प्रवासी रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रशिया भारताला मदत करणार आहे. यामुळे प्रवासी रेल्वे गाड्यांचा वेग २०० किलोमीटर प्रतितास इतका होणार आहे. रशियन रेल्वे सध्या भारतीय रेल्वेसोबत नागपूर ते सिकंदराबाद या ५७५ किलोमीटर रेल्वेमार्गाचे कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी गेल्या आठवड्यात रशियन रेल्वेकडून अहवालदेखील सादर करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी रशियन रेल्वेकडून अनेक तांत्रिक बदल सुचवण्यात आले आहेत. रेल्वे अलाईनमेंटची पुनर्रचना आणि वेग कमी होणाऱ्या भागात बदल करण्याच्या सूचना रशियन रेल्वेकडून करण्यात आल्या आहेत.

भारतीय रेल्वेकडे २०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारे डबे नसल्याने नवे प्रवासी डब आवश्यक असल्याच्या सूचना रशियन रेल्वेकडून करण्यात आल्या आहेत. मात्र देशातील अनेक पुलांवर वेगाची मर्यादा असल्याने रशियन रेल्वेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेमार्ग जात असलेल्या भागांची भौगोलिक रचना आणि त्याठिकाणी असणारी आव्हाने यांचे सर्वेक्षण करण्याची सूचनादेखील रशियन रेल्वेकडून भारतीय रेल्वेला करण्यात आली आहे. यानंतर संबंधित भागात आवश्यक ते बदल किंवा दुरुस्ती करण्यात येईल, असे रशियन रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

भारतात रेल्वेगाड्या ट्रॅक बदलताना त्यांचा वेग कमी होतो. अनेकदा रेल्वे स्थानक जवळ येताच रेल्वेगाड्यांचा ट्रॅक बदलतो आणि रेल्वे स्थानक सोडल्यावर त्या दुसऱ्या ट्रॅकवर वळवल्या जातात. यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग कमी होतो. त्यामुळे २०० किलोमीटर प्रतितासाची वेग मर्यादा गाठण्यासाठी यामध्ये महत्त्वपूर्ण बदल आवश्यक असल्याचे रशियन रेल्वेने म्हटले आहे.

सध्याच्या रेडिओ संपर्क यंत्रणेपेक्षा डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित संपर्क यंत्रणा असावी, असा प्रस्तावदेखील रशियन रेल्वेकडून देण्यात आला आहे. वेगवान रेल्वेचे जाळे निर्माण करताना सुरक्षेलाही महत्त्व देण्यात येणार आहे. पादचाऱ्यांची आणि रेल्वे क्रॉसिंग करणाऱ्यांच्या सुरक्षेचे उपाय करण्यात येणार आहेत. रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी येणारी माणसे आणि जनावरे यांचा विचार करुन रेल्वेमार्गांजवळ तारांचे कुंपण उभारण्यात येणार आहे. वेगाने जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या आवाजाचा त्रास रेल्वेमार्गांजवळ राहणाऱ्या लोकांना होऊ नये, यासाठी आवाज प्रतिबंधक पत्रे बसवण्याच्या सूचनादेखील रशियन रेल्वेकडून करण्यात येणार आहे.