जागतिक तापमानवाढीची चर्चा गेल्या दोन दशकापासून सुरू असली आणि तापमानवाढ रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू असले, तरी तापमानवाढ कमी झालेली नाही. २०१४ म्हणजेच यंदाचे वर्ष हे लवकरच १९८०नंतरचे सर्वाधिक उष्ण वर्ष जाहीर होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या काळात पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून, तापमानवाढीचा हा एक विक्रमच आहे.
अमेरिकेच्या ‘राष्ट्रीय महासागर आणि वातावरण प्रशासना’ने (एनओएए) यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. पृथ्वीचा भू-पृष्ठभाग आणि सागरी पृष्ठभाग याच्या तापमानात ऑक्टोबर महिन्यात मोठी वाढ झाली. १९७६च्या ऑक्टोबर महिन्यात पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा कमी होते. मात्र त्यानंतर सलग ३८ वष्रे त्यामध्ये वाढ होत गेली असून यंदाच्या ऑक्टोबरमध्ये तापमानवाढीने मोठा पल्ला गाठला आहे.
यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान १४.७४ अंश सेल्सिअस राहिले. विसाव्या शतकातील सरासरी तापमानापेक्षा ते ०.७४ अंश सेल्सिअसने अधिक आहे. २०१२ हे वर्षही उष्ण वर्ष होते, त्यावेळी पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान १४.६० अंश सेल्सिअस होते.
..यांना उष्णतेचा सामना करावा लागणार
तापमानवाढीचा सामना जागातील अनेक देशांना करावा लागणार आहे. दक्षिण अमेरिका खंडातील बहुतेक देशांना या ‘उष्ण वर्षांचा’ फटका बसेल. त्याचबरोबर अमेरिका देशातील पश्चिम किनारपट्टीचा भागा, पूर्व रशिया, दक्षिण आणि आग्नेय आशिया, दक्षिण आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण युरोपमधील काही भागांना वाढत्या तापमानवाढीचा परिणाम जाणवणार आहे.