लेखकांसाठी आनंदवार्ता..!

पुस्तक लिहिलंय परंतु कोणी छापत नाही.. प्रकाशक दारात उभं करत नाही.. नवलेखकांच्या या

पीटीआय, नवी दिल्ली | February 8, 2013 4:18 AM

*  पेंग्विन इंडियातर्फे नवीन प्रकाशन संस्था सुरू
*  नवसाहित्याला उभारी देण्यासाठी कटिबद्ध
पुस्तक लिहिलंय  परंतु कोणी छापत नाही.. प्रकाशक दारात उभं करत नाही.. नवलेखकांच्या या तक्रारींना आता फारशी संधी राहणार नाही. जगप्रसिद्ध प्रकाशनगृह पेंग्विनच्या भारतीय शाखेने पारट्रिज नावाची भारतीय प्रकाशन संस्था सुरू केली असून त्याचा लाभ देशभरातील नवलेखकांना घेता येणार आहे.
सहसा मान्यवर प्रकाशन संस्था नवलेखकांचे साहित्य प्रकाशित करत नाही. त्यांनी लिहिलेले साहित्य तसेच पडून राहते किंवा मग कोणत्यातरी अनोळखी प्रकाशन संस्थेकडून ते प्रकाशित केले जाते. परंतु त्याची म्हणावी तशी प्रसिद्धी केली जात नाही. त्यामुळे अनेकदा चांगली संहिता असूनही पुस्तक फारसे गाजत नाही.
लेखकांच्या या अडचणी दूर करण्यासाठीच पारट्रिज ही प्रकाशन संस्था सुरू करण्यात आली असल्याचे पेंग्विन इंडियाचे अध्यक्ष अँड्रय़ू फिलिप्स यांनी स्पष्ट केले आहे.
उपलब्ध पॅकेज
लेखकांसाठी सहा विविध पॅकेज पारट्रिजने ठेवले आहे. त्यात १२ हजार ४५० रुपयांपासून ते एक लाख ४९ हजार ९५० रुपयांपर्यंतच्या पॅकेजचा समावेश असेल. त्यातून एका पॅकेजची लेखकाने निवड करावी.
भारतच का?
पेंग्विनने प्रथमच अशा प्रकारची प्रकाशन संस्था प्रथमच सुरू केली आहे. भारतात लेखकांचे प्रमाण लक्षणीय असल्यामुळेच प्रथम ही संस्था भारतात सुरू केल्याचे फिलिप्स यांनी सांगितले.
यानंतर अशाच प्रकारची प्रकाशन संस्था दक्षिण आफ्रिकेत सुरू करण्याचा पेंग्विन इंडियाचा प्रयत्न असेल असेही त्यांनी सांगितले.
ऑथर सोल्युशन्सचे सहाय्य
भारतात पुस्तक प्रकाशनासाठी पेंग्विन पब्लिकेशन्सची पैतृक संस्था असलेल्या पिअर्सन पब्लिकेशन्सने अमेरिकास्थित ऑथर सोल्युशन्स ही प्रकाशनसंस्था खरेदी केली आहे.
या संस्थेच्या सहकार्यानेच पारट्रिजची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. ऑथर सोल्युशन्सने गेल्या तीन वर्षांत एक लाख ७० हजार लेखकांची दोन लाखांहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत.
असे करणार पुस्तक प्रकाशन
पारट्रिजकडे येणाऱ्या हस्तलिखितांची छाननी केली जाईल. त्यातील चांगल्या संहितेचे प्रकाशन केले जाईल. डिजिटल आणि छापील अशा दोन्ही स्वरूपात हे प्रकाशन असेल. पुस्तकाच्या छपाईपासून ते त्याच्या वितरणापर्यंतची जबाबदारी स्वत पारट्रिज उचलेल.

First Published on February 8, 2013 4:18 am

Web Title: good news for writers