पाकिस्तानसोबतचे ताणलेले संबंध सुधारण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या ३९ कैद्यांची सुटका केली आहे. भारतीय सैन्याने वाघा बॉर्डरवर ३९ कैद्यांना पाकिस्तानच्या ताब्यात दिले आहे. यामधील २१ कैद्यांनी त्यांना सुनावण्यात आलेली शिक्षा पूर्ण केली आहे. भारताकडून सुटका करण्यात आलेल्या कैद्यांमध्ये १८ मच्छिमारांचा समावेश आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सुटका करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या कैद्यांना पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात दिले आहे. याआधी मागील महिन्यात सीमा सुरक्षा दलाने नजरचुकीने भारतीय भूमीत आलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाला मायदेशी पाठवले होते. दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानने २१७ भारतीय मच्छिमारांची सुटका केली होती. भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून मच्छिमारांची सुटका करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानने ४४७ भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे.

पाकिस्तानने २१ जानेवारीला भारतीय जवान चंदू चव्हाण यांची सुटका केली होती. पाकिस्तानच्या सैन्याने वाघा बॉर्डरवर चंदू चव्हाण यांना भारताच्या ताब्यात दिले होते. गेल्या वर्षी भारतीय जवान चंदू चव्हाण यांनी नजरचुकीने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला होता.

पाकिस्तानने २५ डिसेंबरला मच्छिमारांची सुटका केली होती. त्यावेळी पाकिस्तानने २२० मच्छिमारांना मुक्त केले होते. उरीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये केलेला सर्जिकल स्ट्राइक यामुळे वातावरण तापले असल्याने पाकिस्तानने भारतीय मच्छिमारांची सुटका करत दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने सुटका केलेले बहुतांश मच्छिमार वर्षभरापेक्षा अधिक काळ पाकिस्तानच्या ताब्यात होते. मध्यंतरीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर पाकिस्तानने ५ जानेवारीला २१८ भारतीय मच्छिमारांची सुटका केली होती.