चौदा जणांच्या टोळक्याने दोन महिलांचा भर रस्त्यात विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तांडा पोलीस चौकीनजीकच हा प्रकार घडला असून या नराधमांनी या घटनेची ध्वनिचित्रफीत तयार करून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली आहे.

सुमारे चौदा जणांच्या टोळक्याने दोन महिलांना घेरून त्यांच्याशी असभ्य वर्तन केल्याचे या ध्वनिचित्रफितीत दिसत आहे. मागील १५ दिवसांपासून ही ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर फिरत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे, तसेच इतरांचाही पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

पोलिसांना दोन महिलांची ओळख पटविण्यात अपयश आले आहे. एका अरुंद रस्त्यावरून जाणाऱ्या या महिलांचा रस्ता या टोळक्याने अडविल्याचे ध्वनिचित्रफितीत दिसत आहे. टोळक्यातील काही तरुण मोटारसायकलवर असून आजूबाजूला झाडे आहेत. टोळक्यातील तरुण दोन महिलांशी अश्लील वर्तन करत असताना महिलाही मदतीसाठी आरडाओरडा करत असल्याचे दिसत आहे. वृत्तवाहिन्यांवर या घटनेची ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध होताच संतापाची लाट उसळली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीची ओळख पटविण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. इतरांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक विपीन ताडा यांनी सांगितले.

आझम खान यांचे वादग्रस्त वक्तव्य

बलात्कार, विनयभंगाच्या घटना वाढत असताना समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी या घटना टाळण्यासाठी महिलांनी घरीच राहावे, असा धक्कादायक सल्ला दिला आहे. चौदा जणांच्या टोळक्याने दोन महिलांचा विनयभंग केल्याची घटना उघड झाल्यानंतर खान यांनी हे वक्तव्य केले आहे. रामपूरच्या ध्वनिचित्रफितीमुळे मला अजिबात आश्चर्य वाटलेले नाही. नव्या सरकारच्या काळात बलात्कार, खून, दरोडे अशा गुन्ह्य़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचेही ते म्हणाले. या घटना टाळण्यासाठी महिला, तरुणींनी शक्य तेवढे घरातच राहावे, असेही ते म्हणाले.