घरातील किचनचे नुतनीकरण करण्याचा निर्णय युकेमधील दाम्पत्याला चांगलाच लाभदायक ठरला. किचनची दुरूस्ती करण्याचे काम सुरू असताना दाम्पत्याला १७ व्या शतकातील हजारो नाण्यांचा खजिना आढळला. गार्डियन या संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, बेकी आणि रॉबर्ट फूक्स यांनी आपल्या किचनची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला होता. किचनच्या फरशीची उंची वाढविण्यासाठी त्यांनी खोदकाम केले. खोदकामादरम्यान त्यांना खजिना सापडला.
गार्डियनने दिलेल्या बातमीनुसार युकेच्या डॉकसेट येथे फूक्स दाम्पत्याचे घर आहे. रॉबर्ट यांनी किचनमध्ये दोन फुटांचा खड्डा खणला. त्यावेळी त्यांना ४०० वर्षांपूर्वीचे सोन्या-चांदीची नाणी सापडली. या नाण्यांची एकूण संख्या १०२९ असल्याचे सांगितले जाते. यामध्ये पहिला जेम्स आणि पहिला चार्ल्स यांच्या चेहऱ्याची आकृती असलेलीही नाणी आहेत. १६४२ ते १६४४ या काळात चाललेल्या गृह युद्धादरम्यान या नाण्यांना याठिकाणी पुरले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हा खजिना सापडल्यानंतर रॉबर्ट आणि बेकी यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आणि नाण्यांची तपासणी करण्यासाठी त्यांना ब्रिटिश संग्रहालयात नेण्यात आले. त्यानंतर या नाण्यांचा लिलाव केला गेला. ज्यामध्ये ६२ लाख रुपये मिळाले.
रॉबर्ट आणि बेकी यांनी २०१९ साली हे घर विकत घेतले होते. मात्र त्यानंतर ते याठिकाणी राहायला आले नव्हते. घर जुने असल्यामुळे त्याची डागडुजी करण्याची गरज होती. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांना ही नाणी आढळून आली होती. मात्र नाण्यांची तपासणी करण्यात तीन वर्षांहून अधिकचा काळ निघून गेला. मात्र आता त्यातून बक्कळ पैसा मिळाला आहे. बेकी यांनी सांगितले की, हे घर ४०० वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे या घराची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.